दिवाळी विशेष : पहिल्यांदाच २८ लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या नगरी

28 Oct 2024 17:13:46

Diwali in Ayodhya

मुंबई (विषेश प्रतिनिधी) : (Diwali in Ayodhya)
अयोध्येत झालेल्या श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर यावर्षी पहिल्यांदाच भव्य प्रमाणात दिवाळी साजरी केली जाणार आहे. याकरीता उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने विशेष योजना आखली आहे. तब्बल २८ लाख दिवे दीपावलीच्या शुभमुहुर्तावर प्रज्वलित केले जाणार आहेत. अयोध्येत नवा विक्रम होणार असल्याची माहिती आहे.

हे वाचलंत का? : केरळच्या मच्छीमारांची हकालपट्टी करू पाहणाऱ्या वक्फ बोर्डाविरोधात तीव्र निदर्शने

यादिवशी अयोध्येतील सरयू घाट आणि श्रीराम मंदिरासह इतर ठिकाणी २८ लाख दिवे प्रज्वलित केले जातील. सध्या दिवे लावण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी विशेष स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली असून हे काम धनत्रयोदशीपूर्वी पूर्णत्वास येईल. अयोध्येतील ५५ घाटांवर हे दिवे लावण्यात आले आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद व्हावी यासाठी त्यांच्या एका टीमलाही आमंत्रित करण्यात आले आहे.

प्राणप्रतिष्ठेनंतरची पहिली दिवाळी भव्यदिव्य करण्यासाठी आपण कोणतीही कसर सोडणार नसल्याचे या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवकांचे म्हणणे आहे. या कामात ३० हजार स्वयंसेवकांचा सहभाग आहे. अयोध्येत प्रज्वलित होणाऱ्या दिव्यांसाठी ९२ हजार लिटर मोहरीचे तेल वापरण्यात येणार आहे. अयोध्येत या दिव्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि सुरक्षा दलही तैनात करण्यात आले आहेत. घाटांव्यतिरिक्त मंदिर परिसरातही दिवे लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य प्रांगणासाठीही विविध प्रकारचे दिवे लावण्यात आले आहेत.

मंदिरात विशेष दिव्यांची व्यवस्था
मंदिराच्या आत लावले जाणारे दिवे काजळी आणि धूर सोडणार नाहीत. यामुळे मंदिराच्या भिंती आणि दगडांवर खुणा आणि डाग न पडण्यास मदत होणार आहे. मंदिराच्या गर्भगृहासाठी विविध प्रकारचे दिवे बनवण्यात आले आहेत. गर्भगृहाव्यतिरिक्त मंदिर परिसरातही १ लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. हे दिवे मोहरीच्या तेलाने जळतील. मंदिरात दिव्यांशिवाय फुलांची सजावटही करण्यात आली आहे. राम मंदिर ५० क्विंटल फुलांनी सजवण्यात येत आहे. यासोबतच मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांवर कमानी बांधण्यात आल्या आहेत.

Powered By Sangraha 9.0