आठवड्याच्या सुरूवातीला बाजारात तेजीचे वारे; आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे सकारात्मक ट्रेंड

28 Oct 2024 17:10:48
stock-market-green-sensex-nifty


मुंबई :       मागील काही काळापासून भारतीय भांडवली बाजारात परदेशी गुंतवणूकदारांकडून जोरदार विक्रीचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण होत असून गुंतवणूकदार धास्तावले आहेत. आज सेन्सेक्स ६०२.७५ अंकांनी तर निफ्टीत १५८.३५ अंकांनी वधारला. गेल्या आठवड्यात बाजार लाल रंगात बंद होताना दिसला. त्यानंतर आता आठवड्याच्या सुरूवातीला बाजारात तेजी पुन्हा येण्याची शक्यता आहे.


दरम्यान, जागतिक बाजारातील सकारात्मक ट्रेंड आज बाजारात पाहायला मिळाला. सलग पाच दिवसांच्या घसरणीला अखेर आज ब्रेक लागला. त्यामुळे गुंतवणूकदारदेखील सुखावले आहेत. बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्स ७९,६५३.६७ अंकांच्या वाढीसह उघडला तर व्यवहारादरम्यान ११०० अंकांनी ८०,५३९.८१ च्या पातळीवर गेला. बाजार बंद होताना ०.७६ टक्क्यांनी वाढून ८०,००५.०४ वर बंद झाला.

त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंज(एनएसई) निर्देशांक निफ्टी-५० देखील ०.६५ टक्के वाढीसह २४,३३९.१५ च्या पातळीवर बंद झाला. विशेष म्हणजे आज ट्रेंड करताना आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समधील वाढीमुळे शेअर बाजारात वाढ झाली. तर दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या जागतिक किमतीत झालेल्या तीव्र घसरणीमुळे बाजारात सकारात्मक ट्रेंड दिसत आहे, असे गुंतवणूकदारांचे मत आहे.
 

Powered By Sangraha 9.0