मुंबई : महाराष्ट्राच्या काही भागात जसा वसुबारस साजरा केला जातो तसचं काही भागात वाघबारस साजरा केला जातो. वाघबारस सण हा वनवासी बांधवांमध्ये साजरा केला जातो. इतर ठिकाणी या दिवशी जशी गाईची पूजा केली जाते तशीच वनवासी समाजामध्ये वाघाची पूजा केली जाते. वनवासी समाज हा निसर्ग पूजक आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहत असल्यामुळे आणि निसर्गावरच अवलंबून असल्यामुळे त्यांच्या मनात निसर्गाप्रती कृतज्ञता असते. आणि त्यांच्या प्रत्येक सणामधून ती कृतज्ञता व्यक्त होते. वाघबारसच्या दिवशीही अशीच कृतज्ञता व्यक्त केली जाते. जंगलात राहणाऱ्या वनवासी बांधवांसाठी वाघ दिसणं हे शुभ मानलं जातं. ज्या भागात वाघाचे वास्तव्य आहे त्या भागात अवर्षण परिस्थिती कधीही निर्माण होत नाही, अशा भागात नेहमी सुबत्ता असते; अशी वनवासी बांधवांची भावना आहे. म्हणून वनवासी बांधव ‘वसुबारस’ ऐवजी ‘वाघबारस’ साजरा करतात. ज्यांच्या घरी गाई किंवा गोधन असते ते वनवासी लोक वसुबारस साजरा करतात, गाईची पूजा करतात. पण जंगलात राहणारे वनवासी लोक वाघबारसच साजरा करतात. जंगलात राहत असल्यामुळे त्या ठिकाणी वाघाचा वावर असतो. त्या वाघाने आपल्यावर हल्ला करू नये. गाई-गुरे आणि पाळलेल्या इतर प्राणी पक्ष्यांचे रक्षण व्हावे म्हणून वाघबारस साजरा केला जातो. महाराष्ट्रातील अनेक गावांतील वनवासी पाड्यांवर वाघाची देऊळं असल्याची आपल्याला पाहायला मिळतात. या दिवशी वाघाच्या मंदिरात कोंबड्यांचा बळी दिला जातो. काही भागात डांगर आणि खिरीचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. ज्या ठिकाणी वाघाची देऊळे नाहीत त्या ठिकाणी व्याघ्रचित्राचे कोरीव काम करुन त्यावर शेंदूर लावतात. व्याघ्रचित्राचे पूजन करून त्या व्याघ्रदेवतेचा सन्मान करण्यात येतो. आमचं रक्षण कर, आमच्यावर हल्ला करू नकोस, आमच्यासोबतच गाई-गुरांचं, पशू-पक्ष्यांचं रक्षण, धनधान्याची वाढ होऊदे आणि रोगराई दूर पळून जाऊदे अशी प्रार्थना या दिवशी व्याघ्रदेवतेला केली जाते. या सणाच्या दिवशी ‘वनवासी तरुण-तरुणी विविधरंगी वस्त्रे परिधान करून, एकत्र जमून तालासुरात नाचण्यासाठी त्यांच्या वाडीवस्तीत जमतात मुर्हा चाली, बदक्या चाली, लावरी चाली बायांची, देवांची, रानोडी, टाळ्यांची, नवरदेवाची चाल अशा विविधचालींवर ते नृत्य करतात.