केरळमध्ये कम्युनिस्टांच्या छत्रछायेत ‘दहशतवादाचा दूत’

28 Oct 2024 21:38:51
kerala communist terror envoy
 

मदानी यांच्या जहाल भाषणामुळे लोक त्याचा उल्लेख ‘दहशतवादाचा दूत’ असा करीत असत, याची नोंद जयराजन यांनी आपल्या पुस्तकात घेतली आहे. केरळचे मार्क्सवादी नेते पिनाराई विजयन हे 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत मदानी याच्या समवेत प्रचारामध्ये सहभागी झाले होते. त्याच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक ज्येष्ठ नेता केरळमधील मुस्लीम युवक मदानी याच्यामुळे जहाल झाल्याचा स्पष्ट उल्लेख आपल्या पुस्तकात करतो. याचा अर्थ केरळमधील मार्क्सवादी पक्षात सर्व काही सुरळीत नाही, असा काढल्यास ते चुकीचे ठरणार नाही.

केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. जयराजन यांच्या आगामी पुस्तकामध्ये, केरळमधील मुस्लीम तरुणांना जहाल, धर्मांध करण्यामध्ये अब्दुल नासर मदानी याने महत्त्वाची भूमिका बजाविल्याचे म्हटले आहे. 1992 साली बाबरी ढाँचा पडल्यानंतर अब्दुल मदानी याच्या नेतृत्वाखाली संपूर्ण केरळभर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आल्या होत्या. मुस्लीम युवकांना अधिकाधिक जहाल आणि धर्मांध करण्यासाठी या व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात आले होते. भावनिक आवाहन करणारी भाषणे करून मदानी मुस्लीम युवकांना प्रभावित करीत असे. तसेच, त्याद्वारे ते आणखी जहाल कसे बनतील, असा त्याचा प्रयत्न असे. मदानी याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवर 1990 साली ‘इस्लामिक सेवक संघा’ची स्थापना केली. त्या संघटनेच्या माध्यमातून मुस्लीम युवकांना धर्मांध बनविण्याचा प्रयत्न मदानी करीत होता. आपल्या ‘केरळम, मुस्लीम राष्ट्रीयम, राष्ट्रीय इस्लाम’ या नावाच्या आगामी पुस्तकात जयराजन यांनी मदानी याच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला आहे. जुलै 1992 साली पुंथुरा येथे जी जातीय दंगल झाली, त्यावेळी इस्लामिक स्वयंसेवक संघाने कशाप्रकारे आगीत तेल ओतले, मदानी याने कशी भडक भाषणे केली, याचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. जोनक पुंथुरा या भागात हिंदू बहुसंख्य असल्याचे लक्षात घेऊन त्या भागावर हल्ला करण्याची ‘इस्लामिक स्वयंसेवक संघा’ची योजना होती. धर्मांध मुस्लिमांनी येथील एका संघशाखेवर केलेल्या हल्ल्यानंतर त्या भागात दंगल उसळली होती. मदानी यांच्या भडक भाषणामुळे अनेक मुस्लीम तरुण जहाल झाले. मदानी यांच्या जहाल भाषणामुळे लोक त्याचा उल्लेख ‘दहशतवादाचा दूत’ असा करीत असत, याची नोंद जयराजन यांनी आपल्या पुस्तकात घेतली आहे. केरळचे मार्क्सवादी नेते पिनाराई विजयन हे 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत मदानी याच्या समवेत प्रचारामध्ये सहभागी झाले होते. त्याच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक ज्येष्ठ नेता केरळमधील मुस्लीम युवक मदानी याच्यामुळे जहाल झाल्याचा स्पष्ट उल्लेख आपल्या पुस्तकात करतो. याचा अर्थ केरळमधील मार्क्सवादी पक्षात सर्व काही सुरळीत नाही, असा काढल्यास ते चुकीचे ठरणार नाही. “मदानी याच्यामुळे मुस्लीम युवक जहाल झाले,” असे जयराजन म्हणतात. पण, मदानी याच्याकडे डोळेझाक केल्यामुळे त्याने जहाल भाषणे केली हे विसरता कामा नये. मदानी हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी समर्थन दिल्यामुळे जास्त सोकावला असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. जयराजन यांच्या आगामी पुस्तकामुळे केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात किती मोठा भूकंप होतो, ते आता आगामी काळात पाहायचे!

 
समाजमाध्यमांची विश्वासार्हता घसरतेय : अजित डोवाल

समाजमाध्यमे परिवर्तन घडविण्यात जशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, तशीच ही माध्यमे समाजात अनेक गैरसमज निर्माण करून आपली विश्वासार्हता हळूहळू गमावत बसत असल्याचेही दिसून येते. जगातील काही देशांत समाजमाध्यमांमुळे सत्ताबदल झाले. त्यामुळे हे माध्यम अत्यंत प्रभावी आहे, हे मान्य करावेच लागेल. त्याचबरोबर हे माध्यम तितकेच ‘उपद्रव मूल्य’ निर्माण करणारे आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या समाजमाध्यमांचे चांगले- वाईट परिणाम आपण आज अनुभवत आहोत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही अलीकडेच एका कार्यक्रमात बोलताना, समाजमाध्यमांची विश्वासार्हता हळूहळू घसरत चालली असल्याचे म्हटले आहे. समाजमाध्यमांचा प्रभाव आणि परिणाम, या माध्यमांची विश्वासार्हता घसरत चालल्याने म्हणावा तितका राहिला नाही, असा याचा अर्थ! राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी समाजमाध्यमांकडून भारतीय संरक्षण दलांचे नीतिधैर्य खाची करण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले आहे. ते लक्षात घेऊन त्यास सडेतोड उत्तर देण्यासाठी योग्य तो विमर्श, सत्यकथन आवश्यक आहे, याकडे डोवाल यांनी लक्ष वेधले. अशा देशविघातक समाजमाध्यमांमुळे राष्ट्रीय ऐक्यास तडा पोहोचतो, हेही अजित डोवल यांनी निदर्शनास आणून दिले. अशा उपद्रवी समाजमाध्यमांना समाजमाध्यमांच्या द्वारेच प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे. “अत्यंत असत्य अशाप्रकारे जे काही कथन समाजमाध्यमांकडून केले जाते, त्याबाबत संशोधन करून त्यांचे कथन कसे खोटे आहे, हे लक्षात आणून दिले पाहिजे. त्यांच्या असत्यकथनाचे बुरखे फाडले गेले पाहिजेत,” असे अजित डोवाल म्हणाले. भारतीय लष्कराबद्दलच्या काही ‘पोस्ट’ संरक्षण दलांचे नीतिधैर्य खच्ची करणार्‍या आहेत, त्यांच्याकडून असा काही मजकूर प्रस्तुत केला जातो की, ज्यामुळे आपल्या जवानांचा आपल्या नेतृत्वाबद्दलच्या आत्मविश्वासाला तडा पोहोचू शकतो.अशा सर्व अपप्रचारास जोरदार आणि सडेतोड उत्तर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अजित डोवाल यांनी केले. समाजमाध्यमे समाजासमाजात, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहेच. काही समाजमाध्यमे अपप्रचार करून ही दरी आणखी कशी रुंदावेल अशा प्रयत्नात असतात. अशा माध्यमांना तर प्रत्युत्तर द्यायलाच हवे. पण, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी, समाजमाध्यमांच्या द्वारे आपल्या लष्कराचे मनोबल खच्ची करण्याचे प्रयत्न होत असल्याकडे लक्ष वेधले आहे. सर्व बाजूंनी अपप्रचाराचा धुरळा उडवून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न काही नतद्रष्ट मंडळी करीत आहेत. त्यासंदर्भात अत्यंत सतर्क राहून अशा अपप्रचारास समाजमाध्यमांच्या द्वारेच जशास तसे उत्तर देण्याची गरज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी अधोरेखित केली आहे.


गुरपतवंतसिंहचे दहा लाख डॉलर्सचे इनाम!

कॅनडा सरकारच्या जीवावर उड्या मारत असलेला खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंतसिंह पन्नू याला विविध इनामे घोषित करण्याची सवय जडली आहे. दिल्ली परिसरातील शेतकरी आंदोलनादरम्यान त्याने असेच एक इनाम घोषित केले होते. आता त्याने गृहमंत्री अमित शाह यांच्या विदेश भेटींच्या संदर्भात आगाऊ माहिती पुरविणार्‍या व्यक्तीस दहा लाख डॉलर्स इतके बक्षीस देण्याचे घोषित केले आहे. खरे म्हणजे, भारतविरोधी कारवाया केल्याबद्दल गुरपतवंतसिंह पन्नू हा भारतास हवा आहे. पण, कॅनडा किंवा अमेरिका त्यास भारताच्या ताब्यात देण्यास तयार नाहीत. उलट पन्नू याच्या हत्येचा कट रचण्यात आला असून, त्यामध्ये भारत सरकारचा हात आहे, असा आरोप त्या देशांकडून करण्यात आला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. भारतविरोधी कारवाया करण्यासाठी कॅनडा किंवा अमेरिका हे देश खलिस्तान समर्थक गुरपतवंतसिंह पन्नू याचा प्यादे म्हणून वापर करीत आहेत. एकीकडे, जगात दहशतवादाचा बीमोड झाला पाहिजे असे म्हणायचे, दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी जगातील देशांनी एक झाले पाहिजे, असे म्हणायचे आणि दुसरीकडे, भारताचे तुकडे करू पाहणार्‍या खलिस्तान समर्थकांना पाठीशी घालायचे, याला काय म्हणायचे? कॅनडा, अमेरिका ज्यांना अतिरेकी, दहशतवादी म्हणतील तेच अतिरेकी, बाकी तुम्ही कितीही उच्चरवाने सांगितले तरी, ते तुमचे ऐकण्यास तयार नाहीत. खलिस्तानी अतिरेकी कॅनडात आश्रयास आहेत, असे त्या देशास कळवूनही त्या देशाने त्यांच्यावर काही कारवाई केली नाही. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्रमुख असलेले गृहमंत्री अमित शाह यांच्या विदेश प्रवासाची आगाऊ माहिती देणार्‍यास या पन्नूने दहा लाख डॉलर्सचे बक्षीस घोषित केले आहे. खलिस्तानी अतिरेकी हरदिपसिंह निज्जर याची हत्या भारताच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप पनुन याने केला आहे. “कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात आपण असतो,” असा दावा गुरपतवंतसिंह याने अलीकडेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. कॅनडा सरकारच्या जीवावर पन्नू उड्या मारताना दिसत आहे. तो कॅनडाचा नागरिक असल्याच्या आधारावर कॅनडा सरकार त्याचे सर्व गुन्हे माफ करून भारतावरच आगपाखड करीत आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या विदेश प्रवासाविषयी अद्ययावत माहिती या पन्नूला कशासाठी हवी आहे, अशी विचारणा कॅनडा किंवा अमेरिका त्याच्याकडे करील का? त्याने दहा लाख डॉलर्सचे बक्षीस का आणि कशासाठी घोषित केले, अशी विचारणा त्याच्याकडे केली जाईल का? भारतविरोधी कारवाया करणारा तो एक दहशतवादी आहे, हे कॅनडा मान्य करील का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिली जात नाहीत. गुरपतवंतसिंहसारखे खलिस्तानी अतिरेकी अशा काही कारणांमुळे उजळ माथ्याने भारतविरोधी भूमिका घेत आहेत. पण, आज न उद्या भारत अशा दहशतवाद्यांना ताळ्यावर आणल्यावाचून राहणार नाही!

9869020732
Powered By Sangraha 9.0