लहान मुले जेव्हा चित्र काढतात, तेव्हा त्यांच्या पालकांना त्यांच्या चित्रांचे कौतुक वाटते. पण जर्मनीतील एका लहान मुलाने काढलेल्या चित्रांचे, सध्या संपूर्ण जगाला कौतुक वाटत आहे. या मुलाचे नाव आहे लॉरेंट श्वार्झ. लॉरेंटने आपल्या चित्रांमधून असा काही प्रभाव पाडला आहे की, लोक आता त्याची तुलना जगप्रसिद्ध चित्रकार ‘पिकासो’सोबत करत आहेत. ‘मिनी पिकासो’ याच नावाने जग आता त्याला ओळखत आहे.
हा ‘मिनी पिकासो’ म्हणजेच लॉरेंट अवघा तीन वर्षांचा आहे. जर्मनीतील बव्हेरियन शहरातील, न्यूब्युर्नमध्ये आई लिसा श्वार्झ आणि बाबा फिलिप श्वार्झसोबत राहतो. वयाच्या साधारण एक ते दीड वर्षांपर्यंत लॉरेंट हा सर्वसाधारण लहान मुलांसारखा होता. पण गेल्या वर्षीपासून त्याने अशी काही चित्रे काढायला सुरुवात केली की, त्याच्या आईवडिलांना आणि इतर सगळ्यांनाच त्याची ती चित्रे पाहून आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या या चित्रांना कारण ठरली, त्याची गेल्या वर्षीची कौटुंबिक सहल. लॉरेंट २०२३ मध्ये, त्याच्या आईबाबांसोबत एका कौटुंबिक सहलीला गेला होता. सहलीदरम्यान ते ज्या हॉटेलमध्ये राहत होते, त्या हॉटेलमध्ये एक स्टुडिओ होता. त्या स्टुडिओमध्ये अनेक चित्रे होती. ती चित्रे बघून लॉरेंटला आनंद झाला होता. त्याचा तो आनंद त्याच्या आईबाबांच्या लक्षात आला. पण, या आनंदाचे रूपांतर आवडीत होईल, आणि चित्रकलेची ही आवड आपल्या मुलाला प्रसिद्धी मिळवून देईल, याची त्यावेळी त्यांना अजिबात कल्पना नव्हती. लॉरेंट श्वार्झचा ‘मिनी पिकासो’ व्हायला हीच सहल कारणीभूत ठरली. त्या सहलीवरुन परतल्यानंतर, लॉरेंटला फक्त आणि फक्त चित्रे काढायची होती. तसा हट्ट तो आईबाबांकडे करत होता. त्याचा तो हट्ट लक्षात घेऊन, त्याच्या आईबाबांनी त्याला कॅनव्हास, रंग, कुंचला असे सगळे चित्रकलेचे साहित्य आणून दिले. ते साहित्य घेऊन लॉरेंट चित्रे काढू लागला. त्यात तो रमू लागला. सुरुवातीला त्याची चित्रे पाहून त्याचे आईबाबा थक्क झाले. आपला मुलगा इतक्या कमी वयात इतकी चांगली चित्रे काढू शकतो, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यांच्या मुलाचा त्यांना अभिमान वाटू लागला. त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना लॉरेंटच्या चित्रांविषयी सांगितले. काहीच दिवसांत लॉरेंटच्या घरी त्याची चित्रे पाहण्यासाठी गर्दी जमू लागली. त्याच्या चित्रांच्या चर्चा शहरभर पसरल्या. लॉरेंटची चित्रे जगाला पाहाता यावी, यासाठी त्याच्या आईबाबांनी समाजमाध्यमांवर त्याच्या चित्रांचे एक अकाऊंट तयार केले.
चार आठवड्यांमध्येच त्या अकाऊंटला दहा हजार लोक जोडले गेले आणि हळूहळू हा ‘मिनी पिकासो’ जगभरात प्रसिद्ध होऊ लागला. लॉरेंटला इतर लहानमुलांप्रमाणे इतरही आवडी आहेत. इतर मुलांप्रमाणे त्याच्याकडेही अनेक खेळणी आहेत. पण त्याला त्याचा अधिकाधिक वेळ, चित्रे काढण्यात घालवायला आवडतो. वय अगदीच लहान असल्यामुळे त्याला चित्रांची किंवा रंगांची तशी समज नाही, ती असणे शक्यच नाही. पण कुंचला रंगात बुडवून तो कॅनव्हासवर अशा प्रकारे फिरवतो की, त्यातून एक सुंदर चित्र तयार होते. कधीकधी तो त्याचे चिमुकले हात रंगात बुडवून, त्याचे ठसे कॅनव्हासवर काढतो. तो कॅनव्हासवर जे काही करतो, ते सुंदरच दिसते, अशी त्याची कला आहे. त्याच्या पालकांनी त्यांच्या घरामध्ये लॉरेंटसाठी एक स्वतंत्र स्टुडिओ स्थापन केला आहे. तिथेच लॉरेंट त्याची चित्रे काढण्यात दंग असतो. समाजमाध्यमांवरील लॉरेंटची चित्रे पाहून, अनेक चित्रप्रेमींनी त्याच्या स्टुडिओला भेट दिली. अनेक संग्राहालयांनी त्याच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्याची मागणी केली आणि अनेक माध्यमांनी त्याची मुलाखत घेण्याची इच्छा दाखवली, अशी माहिती त्याच्या पालकांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्याने काढलेले पहिले चित्र आणि इतर काही ठराविक चित्रे सोडली, तर इतर सर्व चित्रे चांगल्या किमतीला विकली गेली आहेत, असेही त्याच्या पालकांनी माध्यमांना सांगितले. लॉरेंटच्या चित्रांमधून मिळालेली रक्कम त्याच्या पालकांनी त्याच्या भविष्यासाठी राखून ठेवली आहे. त्याने भविष्यात चित्रकार व्हायचे की दुसरे काही करायचे, हे त्याचे तो ठरवेल. फक्त तो आनंदी असणे आमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे, असे त्याच्या पालकांचे म्हणणे आहे.
एक तीन वर्षांचा मुलगा इतकी चांगली चित्रे काढतो, ही सुखावणारी गोष्ट आहे. त्याची ही कला तो कायम अशीच जोपासून तो मोठेपणी पिकासोसारखी चित्रे काढेल का, याकडे जगाचे आता लक्ष असेल.