मुंबई : सूटिंग फॅब्रिक उत्पादक कंपनी रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांना 'लेम्बोर्गिनी'च्या नवीन कारमधील दोषास सामोरे जावे लागले. 'लेम्बोर्गिनी'च्या नवीन रेव्हुल्टो कारमधील दोषाला सिंघानिया यांना सामोरे जावे लागले आहे. सिंघानिया यांना कारमधील दोषामुळे रस्त्याच्या मधोमध अडकून राहावे लागले. या सगळ्या प्रकारावर गौतम सिंघानिया यांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, दि. ०३ ऑक्टोबर रोजी मुंबईत चाचणी मोहिमेदरम्यान त्यांच्या नवीन लॅम्बोर्गिनी रेव्हुल्टो कारमध्ये समस्या निर्माण झाली. या घटनेनंतर सिंघानिया यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत कंपनीचे भारत प्रमुख शरद अग्रवाल आणि आशिया प्रमुख फ्रान्सिस्को स्कार्डोनी यांनी संपर्क साधला नसल्याचे सांगितले. कार डिलिव्हरीनंतर अवघ्या १५ दिवसांनी कारमध्ये बिघाड झाला त्यामुळे कारच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मला आश्चर्य वाटते की कंपनीचे भारतातील प्रमुख शरद अग्रवाल आणि एशिया प्रमुख फ्रान्सिस्को स्कार्डोनी यांनी एकदाही ग्राहकाला काय त्रास होत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, अशा आशयाची पोस्ट 'एक्स'वर करत कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे उद्योगपती गौतम सिंघानिया हे लक्झरी कारचे शौकीन असून त्यांच्याकडे फेरारी 458, ऑडी Q7 आणि लॅम्बोर्गिनी गॅलार्डो सारख्या अनेक आलिशान कार आहेत.