मुंबई, दि.२८ : भारतातील मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नॅशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आत्तापर्यंत ६६ हजार ३२६ कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकूण किंमत १ लाख आठ हजार कोटी रुपये इतकी असल्याने प्रकल्पाने सप्टेंबर महिन्यापर्यंत ६१. ४० टक्के इतकी आर्थिक प्रगती साध्य केली आहे. प्रकल्पाच्या एकूण किंमतीमध्ये जमीन अधिग्रहण, बांधकाम आणि रुळांच्या कामांसह इतर खर्चाचा समावेश आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सिव्हिल कामांसाठी गुजरात राज्यात पहिले कॉन्ट्रॅक्ट नोव्हेंबर २०२० मध्ये अवॉर्ड करण्यात आले होते. याभागातील प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम एप्रिल २०२१मध्ये सुरु करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये मात्र बुलेट ट्रेनचे काम २०२३ मध्ये सुरु करण्यात आले होते. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम २८ पॅकेज मध्ये प्रगतीपथावर असून त्यामध्ये एकूण १२ स्थानके असणार आहेत. नॅशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मुंबई अहमदाबाद दरम्यान ५०८ किमी लांब बुलेट ट्रेन प्रकल्प प्रगतीपथावर आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरात आणि महाराष्ट्र राज्यातील सिव्हिल कामे, डेपो, ट्रॅकच्या कामांसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून फक्त महाराष्ट्रामध्ये ट्रॅकच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रकल्पाची आर्थिक प्रगती
२०२४- २५ (आर्थिक वर्षांमध्ये) - ५,९४९ कोटी रुपये
प्रकल्प सुरु झाल्यापासून
सप्टेंबर २०२४ पर्यंत - ६६,३२६ कोटी रुपये
प्रकल्पाची एकूण किंमत - १,०८,००० कोटी रुपये