ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. भिवंडी पश्चिम येथे भरारी पथक व नारपोली पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत संशयित वाहनांमध्ये रू. ३ लाख ३१ हजार ६०९ रुपयांचा मुद्देमाल विनातपशील आढळला असून ज्यात चांदी व चांदीचे काम असलेल्या वस्तूंची बिले तपासणीदरम्यान सादर न केल्याने भरारी पथकाने हा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
भिवंडी पश्चिमचे भरारी पथक क्र. ७ व नारपोली पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत रविवारी पहाटे ३ वाजता एक संशयित वाहन ताब्यात घेण्यात आले. या वाहनामध्ये असलेल्या सामानाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता वाहनचालक व गाडीतील इतर कर्मचाऱ्याना सामानाबाबत कोणतीही माहिती देता न आल्याने पोलिसांनी ही गाडी नारपोली पोलीस ठाण्यात आणली. पोलीस व भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी गाडीतील साहित्य कुरिअर एजन्सीच्या मालक व पंचासमक्ष गाड़ीतुन उतरावला. संशयित वाहनात एकुण ७३ छोटे मोठे बॉक्स होते.
यातील ७२ बॉक्समध्ये २ कोटी ८ लाख १७ हजार ८२० रुपये किमतीचा सोने, चांदी व गिफ्ट आर्टिकल असा मुद्देमाल होता. तपासणी दरम्यान संबंधित कुरिअर चालकाने ६० बॉक्समधील ऐवजांची बिले सादर केली. उर्वरित बॉक्समध्ये असलेल्या रू.३ लक्ष ३१ हजार ६०९/- चा मुद्देमाल ज्यात चांदी व चांदीचे काम असलेले गिफ्ट आर्टिकलचे बिल संबंधिताना सादर करता आले नाही. याबात पोलीस अधिक तपास करीत आहेत.