मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ghar Ghar Samvidhan) भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित 'संविधान जागर समिती महाराष्ट्र' यांच्या वतीने राज्यभरात 'घर घर संविधान' अभियान राबविण्यात येत आहे. दि. २६ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत सदर अभियान पार पडेल. त्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी संविधान जागर समितीच्या स्नेहाताई भालेराव (संयोजिका), योजनाताई ठोकळे (संयोजिका), नितीन मोरे (संयोजक), अॅड. संदीप जाधव, (संयोजक) आणि विवेक विचार मंचचे, मुंबई संयोजक, जयवंत तांबे उपस्थित होते. या अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या संविधानिक मुल्यांचा जागर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच अभियानाच्या अंतर्गत राज्यभरात विविध कार्यक्रम, उपक्रम, स्पर्धा होणार आहेत. यानिमित्त घरोघरी संविधान सरनामा तसेच पुस्तिका वितरित करून संविधानिक मूल्यांचा प्रसार केला जाणार आहे.
हे वाचलंत का? : हैदराबादमध्ये आतापर्यंत ३.५ लाख लोकांचे ट्रॅकिंग सिस्टमद्वारे चर्चमधून धर्मांतरण
संविधानाबाबत काही लोक हेतुपुरस्सर खोटी माहिती व नॅरेटीव्ह पसरवत आहेत. नागरिकांमधील गैरसमज दूर करून योग्य व वास्तव माहितीचे जागरण या अभियानाच्या द्वारे होईल. 'संविधान जागर समिती' मध्ये राज्यातील अनेक संस्था संघटना एकत्र आलेल्या आहेत व याद्वारे हे अभियान राबविले जाणार आहे. राज्य सरकारकडून नुकतीच या अभियानाची घोषणा करण्यात आल्याचेही मान्यवरांनी यावेळी सांगितले. आगामी निवडणुकीत नागरिकांनी शंभर मतदान करण्याचे आवाहनसुद्धा यानिमिताने करण्यात येणार आहे.
या अभियानाचा शुभारंभ खा. बृज लालजी (माजी पोलीस महासंचालक उ. प्रदेश तथा माजी अध्यक्ष, अनुसुचित जाती व जमाती आयोग उ.प्र.) यांच्या शुभहस्ते व दिलीप कांबळे (माजी मंत्री तथा अध्यक्ष, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ) यांच्या प्रमुख उपस्थितीत वाल्मिकी आश्रम, मिलिदनगर रिव्र्व्हर रोड, पिपंरी येथे नुकताच संपन्न झाला. या 'घर घर संविधान' अभियानात नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभागी व्हावे व प्रत्येक घरापर्यंत व घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत संविधानाचा जागर करावा, असे आवाहन संविधान जागर समिती महाराष्ट्र यांच्या कडून करण्यात आले आहे.
हिंदूंना टार्गेट करण्यासाठी दलितांचा वापर
भारताचे संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा अपप्रचार आज कम्युनिस्टवादी, कट्टरपंथी सर्रासपणे करत आहेत. अनुसुचित जाती, जमाती यात बळी पडाव्या म्हणून हा अपप्रचार होतो आहे. वास्तविक ज्याप्रमाणे तिरंगा झेंडा किंवा राजमुद्रेचा गैरवापर करता येत नाही, त्याचप्रमाणे संविधानाचाही गैरवापर करता येत नाही. परंतु विरोधक आज फेक नरेटिव्ह पसरवत भारतीय संविधान पॉलिटिकल टूलकीट म्हणून वापरत आहेत. हिंदूंना टार्गेट करण्यासाठी दलितांचा वापर विरोधकांकडून होताना दिसतो आहे, असे मत संविधान जागर समितीने मांडले.