मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांना आणखी एक पुरस्कार मिळाला आहे. आरबीआय गव्हर्नर दास यांना सर्वोच्च सेंट्रल बँकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर, 'A+' रेटिंग मिळालेल्या तीन सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरांच्या यादीत गव्हर्नर दास पहिल्या स्थानावर आहेत. डेन्मार्क ख्रिश्चन केटेल थॉमसेन आणि स्वित्झर्लंड थॉमस जॉर्डन यांनाही केंद्रीय बँकर्सच्या 'A+' श्रेणीत स्थान मिळाले आहे.
हे वाचलंत का? -
चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत महागाईत घट होण्याची शक्यता
दरम्यान, 'ग्लोबल फायनान्स' या अमेरिकन मासिकाने सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून गव्हर्नर दास यांना स्थान दिले आहे. त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी जागतिक स्तरावर सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून स्थान मिळवले आहे. आरबीआयने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित कार्यक्रमात 'ग्लोबल फायनान्स'तर्फे मिळालेल्या सन्मानाबाबत माहिती दिली.
गव्हर्नर शक्तिकांत दास यांना सलग दुसऱ्या वर्षी सेंट्रल बँक रिपोर्ट कार्ड २०२४ मध्ये 'A+' प्रदान करण्यात आला आहे. 'ग्लोबल फायनान्स' मासिकाने एका निवेदनात म्हटले आहे की, महागाई, आर्थिक वाढीचे लक्ष्य, चलन स्थिरता आणि व्याजदर व्यवस्थापनात यश मिळविल्याबाबत 'ए' ते 'एफ' स्केलवर रेटिंग देण्यात आले आहे. यात 'ए' उत्कृष्ट कामगिरी तर 'एफ' पूर्ण अपयश दर्शविते.