कोल्हापूर : ( Kolhapur ) काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. त्यानंतर कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. शनिवारी दि. २६ ऑक्टोबर रात्री साडे बाराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. यामुळे सध्या कोल्हापूरचे राजकारण वादाचा मुद्दा ठरत आहे.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघ महाविकास आघाडीच्या वाट्याला आला मात्र पहिल्या दोन यादीत उमेदवार निश्चित झाला नाही. अशातच काँग्रेसची शनिवारी तिसरी यादी समोर आली. त्या यादीत माजी नगरसेवक राजेश लाटकर यांचे नाव आले त्यानंतर कोल्हापूरमध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दंगा झाला.
काही कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व त्यांनी कार्यालयावर हल्ला केला. त्यावेळी दगडफेक करत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर काळं फासलं. राजेश लाटकर यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यामुळे कोल्हापूरातील घटनास्थळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.