मुंबई : ध्यास कवितेचा काव्य मंच मुंबई आणि ज्ञानदा वाचनालय उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या आनंदात आणि वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून "काळजात मराठी अभिजात मराठी" हे कवीसंमेलन नुकतेच उल्हानगर येथे मोठ्या दिमाखात पार पडले.
दरम्यान या कवी संमेलनाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवी गझलकार प्रशांत दादा वैद्य यांची तर विशेष अतिथी म्हणून ज्ञानदा वाचनालयाचे अध्यक्ष श्री सुरेंद्र सावंत यांची उपस्थिती लाभली. तसेच या कार्यक्रमाला कल्याण विभाग शिवसेना जिल्हाप्रमुख मा. धनंजय बोडारे यांनी धावती भेट देवून आयोजकांचे कौतुक केले. याप्रसंगी बोलताना सुप्रसिद्ध कवी गझलकार प्रशांत दादा म्हणाले की, आजचा कवी समाज घडवू शकतो इतकी ताकद त्यांच्या लेखणीत आहे. समाजाची व्यथा मांडणारी कविता आजचा कवी लिहीत आहे. ध्यास कवितेचा काव्य मंच हा नुसता मंच नसून माझ्या अभिजात मराठीसाठी सुरू केलेली एक चळवळ आहे. असे गौरव उद्गार त्यांनी काढले. ह्यावेळी त्यांनी आपल्या कविता गझल सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. यावेळी व्यासपीठावर ध्यासचे संस्थापक/अध्यक्ष कवी संदेश भोईर, सचिव कवी श्याम माळी, कार्याध्यक्ष श्रीकांत पवार, महिला विभाग प्रमुख स्नेहाराणी गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव श्याम माळी यांनी तर खुमासदार निवेदन सुनीता काटकर आणि ध्यासचे प्रसिध्दी प्रचार प्रमूख गुरुदत्त वाकदेकर यांनी तर आभार प्रदर्शन ध्यासचे अध्यक्ष कवी संदेश भोईर यांनी केले. उपस्थीत कवींना आकर्षक सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी कवयित्री अश्विनी म्हात्रे, कवी नीतुराज पाटील, कवी जयंत पाटील, कवी जयेश मोरे, कवी विक्रांत लाळे, सुप्रसिध्द ग्राफिक डिझाईनर आपला बंड्या, ज्ञानदा वाचनालयाचे कार्यवाह वैभव कोंडूरकर, खजिनदार राकेश कांबळी, ग्रंथपाल दर्शना गावडे, सह ग्रंथपाल केतकी सावंत यांनी मेहनत घेतली.
ध्यास कवितेचा काव्य मंच मुंबई ही एक काव्यक्षेत्रात काम करणारी नावाजलेली संस्था असून वाचन संस्कृतीला प्रेरणा मिळावी म्हणून गेली नऊ वर्षे माय मराठीचा जागर अविरतपणे करत आहे. २०२३ पासुन ध्यासने "कविता आपल्या दारी" हा उपक्रम हाती घेतला असून त्या अनुषंगाने ध्यास कवितेचा काव्य मंच आणि ज्ञानदा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे कवी संमेलन उल्हासनगर येथे पार पडले. ह्यावेळी ५५ कवींनी उस्फुर्त सहभाग नोंदवून माय मराठीच्या बहारदार कविता सादर केल्या.