निवडणुकीआधीच काँग्रेसच्या सचिन सावंतांची माघार, मतदारसंघ बदलण्याची पक्षाकडे मागणी!

27 Oct 2024 17:43:23

sachin sawant
 
( Image Source : ANI ) 
 
मुंबई : ( Sachin Sawant distressed with Andheri West Seat ) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर जागावाटपांचे फॉर्म्युले, उमेदवारांच्या याद्या, नाराजीनाट्य, बंडाळी, पक्षांतरण यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. नुकतंच काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. या तिसऱ्या यादीमध्ये अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून सचिन सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु सचिन सावंत यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
 
सचिन सावंत यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी हवी होती, मात्र तेथे शिवसेना उबाठा गटाचे वरुण सरदेसाई उमेदवारी देण्यात आली आहे. सावंत मात्र या जागेसाठी आग्रही आहेत. त्यांनी याबाबत काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांना विनंती केली आहे. सचिन सावंत यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मिळालेली उमेदवारी नाकारली आहे. तसेच त्यांनी याबद्दल नाराजी दर्शवत मतदारसंघ बदलून देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता या जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच पाहण्यास मिळणार आहे.
 
सावंत यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटले आहे?
 
“मी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तिथेच लढावे अशी माझी इच्छा होती. परंतु तो मतदारसंघ शिवसेना उबाठा पक्षाकडे गेला आहे. मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद! परंतु मी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला यांना पक्षाने निर्णय बदलावा याकरिता विनंती केली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील ही आशा बाळगतो.” अशी पोस्ट सचिन सावंत यांनी केली आहे.
 
 
 
महायुतीकडून भाजपचे अमित साटम रिंगणात
 
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अमित साटम हे महायुतीचे उमेदवार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अमित साटम यांनी ६५,६१५ मते मिळवून काँग्रेसच्या अशोक जाधवांचा पराभव केला होता. ते दोनवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे आता काँग्रेसकडून अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवार बदलला जाणार की सचिन सावंत यांना लढण्याचा आदेश दिला जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
 
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून कोण निवडून आलं होतं?
 
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व या मतदारसंघातून झिशान सिद्दिकी विजयी झाले होते. मात्र यावेळी हा मतदारसंघ शिवसेना उबाठा गटाकडे गेला आहे. त्यामुळे नाराज झिशान सिद्दिकींनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आता वरुण सरदेसाईंना हा मतदारसंघ गेल्याने सचिन सावंतही नाराज आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0