भारतातील मुस्लीम पॅलेस्टाईनमधील मुस्लिमांना पाठिंबा दर्शवू शकतात, तर भारतातील हिंदू बांगलादेशच काय, जगातील कोणत्याही देशातील हिंदूंबद्दल आपलेपणा दाखवू शकतात. तसेच, उघडपणे सेक्युलॅरिझमचा नामजप करणारे पाकिस्तान-बांगलादेशातील मुस्लीम राज्यकर्ते हे त्यांच्या देशातील हिंदूंवरील हल्ल्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसतात. मग, तो राज्यकर्ता ‘नोबेल पुरस्कार’विजेता का असेना! भारतात लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता धोक्यात आल्याची ओरड करणारे हिंदू-मुस्लीम नेते बांगलादेशात या दोन गोष्टी पुनर्स्थापित करण्याबद्दल अवाक्षर काढीत नाहीत, हेही लक्षात घेतले पाहिजे.
बांगलादेशातील अल्पसंख्य समाज असलेले हिंदू हे आता जिवावर उदार होऊन रस्त्यावर उतरले आहेत. ऑगस्टमध्ये त्या देशात लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार हिंसक मार्गाने उलथवून टाकण्यात आले आणि त्यानंतर निर्माण झालेले त्या देशातील अराजक अजून संपण्याची चिन्हे नाहीत. भारतात संविधान आणि लोकशाही धोक्यात असल्याची अनाठायी ओरड करणारे अनेक भंपक सेक्युलर हिंदू-मुस्लीम नेते बांगलादेशात लोकशाही आणि सेक्युलॅरिझम पुनर्स्थापित करण्याबद्दल अवाक्षर काढीत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे.
या अराजकतेचा सर्वात मोठा फटका त्या देशातील अत्यल्प हिंदू समाजाला बसला आहे. शेख हसीना यांचे सरकार उलथवून टाकल्यावर तेथील कट्टर मुस्लीम धर्मांधांनी हिंदू समाजाला आपले लक्ष्य बनविले. एकीकडे, शेख हसीना यांचे सरकारी निवासस्थान लुटले जात होते आणि त्या सरकारमधील मंत्र्यांवर हल्ले होत होते, त्याचवेळी त्या देशातील हिंदूंची घरे जाळली जात होती आणि अनेक हिंदूंना भर रस्त्यात गोळ्या घालून आणि लाथाबुक्क्यांनी ठार मारले जात होते, हे जगाने पाहिले. (अशीच दृष्ये प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर दिसत होती, हे साम्यही लक्षात घेण्यासारखे आहे.) या भयावह स्थितीमुळे त्या देशातील हिंदू समाज एकवटला असून, त्याने एक होऊन चित्तगाँगच्या रस्त्यांवर मोठी निदर्शने केली. त्या शहरातील ऐतिहासिक लालदिघी मैदानावर सनातन जागरण मंचाने एका प्रचंड सभेचे आयोजन केले होते.
त्यात हिंदूंच्या जीवित आणि वित्ताचे संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. या अराजकानंतरच्या हिंसाचाराला घाबरून अनेक हिंदू कुटुंबे भारतात आली असून, आणखी येण्याच्या प्रयत्नात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी मात्र बांगलादेशी हिंदूंनी देश सोडून भारतात न येण्याचे आवाहन करताना, त्या देशातील सरकारने हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच, या कामी संयुक्त राष्ट्रांनी सक्रिय लक्ष घालण्याचेही आवाहन केले. कारण, संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या आकडेवारीनुसार यंदा दि. 16 जुलै ते दि. 11 ऑगस्ट या काळात निदान 650 हिंदूंची हत्या करण्यात आली होती. या संस्थांकडून नेहमीच कमीत कमी आकडेवारीवर भर दिला जातो, हे लक्षात घेता, मृतांचा हा आकडा खूपच अधिक असण्याची शक्यता आहे.
बांगलादेशात अधिकृतपणे सरकार अस्तित्त्वात नाही. पण, ‘नोबेल पुरस्कार’विजेते मोहम्मद युनूस यांची तात्पुरत्या सरकारचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. थोडक्यात, युनूस हेच सध्या हंगामी सरकार आहेत. पण, आपल्या देशातील अल्पसंख्य समाजाच्या जीविताचे रक्षण करण्यात त्यांना अपयश येत आहे. त्याबद्दल त्यांनी खंत तर व्यक्त केलेली नाहीच. उलट, काही दिवसांपूर्वी त्यांनी या हल्ल्यांना अवास्तव प्रसिद्धी दिली जात असल्याची तक्रार केली आहे. हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना किरकोळ असून, त्या प्रमाणाबाहेर मोठ्या करून दाखविल्या जात असल्याचा दावाही त्यांनी केला होता. तसे असेल, तर चित्तगाँगच्या मैदानात लाखोंच्या संख्येने हिंदू समाज का एकवटला होता, त्याचे उत्तर त्यांनी द्यावे.
बांगलादेशात सध्या हिंदू सुरक्षित नाहीत. शेख हसीना यांचे सरकार असतानाही हिंदूंवर हल्ले होत असले, तरी सरकारकडून कारवाई केली जात असे. पण, हिंसाचाराच्या मार्गाने शेख हसीना यांना परांगदा केल्यावर तेथील जिहादींना उन्माद चढला असून, त्यांनी असाहाय्य हिंदूंना ठार मारण्याचा सपाटा लावला आहे. जे हिंदू भारतात येऊ शकत नाहीत, त्यांचे जीवन नरक बनले आहे. त्यांना कसल्याही सुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत आणि आपल्या देवतांच्या पूजेवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. नुकत्याच संपलेल्या नवरात्रीच्या काळात बांगलादेशातील हिंदूंना दुर्गापूजा सार्वजनिकरीत्या साजरी करता आलेली नाही. काही शहरांमध्ये जिहादी सत्ताधार्यांनी त्यासाठी लाखो रुपयांचा जिझिया कर बसविला केला होता. असे असले, तरी बांगलादेशातील हिंदूंनी स्थलांतर करू नये आणि त्या देशातच राहावे, असे आवाहन होसबळे यांनी केले आहे. बंगालीभाषिक हिंदूंची ती मायभूमी आहे.
तसेच, बांगलादेशात एक शक्तिपीठही आहे. म्हणून यापूर्वीही मुस्लिमांच्या अत्याचारांना भिऊन ज्या हिंदूंनी आपल्या मायभूमीतून स्थलांतर केले, त्या हिंदूंना पुन्हा आपल्या मायभूमीत परतणे शक्य झालेले नाही. भारतात काश्मिरी पंडितांना आजही काश्मीर खोर्यात सुरक्षितपणे जगता येईल, याची खात्री वाटत नाही. ज्या पंडितांनी 90च्या दशकात तेथून पलायन केले, त्यांची सारी संपत्ती स्थानिकांनी आपल्या घशात घातली. काश्मीरमधील अनेक मंदिरांचे आता भग्नावशेष शिल्लक राहिले आहेत. हिंदूंच्या अभावी तेथील मुस्लिमांना त्या संपूर्ण भूमीवर आपला हक्क दाखल करता आला. अफगाणिस्तानातही हीच परिस्थिती आहे. म्हणूनच बांगलादेशातील हिंदूंनी तेथे घट्टपणे पाय रोवून राहावे, असे आवाहन होसबळे यांनी केले आहे.
भारत सरकारने बांगलादेशातील विद्यमान राज्यकर्त्यांना त्या देशातील अल्पसंख्याकांच्या जीवित व वित्ताचे रक्षण करण्याचा इशारा दिला आहे. भारत तेथे थेट हस्तक्षेप करू शकत नाही. मात्र, भारतातील हिंदूंनी त्यासाठी दबाव आणण्याची गरज आहे. भारतातील मुस्लीम पॅलेस्टाईनमधील मुस्लिमांच्या बाजूने उभे राहू शकतात. त्यासाठी ते भारतात निदर्शने आणि प्रसंगी दंगलीही घडवितात. तसे असेल, तर भारतातील हिंदूंनीही बांगलादेशातील हिंदूंना नैतिक पाठिंबा देण्यासाठी भारतात आंदोलने केली पाहिजेत. निदान मोर्चे-निदर्शने तरी केली पाहिजेत. तसेच, सरकारनेही यासंदर्भात बांगलादेशावर दबाव वाढविण्याची गरज आहे. मोदी सरकारच्या ‘सीएए’सारख्या कायद्यांची गरज बांगलादेशाने नव्याने आणि निकडीने दाखवून दिली आहे. जे या कायद्याला विरोध करतात, ते भारताच्या शेजारी देशांतील अल्पसंख्य हिंदूंच्या हत्याकांडाचे समर्थन करतात, असेच म्हणावे लागेल.