मुंबई : भाजप नेते पराग शाह यांनी मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भव्य नामांकन रॅली काढण्यात आली होती. याप्रसंगी भाजप नेते किरीट सोमय्या, राम कदम, माजी खासदार मनोज कोटक यांच्यासह महायुतीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना पराग शाह म्हणाले की, "आयुष्यात प्रत्येक गोष्टीत आव्हान असते. परंतू, त्यांना घाबरणे हे आपले काम नाही. केवळ जनतेसाठी काम करणे हेच आपले कर्तव्य आहे. त्यामुळे मागच्यावेळीपेक्षा यावेळी अधिक मताधिक्याने आम्ही विजयी होऊ. गेल्या पाच वर्षांतील माझे काम बघून लोक मला मतदान करतील, असा विश्वास आहे. घाटकोपरला समृद्ध करणे हे माझे उद्दिष्ट आहे. घाटकोपरमधील सर्व धर्म, जाती आणि भाषेच्या लोकांना एकत्र सोबत घेऊन चालायचे आहे. आपल्या समोर असलेल्या आव्हानातून बाहेर पडणे हे एका योद्ध्याचे काम आहे. या निवडणूकीत आम्ही एक योद्धा म्हणून लढणार आहोत," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - सिंचन घोटाळ्याबद्दल मोठा खुलासा! अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट! माजी गृहमंत्र्यांवर आरोप
प्रकाश मेहता नाराज नाहीत!
भाजप नेते प्रकाश मेहता हे घाटकोपर पूर्व विधानसभेतून तिकीट न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चा होत्या. याबाबत बोलताना पराग शाह म्हणाले की, "प्रकाश मेहता नाराज नाहीत. एखादा व्यक्ती केवळ एक-दोन तास नाराज राहतो. परंतू, प्रकाश मेहता माझे मित्र आहेत. त्यामुळे ते नाराज नाहीत."
पराग शाह हे सेवाभावी आमदार : राम कदम
घाटकोपर पश्चिम विधानसभेचे आमदार राम कदम म्हणाले की, "पराग शाह यांनी मागच्या पाच वर्षांत सेवाभावी आमदार म्हणून मोठे काम उभे केले. कोरोनाकाळात हजारों लोकांना अन्नधान्यापासून तर औषधांपर्यंत सर्वकाही मोफत दिले. याशिवाय दररोज साधारणत: किमान ५ ते ८ हजार लोकांना ते मोफत जेवण देतात. त्यामुळे गोरगरिबांच्या सुखदुखात धावून जाणारा आमदार अशी त्यांची ओळख आहे. पक्षाने यावेळी त्यांना पुन्हा एकदा संधी दिली असून त्यांचा विजय निश्चित आहे. फक्त त्यांचा लीड किती वाढतो, हे पाहायचं आहे."