सांगली : आर. आर. पाटील यांनी आपली खुली चौकशी करण्यासाठी फाईलवर सही केली होती. त्यांनी आपला केसाने गळा कापला, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी संजयकाका पाटील यांनी तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "माझ्यावर आरोप झालेत. मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. माझ्यावर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर त्याची एक फाईल तयार झाली. ती फाईल गृहखात्याकडे जाते. आर. आर. आबा पाटलांनी अजित पवारांची खुली चौकशी व्हावी, यासाठी त्या फाईलवर सही केली. हे केसानं गळा कापायचे धंदे आहेत."
हे वाचलंत का? - चंद्रशेखर बावनकुळेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज! फडणवीसांच्या उपस्थितीत भव्य नामांकन रॅली
"त्यानंतर राष्ट्रपती राजवट आली. पृथ्वीराजबाबांचा पाठिंबा आपण काढून घेतला. त्यावेळीचे राज्यपाल म्हणाले की, मी या फाईलवर सही करणार नाही. निवडून आलेले मुख्यमंत्री सही करतील. पुढे देवेंद्र फडणवीसांचं सरकार निवडून आलं. त्यांनी सही केली आणि नंतर मला घरी बोलवलं. ही फाईल मुख्यमंत्र्याच्या सहीसाठी राहिली होती. तुमच्या आबांनी तुमची खुली चौकशी करण्यासाठी सही केली, असं मला सांगितलं. त्यावेळी मला खूप वाईट वाटलं," असे त्यांनी सांगितले.