मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांची आज (२६ ऑक्टोबर) जयंती. मराठी असो किंवा हिंदी अनेक सुपरहिट चित्रपट लक्ष्मीकांत यांनी दिले. आज जरी ते जगात नसले तरीही त्यांचा चाहता वर्ग आजही त्यांची आठवण काढल्याशिवाय राहात नाही. आपल्या विनोदी शैलीने तब्बल दोन दशके प्रेक्षकांना खळखळून हसवले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
प्रिया बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंचा फोटो शेअर करत लिहिले की, ७० वर्ष .... आज जन्मदिवस. अजूनही तुमचं गारुड लोकांच्या मनावर आहे, एक अभिनेता, चांगला माणूस म्हणून आज ही लोक तुमच्या बद्दल तेवढ्याच उत्साहाने बोलतात. विनोद अनेक रूपाने समोर आला कधी दादा गिरीने तर कधी विनोदाचा सम्राट,तर कधी भोळा भाबडा राजा म्हणून पण या महारथींच्या मांदियाळी त या कर्ट्याने स्वतःची शैली, स्वतःच वेगळेपण सिद्ध केलं. त्यांना कुठलीच पदवी दिली गेली नाही तो कायम सगळ्यांसाठी लक्ष्याच राहिला..आणि राहणार फक्त ... 'लक्ष्या '
लक्ष्मीकांत बेर्डे यांना बालपणापासून अभिनयाची आवड होती. त्यांनी आपल्या अभिनय आणि विनोदी कौशल्याने रसिकांच्या मनावर अनेक वर्ष अधिराज्य गाजवले. लेक चालली सासरला, धूमधडाका, दे दना दन, अशी ही बनवाबनवी, चंगु मंगू अशा अनेक मराठी चित्रपटांतून त्यांनी अजरामर पात्र देऊ केली. याशिवाय मैने प्यार किया हम आपके हैं कौन, मेरे सपनो की राणी, आरझू, साजन, बेटा आणि अनारी हे त्यांचे हिंदी चित्रपट हिट ठरले. सर्वांना खळखळून हसविणार्या या विनोदाच्या बादशाहाने १६ डिसेंबर २००४ साली जगाचा निरोप घेतला. मात्र, आजही त्यांच्या भूमिका कायम स्मरणात आहेत.