कळवा - मुंब्यात लाडक्या बहिणींची नजीब मुल्लांना साथ; हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने अर्ज दाखल

    28-Oct-2024
Total Views |
kalwa mumbra constituency nomination
 

ठाणे :    राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, आरपीआय महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने सोमवारी भव्य शक्ती प्रदर्शन करीत नजीब मुल्ला यांनी मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुंब्रा कळवा के विकास के लिए नजीब है ना, मी नजीबची लाडकी बहीण अशा घोषणांचे फलक घेऊन लाडक्या बहिणींनी रॅलीत सहभाग घेतला होता.

यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्याक महामंडळाचे चेअरमन मुश्ताक अंतुले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक, शिवसेना उपनेते दशरथ पाटील, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजप आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आरपीआय (आठवले गट) ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, पीआरपी ठाणे जिल्हाध्यक्ष महेंद्र पवार आदीसह अनेक मा.नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

कळवा - मुंब्रा विधानसभेत शरद पवारांच्या पक्षाचे विद्यमान आ. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या नजीब मुल्ला यांनी दंड थोपटले आहेत. राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी असा हा सामना रंगणार आहे. सोमवारी नजीब मुल्ला यांनी मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळील दत्तवाडी येथुन भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. मुंब्रा कळवा के विकास के लिए नजीब है ना, मी नजीबची लाडकी बहीण अशा घोषणांचे फलक घेऊन हजारो लाडक्या बहिणी रॅलीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी शिवसेना, भाजप, रिपाई, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते झेंडे फडकवत, ढोलताशांच्या गजरात मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.

 
१५ वर्ष कृतीशुन्य कारभार करणाऱ्यांनी भाजपची खोटी भीती दाखवली

कळवा - मुंब्रा विधानसभा क्षेत्रात १५ वर्ष खोटी आश्वासने, कृतीशून्य कारभार करणाऱ्यांनी भाजपची खोटी भिती निर्माण केली. असा भंडाफोड करीत नजीब मुल्ला यांनी घोषणा कमी कृती जास्त करीत सर्व गोरगरीबांच्या संपर्कात राहून त्यांची कामे करणार असल्याचे सांगितले. तसेच, पाणी प्रश्न, सुविधा भूखंड अतिक्रमणापासून वाचवून त्यांचा विकास करणार, कळव्याची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी हायवेला जोडणारा काऊंटर रिंग रुट उभारणार, विटाव्याच्या पलिकडे नवीन पूल, पारसिकसाठी नवीन सर्विस रोड बांधणार असल्याचे आश्वासित करून नजीब मुल्ला यांनी, मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी आपल्या भावाला, आपल्या मुलाला विजयी करा, असे आवाहन केले.

 

आव्हाडांना मुंब्य्रात स्वपक्षातुन ठसन
 
ठाण्याच्या कळवा- मुंब्रा मतदार संघात शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांना स्वपक्षातून ठसन मिळाल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. आव्हाड यांच्या पॅम्फ्लेटवर फोटो न छापल्यामुळे नाराज झालेल्या अल्पसंख्यांक विभागाचे नेते युनूस शेख यांनी रविवारी आव्हाडांसमोर रागदारी आळवली. यावेळी दोघांमध्ये भर चौकात शा‍ब्दिक बाचाबाची देखील झाली. दोघांमध्ये नेमका कशावरून वाद झाला हे स्पष्ट नसलं तरी हाणामारी पर्यंत हा वाद पोहचला होता. अखेर, अन्य पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला असला तरी कॅमेऱ्याने हे अचुक टीपुन व्हायरल झाले.