नागपूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी कामठी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी भव्य नामांकन रॅली काढण्यात आली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आई श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचा आशीर्वाद घेतला असून कामठी विधानसभेतील जनता मला चांगला विजय मिळवून देईल आणि पुढील पाच वर्ष सेवा करण्याची संधी देईल, असा मला विश्वास आहे. दीड लाखांच्या वर परिवारांशी माझे पारिवारिक संबंध आहेत. त्यामुळे माझे मतदार मला समजून घेतील. मी कामठी विधानसभेला वेळ देऊन राज्यातसुद्धा वेळ देणार आहे. त्यामुळे कामठी विधानसभेची जनता निश्चितपणे मला विजयी करून देईल. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायूतीचेच सरकार येईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अर्ज दाखल करताना चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत आ. टेकचंद सावरकर, शिवसेनेचे नेते कृपाल तुमाने, माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नागपूर जिल्हाध्यक्ष शिवराज गुजर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.