रायगड : पनवेल विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सलग तीनदा आमदार राहिलेले प्रशांत ठाकूर यांनी शक्तीप्रदर्शन करत पनवेल येथे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर त्यांच्याविरोधात शेकापचे बाळाराम पाटील यांना उमेदवारी जाहीर आली आहे.
राज्यभरात अनेक विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. अशातच राज्यातील चर्चेत असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणून पनवेलची ओळख आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात प्रशांत ठाकूर विरुद्ध बाळाराम पाटील यांच्यात लढत होणार आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास शहरी भागातील मतदान हे प्रशांत ठाकूर यांची व्होट बँक आहे असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. तर दुसरीकडे शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना पनवेल ग्रामीण भागातील मतदारांचा पाठिंबा आहे.
पनवेल शहर, कळंबोली, कामोठे, खारघर अशा शहरी भागांमध्ये प्रशांत ठाकूर यांचे मतदान अधिक आहे. तर दुसरीकडे पनवेल ग्रामीण भाग जसे की, रोहिंजण, नावडे, तळोजे इतर ग्रामीण भागात शेकापचा मतदार अधिक आहे. मात्र ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागाचे मतदान अधिक असल्याचा फायदा प्रशांत ठाकूर यांना झाला असल्याने ते निवडूण आले आहेत.
पनवेल विधानसभा निवडणूक २०१९ चा मागोवा
तर दुसऱ्या बाजूला बाळाराम पाटीलही कंबर कसून आहेत. आपली व्होट बँक असणाऱ्या ग्रामीण भागात प्रचार करत आहेत. मात्र, पनवेलचा मागोवा पाहिल्यास २०१९मध्ये प्रशांत ठाकूर यांच्याविरोधात हरेश केणी हे शेकापचे उमेदवार होते. प्रशांत ठाकूर यांना एक लाख ७८ हजार ५८१ मतांनी विजयी झाले होते, तर दुसरीकडे हरेश केणी यांनी ८६ हजार २११ मते होती. तर 'नोटा'ला १२ हजार ३७१ मते मिळाली होती.