मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून कठीण प्रसंगांना तोंड देत असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेचे 'सॉफ्ट लँडिंग' होण्याची शक्यता वाढत आहे, असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले. अर्थव्यवस्थेत 'सॉफ्ट लँडिंग' म्हणजे चक्रीय मंदी जी आर्थिक वाढीदरम्यान उद्भवते आणि पूर्ण मंदीशिवाय संपते. विविध देश आणि बहुपक्षीय वित्तीय संस्थांसोबत एकत्र काम केल्याने आर्थिक परिस्थिती बदलेल, असेही केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण यांनी सांगितले.
दरम्यान, जागतिक स्तरावरील आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर विविध देश आणि बहुपक्षीय वित्तीय संस्थांसोबत एकत्र काम करत आहेत. परंतु सध्या अर्थव्यवस्था पुरेशा वेगाने विकसित होत नसल्याचे याकडेही अर्थमंत्र्यांनी लक्ष वेधले. वॉशिंग्टन-डीसी येथे 'ग्लोबल थिंक टँक'मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संवाद साधला.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(आयएमएफ) आणि जागतिक बँकेच्या दोन दिवसांच्या चर्चेदरम्यान जागतिक अर्थव्यवस्थेचे 'सॉफ्ट लँडिंग' होण्याची शक्यता दिसली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, मध्यवर्ती बँका, सर्व संस्था आणि सरकार यांच्या प्रयत्नांनी काही काळ चलनवाढ कमी ठेवली आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे 'सॉफ्ट लँडिंग' होण्याची शक्यता वाढत आहे.