मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खान याला बिश्नोई गॅंगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याच प्रकरणामुळे बाबा सिद्दीकी यांची देखील हत्या करण्यात आली होती. आणि आता पुन्हा एकदा झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयातील फोनवर हा धमकीचा फोन आला आहे. शुक्रवारी सायंकाळी हा धमकीचा फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने झिशान आणि अभिनेता सलमान खान यांना मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली आहे. याप्रकरणी झिशान सिद्धीकी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार निर्मलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील वांद्रे परिसरात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकींसोबत झिशानवरही गोळ्या झाडण्याचा आरोपींचा प्लॅन होता असं सांगितलं जात आहे. याशिवाय, बाबा सिद्दीकी यांच्या जवळचा मित्र असलेला अभिनेता सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर आता सलमान खान आणि झिशान सिद्दीकी या दोघांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
दरम्यान, झिशान सिद्दीकीने विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच झिशान सिद्दीकी यांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. झिशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्वमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली असून सलमान खानचा पाठिंबा असल्याचंही त्याने सोमवारी सांगितलं होतं.