निवृत्ती ही मनाला चटकाच लावणारी असते. भारताच्या दोन सुकन्यांनी देखील निवृत्ती जाहीर केली आहे. दीपा करमाकर आणि राणी रामपाल यांनी निवृत्ती जाहीर केली असली, तरी खेळाप्रतीची समर्पण भावना संपवलेली नाही. म्हणूनच त्या आता देशाचे क्रीडा भविष्य घडवण्याकडे जातीने लक्ष देणार आहेत. या दोन्ही कन्यांच्या क्रीडा कारकीर्दीचा घेतलेला हा आढावा...
ऑक्टोबरचा प्रारंभीचा अन् शेवटचा आठवडा, आपल्याला दोन भारतीय कन्यांच्या क्रीडा निवृत्तीच्या वार्ता देऊन गेला. क्रीडांगणात आपल्या क्रीडा नैपुण्याचे सादरीकरण करत क्रीडाप्रेमींच्या मनावर साम्राज्य गाजवणार्या त्या दोन साम्राज्ञी, आता आपल्याला दोन वेगळ्या पवित्र्यात स्थानापन्न होताना दिसणार आहेत. त्यातील एक सम्राज्ञी आहे, त्रिपुराच्या करमाकरांची दीपा, तर दुसरी हरियाणाच्या रामपालांची राणी. लहानपणापासून पालकांकडून प्रोत्साहित झालेली एक जिम्नॅस्ट बाहुली, तर दुसरी स्टीकची राणी.
स्टीकची राणी :
दिल्लीच्या मेजर ध्यानचंद क्रीडागाराच्या मैदानात दि. २४ ऑक्टोबरच्या गुरुवारी, भारतीय पुरुष संघाविरुद्ध जर्मन पुरुषांचा द्विपक्षीय हॉकी मालिका 2024च्या समाप्तीनंतर झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात ,‘भारतीय हॉकीची राणी’ म्हणून जगद्विख्यात असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपाल हिने, आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली. भारतीय महिला हॉकीच्या या सम्राज्ञीने आपले सगळे लक्ष आता केंद्रित केले आहे ते, भावी हॉकीपटू घडवण्यासाठी. त्यांना हॉकीचे प्रशिक्षण देत, क्रीडा क्षेत्रात येऊ इच्छिणार्या युवतींचे पालनपोषण करण्याचे तिने ठरवले आहे.
राणी एप्रिल २००८ मध्ये रशियातील कझान येथे ऑलिम्पिक पात्रता फेरीत मैदानात उतरली. तिच्या अवघ्या १४ वर्षांच्या वयात सुरू झालेला राणीचा प्रवास, क्रीडाप्रेमींनी बघितला आणि तिला भारतीय महिला हॉकी संघाची सर्वात तरुण खेळाडू म्हणून ते राणीला ओळखू लागले. २०२०च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत, ऐतिहासिक चौथ्या स्थानासह तिने भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले.
शाहबाद मार्कंडा, हरियाणात जन्मलेली राणी घरची परिस्थिती प्रतिकूल असूनही, दिग्गज प्रशिक्षक बलदेव सिंग यांच्या अकादमीतून प्रेरणा घेऊन ती आशेचा किरण म्हणून उदयास आली. बालवयात प्रामुख्याने मुलींना बाहुलीशी खेळायला आवडते. मुली आपल्या आईबाबांकडे खेळायला बाहुलीचा हट्ट करताना आढळून येतात. पण काही मुलींचा हट्ट वेगळाच, मुलांप्रमाणेच असतो. राणीचा हट्टदेखील मुलांप्रमाणेच होता. तिच्या गावात घरोघरी लोकप्रिय असलेला हॉकी हा खेळ आपणही खेळावा, म्हणून वडिलांकडे तिने हॉकी स्टीकची मागणी केली होती. घोडागाडी चालवून मिळणार्या कमाईवर, कुटुंबाची गुजराण करणार्या राणीच्या बाबांनी तिची ती मागणी मान्यही केली. द्रोणाचार्य पुरस्कारविजेते बलदेव सिंग यांच्या अकादमीत, अवघ्या सात वर्षांची असताना तिला हॉकीचे बाळकडू मिळू लागले. हॉकीत मुलींनी मुलांप्रमाणेच अर्ध्या चड्डीत खेळायला जावे लागणार, म्हणून लोकांनी तेव्हा नाकसुद्धा मुरडले होते. पण आज त्याच लोकांना देशाचा ट्रॅकसूट, जर्सी परिधान केलेल्या राणीचा सार्थ अभिमान वाटत आहे.
राणी तिच्या निवृत्तीबद्दल सांगते की, भारतीय जर्सी अभिमानाने परिधान केल्यानंतर, जवळपास १५ वर्षे माझ्यासाठी आता नवीन अध्याय सुरू करण्याची वेळ आली आहे. हॉकी ही माझी आवड, माझ्या जीवनात मिळालेला तो सर्वात मोठा सन्मान आहे. छोट्या सुरुवातीपासून ते मोठ्या टप्प्यांवर भारताचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंतचा हा प्रवास, अवर्णनीय आहे. ती तिच्या निवेदनात पुढे सांगते की, भारतासाठी खेळताना मला खूप ओळख मिळाली. पण मी संघासोबत सराव करताना आणि कठीण संघांना एकत्र तोंड देताना घालवलेले क्षण, मला सर्वात जास्त आवडतील. असाच एक क्षण टोकियो ऑलिम्पिकमध्ये होता, जिथे आम्ही सगळे वैतागलो होतो. एकमेकांशी वादविवाद करत, प्रतिस्पर्ध्यावर तुटून पडत होतो. त्या एकजुटीने आम्हाला काही कठीण संघांवर विजय मिळवून दिला. मला खात्री आहे की, असा भारतीय महिला हॉकी संघ भविष्यात उत्कृष्ट कामगिरी करेल, याचा मला अभिमान आणि विश्वास वाटतो. मी माझे संघसहकारी, प्रशिक्षक आणि प्रत्येक चाहत्याची सदैव ऋणी आहे, ज्यांनी मला सदैव पाठिंबा दिला. ‘हॉकी इंडिया’, ‘युवा व्यवहार’ आणि क्रीडा मंत्रालय, ‘भारतीय क्रीडा प्राधिकरण’ (साई), हरियाणा सरकार आणि ओडिशा सरकार यांच्या पाठिंब्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. मी आता खेळणार नसले, तरी माझे खेळावरील प्रेम कायम असेल. मी नवीन भूमिकेसाठी उत्सुक आहे आणि ज्या खेळाने मला खूप काही दिले आहे, त्या खेळाला ते परत करणार आहे, असे म्हणत तिने तिच्या भविष्यातील योजनांवर भाष्य केले.
तब्बल १३ वर्षांनंतर राणीच्या संघाने २०१७ मध्ये, महिलांचा आशिया चषक जिंकून दिला होता. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ एफ. आय. एच. महिला यंग प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार देत असते, त्या पुरस्काराचे नामांकन मिळालेली ती पहिली भारतीय महिला हॉकीपटूदेखील ठरली आहे. तिच्या संपूर्ण कारकिर्दीत, राणीला २०१६ मध्ये ‘अर्जुन पुरस्कार’, २०१९ मधील ‘वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द इयर’, हॉकी इंडियाने २०१९ मधील ‘सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू’, २०२० मध्ये ‘राजीव गांधी खेलरत्न’ आणि अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. ‘पद्मश्री’ पुरस्कारही तिने पटकावला आहे.
येत्या डिसेंबरमध्ये जागतिक पातळीवरील सुधारित हॉकी इंडिया लीग होत आहे. त्यामध्ये सूरमा हॉकी क्लबची महिला मार्गदर्शक आणि भारतीय प्रशिक्षक म्हणून, राणी पदभार स्वीकारणार आहे. गेल्यावर्षी चेन्नई येथे ‘हॉकी इंडिया’च्या, १००व्या कार्यकारिणीच्या बैठकीत ती भारतीय सब-ज्युनियर मुलींच्या संघाची मुख्य प्रशिक्षक बनली, तेव्हाही तिने अशाच भूमिका साकारल्या आहेत. राणीने या नवीन धड्यासाठी स्वतःला अधिक सक्षम करण्यासाठी, जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघटना आयोजित प्रशिक्षक पदाचा ’एज्युकेटर्स कोर्स’ही पुर्ण केला आहे.
हॉकी इंडियातर्फे राणी रामपालला दहा लाख रुपयांचा रोख पुरस्कार तेव्हा दिल्लीतील कार्यक्रमात देण्यात आला, तसेच राणी वापरायची त्या प्रसिद्ध ‘जर्सीचा क्रमांक २८’ हादेखील तिच्यासाठी म्हणून निवृत्त होत असल्याची घोषणा, तेथे हॉकी इंडियाने केली. याआधी गेल्याच महिन्यात पी. आर. श्रीजेशचा ‘जर्सी क्रमांक १६’देखील त्याच्या निवृत्तीबरोबरच निवृत्त करण्यात आल्याचे आपल्याला आठवत असेलच.
राणीचा अदम्य आत्मविश्वास आणि पदोपदी येणार्या लोकांच्या दबावांवर मात करण्याचा दृढनिश्चय, यांनी तिच्यावर अमिट छाप सोडली आहे. अडथळे तोडण्याचे आणि स्वप्नांचा पाठलाग करण्याचे, प्रतीक म्हणून अभेद्य ताठ उंच उभे राहून ती हॉकी खेळाडूंना आता प्रेरणा देणार आहे. राणी ही खरोखरच भारतीय हॉकीची साम्राज्ञी आहे, तिचा हा वारसा कायम राहो.
‘वॉल्ट ऑफ डेथ’ला न घाबरणारी बाहुली :
त्या राणीसारखी दीपा हीदेखील आपल्या पाऊलांवर पाऊल टाकायचे आवाहन येथे सर्वांना करत आहे. काही लहान मुलांचे पाय सपाट असतात. त्यांच्या पायाच्या मध्यभागी खोबणी नसते. या कमानीद्वारे, उभे राहणे आणि शरीराचे वजन संतुलित करणे, चालणे, धावणे आणि कोणत्याही दिशेने वेगाने जाणे सोपे होते. पायाची कमान स्थिरता आणते. पण तिला तिच्या जिवनात स्थिरता आणून देण्यासाठी, असा क्रीडाप्रकार कामी आला की जो क्रीडाप्रकार, अशा सपाट पायवाल्यांना अशक्यच असतो. आपण आता बोलणार आहोत, ते आर्टिस्टिक जिमनॅस्टिक्स या क्रीडाप्रकाराबद्दल आणि त्रिपुराच्या अगरतला येथील अनवाणी पायाने खेळणार्या दीपा करमाकर हिच्याबद्दल. तिने चालणे, धावणे किंवा तिचे वजन संतुलित करणे यासाठी अधिक मेहनत घेतली आणि जगाला दाखवून दिले की, सपाट पाय आपल्या जीवनात अडसर आणत नसतो. आजतागायत अशी खेळाडू भारतीय क्रीडाविश्वात कोणीच बघितली नव्हती, आणि आजपावेतो तिच्यानंतर अशी कोणी आलेलीदेखील नाही. क्रिकेट, टेबलटेनिस, मुष्टियुद्ध, बुद्धिबळ अशा अनेक क्रीडाप्रकारांत जेव्हा आधी एखादा खेळाडू त्या खेळात नावारुपाला येतो आणि त्याच्यापाठोपाठ त्याच्यासारखे एकेक क्रीडापटू लोकांच्या तोंडी येण्यास लगेच सुरुवात होते. परंतु, जिम्नॅस्टिक हा असा खेळ आहे की, ज्याला विशेष कौशल्य गरजेचे असते. सगळ्याच ठिकाणी त्याचे शिक्षण मिळणे, त्या खेळाचे विशिष्ट साहित्य उपलब्ध होणे, हे त्यामानाने आपल्याकडे दुर्मीळच असते. ‘वॉल्ट ऑफ़ डेथ’ असे या दीपाच्या खेळाला संबोधले जाते. या खेळात चपळपणा लागतो. त्याबरोबर या खेळात कोणतीही चूक झालेली चालत नाही. एक चूक जीवावर बेतू शकते. या कारणांमुळे कदाचित दीपा करमाकरसारखी जिम्नॅस्टिकपटू अजून घडताना दिसत नाही. जरी दीपाचे वय आज फक्त ३१ वर्षांचे दिसत असले, तरी जिम्नॅस्टिकपटूचे करिअर मुळातच स्वल्पच असते. आज दीपाने जरी आपल्यातली २५ वर्षे या खेळाला देत जिम्नॅस्टिकचा आनंद स्वतः घेत क्रीडाप्रेमींनाही देऊ शकली असली, तरी ती मोठी उपलब्धी आहे. ज्या खेळात ती येऊच शकत नाही, असे सारे म्हणत असताना ती याच खेळात आपली चमक दाखवत, आज ती स्वतःला कृतार्थ मानून, योग्यवेळी निवृत्त होत आहे. एक विलक्षण प्रतिभावंत दीपा पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट बनली आहे आणि यापुढे अजून ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेऊ शकतील, अशा जिम्नॅस्ट घडवून दाखवायचे ठरवत आहे. दीपा निवृत्त होताना सांगते की, माझा शेवटचा विजय, ‘ताश्कंद’मधील आशियाई जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप हा एक टर्निंग पॉईंट होता. तोपर्यंत मला वाटले की, मी माझ्या शरीराला आणखी पुढे ढकलू शकेन. परंतु, कधीकधी आपले शरीर आपल्याला सांगते की, विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. पण मनाला अजूनही पटत नाही. खरे आहे, दीपाच्या निवृत्तीची घोषणा ऐकल्यावर आपल्याही मनाला ते पटत नाही, पण शेवटी तिने केलेला तिच्या शरीराचा विचार आपणही स्वीकारत म्हणायला हवे, “बाय बाय दीपा, तू आता जी कामगिरी स्वीकारत आहेस, की ज्यात भारताला जिम्नॅस्टिक्समध्ये ऑलिम्पिक पदक जिंकून देणारी, अजून एकतरी दीपा तुला घडवायची आहे. तसा तू निर्धार करत आहेस. हो दीपा, तू त्यातही यशस्वी हो. आमचे तुला मनापासून आशीर्वाद आणि शुभेच्छा आहेतच.”
क्रीडाक्षेत्रातील बाहुली :
बाहुली ही मनुष्याची छोट्या रूपातील प्रतिमा असते, असे समजतात. कारागीराने आपल्या हाताने काही मोहक बाहुल्या बनवलेल्या आपण बघत असतो. कितीही हुबेहुब बाहुली त्याने बनवली, तरी भगवंताने पृथ्वीतलावर बनवून पाठवलेल्या बाहुलीला तुलना असूच शकत नाही. म्हणूनच आपण एखाद्या बाहुलीला ती किती हुबेहुब घडवली आहे, असे म्हणतो. त्या बाहुल्या बालवयात खेळण्यासाठी त्यांचे त्यांचे पालक त्यांना आणून देतात. बरेचसे पालक आपल्या मुलांना बार्बीडॉल आणून देतात. विदेशी बाहुल्यांमध्ये बार्बीडॉल हीच सर्वोत्तम मानली जाते. मग मुले त्या बाहुलीसारखे बनण्याचा प्रयत्न करतात. पण जर याउलट घडले, तर आपला त्यावर विश्वास बसेल का? होय, असा विश्वास आपण जरुर ठेवला पाहिजे. भारताच्या एका युवा खेळाडूची प्रतिकृती तयार करुन, एक बाहुली बनवून ती बाहुली तिलाच भेट म्हणून जुलै २०२३ मध्ये देण्यात आली होती. मेटेल नावाच्या अमेरिकन कंपनीने, आपली ६०वी जयंती साजरी करायचे ठरवले होते. त्याप्रसंगी त्यांनी १७ देशांमधून निवडक अशा २० यशस्वी महिलांची यादी केली आणि त्या २० जणीच्या ’बार्बी डॉल’ तयार केल्या. युवा पिढीला त्या बाहुलीपासून प्रेरणा मिळावी, हा त्यांचा मुख्य उद्देश होता. त्यामध्ये आपल्या दीपा करमाकरची निवड करण्यात आली होती. प्रत्यक्षात खेळणारी आपली जगप्रसिद्ध बार्बीडॉल ती त्रिपुरा राज्यातील गुडिया खेळातून आता निवृत्ती घेत आहे.
दीपा अन् राणीकडून घेऊया :
या दोनही भारतीय क्रीडांगणावरील सम्राज्ञी आता एक नवीन अध्याय सुरू करत आहेत. आपल्या आपल्या खेळांत भारताचे नाव उज्ज्वल करण्यापर्यंतचा, त्यांचा उल्लेखनीय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या भारतीय कन्यांनी केवळ देशाचा गौरवच केला नाही, तर प्रत्येक मुलीला स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी आणि उच्च ध्येय ठेवण्यासाठी प्रेरित केले आहे. त्या राणी रामपाल आणि दीपा करमाकर यांची आठवण काढताना, आपल्याला हे मात्र मनात पक्के करायचे आहे की, आपल्याकडे मुलगा असो अथवा मुलगी अथवा अशी दोनही भावंडे असोत, तर त्यांचा जो क्रीडाप्रकार आवडीचा असेल, त्यात त्यांना रस घेण्याची संधी द्या. त्यांना त्या खेळात प्रोत्साहित करा आणि मग बघा, तुमच्याकडची तुमची बाहुली, बघता बघता जगद्विख्यात राणी वा दीपा बनलेली असेल. नकळत तिच्यामुळे तिचे पालक म्हणून तुमचे आणि आपल्या देशाचेही नाव कधी प्रसिद्ध होईल, हे कळणारसुद्धा नाही.
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
श्रीपाद पेंडसे