मुंबई, दि. २८ :अटल बिहारी वाजपेयी स्मृती शिवडी न्हावा शेवा अटल सेतू नागरी सेवेत दाखल झाला आहे. समुद्रातून जाणाऱ्या या मार्गाने प्रवास करण्यास आणि नवी मुंबई ते दक्षिण मुंबई हे अंतर कमी वेळेत पार करण्यात अटल सेतू महत्वाची भूमिका बजावत आहे. याच पार्श्वभूमीवर आता अटल सेतू प्रभावित क्षेत्रात रायगड येथे हा पूल जिथे उतरतो आणि सुरु होतो तिथे विविध सुविधा उभारण्यासाठी एमएमआरडीएने सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणजे जासई येथे सर्वसुविधांनी सज्ज फूड कोर्ट आणि पेट्रोल पंप उभारण्यासाठी एमएमआरडीएने निविदा काढल्या आहेत.
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात जासई येथे अटल सेतू प्रकल्प स्थळावरील पेट्रोल पंपासाठी आरक्षित असलेल्या ठिकाणी वेसाइड सुविधांचे संचालन आणि देखभाल यासह व्यावसायिक सुविधा, घटकांचे नियोजन, डिझाइन, अभियांत्रिकी, वित्तपुरवठा, बांधकाम, विकास यासाठी एमएमआरडीएने निविदा काढल्या आहेत. याजागेत दोन फूड प्लाझा आणि दोन पेट्रोल पंपांची उभारणी करण्यात येईल.
३०वर्षांच्या कालावधीसाठी संबंधित कंपनीला हे कंत्राट देण्यात येईल. पेट्रोल पंप, मोटेल, वेसाइड रेस्टॉरंट, सर्व्हिस स्टेशन, हायवे मॉल्स, हायपर मॉल्स, सार्वजनिक सुविधांसह शौचालये इत्यादी सुविधांसाठी केवळ या परिसराचा वापर करता येणार आहे. वेसाइड सुविधांच्या विकासासाठी राज्य आणि केंद्राच्या विकास नियंत्रण विनियम कायदे किंवा नियमांनुसार परवानगी असलेल्या इतर घटकांचा विकास करण्याचे बोलीदाराला स्वातंत्र्य असेल.
पुढील सुविधा उभारणे आवश्यक
- कारसाठी पार्किंगची जागा
- गॅरेज; वाहनांच्या किरकोळ दुरुस्ती आणि सेवांसाठी
- शौचालये: पुरुष, महिला आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांसाठी स्वतंत्रपणे
- रेस्टॉरंट/फास्ट फूड/ढाबा: कॅफेटेरिया, जेवण, फास्ट फूड, हँडवॉश एरिया
सेवा क्षेत्राच्या ऑपरेशन आणि देखभालीसाठी
- सांडपाणी विल्हेवाट लावण्याची व्यवस्था
- 24 x 7 पाणी आणि वीज सुविधा
- पाणी साठवण टाकी, सांडपाण्याचा पुनर्वापर
- सेप्टिक टॅंक आणि रेन हार्वेस्टिंग
- वीज पुरवठा आणि डीजी संच
- प्रथमोपचार
- कचरा विल्हेवाट लावण्यासाठी डबे