चित्रपट, नाटक आणि मालिकांमधील प्रमुख कलाकारांसह प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवितात ते विनोदी कलाकार. ‘हसा चकटफू’, ‘खबरदार’, ‘येड्यांची जत्रा’, ‘ही पोरगी कुणाची’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ अशा अनेक विनोदी कलाकृतींमध्ये पंढरीनाथ कांबळे अर्थात सगळ्यांचे लाडके ‘पॅडी दादा’ यांनी भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. शिवाय नुकतेच ते ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातदेखील झळकले होते. यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बातचीत करताना पंढरीनाथ कांबळे यांनी जुन्या आठवणींना दिलेला हा उजाळा.
पंढरीनाथ कांबळे मुंबईकरच! आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना ते म्हणाले की, “माझं संपूर्ण बालपण डिलाईल रोड म्हणजे मुंबईतील करी रोड येथे गेलं. अगदी मध्यमवर्गीय कुटुंबात मी वाढलो. १८० चौ. फूटांच्या घरात आम्ही सात ते आठजण राहायचो. अभ्यासासाठी सगळे मित्र गच्चीवर जात असू किंवा मग अभ्यासिकांमध्ये जाऊन अभ्यास पूर्ण करायचो. पण, खर्या अर्थाने मला स्वतःला शोधता आलं किंवा कोणत्या गोष्टीने मी घडलो असेन, तर त्यात ‘विद्यार्थी उत्कर्ष मंडळा’चा मोठा वाटा आहे. त्या मंडळात आम्ही अभ्यासिकेला जात होतो, तेव्हा तिथे आमची काही वरिष्ठ मंडळी आली आणि त्यांनी विचारलं की, “तुमच्यापैकी नाटकात कोण कोण काम करणार?” मुळात तेव्हा ‘नाटक’ असं काहीतरी असतं, हे माहीत होतं; पण कधीच नाटक करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे लगेच ‘मी करणार’ असं म्हणून हात वर केला आणि त्या मंडळाच्या नाटकात मी ‘पाखरु’ झालो होतो. एकच संवाद होता मला. पण, तरी नाटक आपल्याला आवडतंय आणि ही कला सादर करायला जमते, हा आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला आणि त्यानंतर नाटक हाच पिंड निवडून, आज मायबाप प्रेक्षकांच्या आशीर्वादाने ओळख मिळाली आहे.
...अन् ‘पंढरीनाथ’चा ‘पॅडी’ झाला
पंढरीनाथचा पॅडी कसा झाला, हे सांगताना ते म्हणाले की, “महाविद्यालयात असताना अभिनयाची पारितोषिकं मला मिळायची आणि त्यामुळे मित्रांना माझं अभिनंदन करायचं असायचं, पण माझं नावंच आठवायचं नाही. माझा एक मित्र होता, तो म्हणायचा की, “पंढरीनाथ हे तुझं पूर्ण नाव घेईपर्यंत तू निघून जातोस” किंवा त्यांना तुझं नाव फार मोठं वाटतं. ते नाव छोटं कर. पण, कसं होतं की देवाचं नाव असेल तर त्याचा वेगळा अर्थ होण्यापेक्षा पंढरीनाथचा ‘पॅडी’ झाला आणि माझ्या ‘पंढरीनाथ’ या नावाचीदेखील गंमत आहे. माझी आई जेव्हा माझ्यासाठी गरोदर होती, त्यावेळी माझे आजोबा म्हणाले होते की, मुलगा झाला तर ‘पंढरीनाथ’ हे नाव ठेवीन आणि बरीच वर्षे मला लोक ‘पंढरीनाथ’ याच नावाने हाक मारत होते. पण, ज्यावेळी ‘पंढरीनाथ’चा ‘पॅडी’ झाला, त्यावेळी माझ्या खर्या नावाने मला जास्त लोक हाक मारत नव्हते. त्यामुळे जेव्हा ’बिग बॉस’च्या घरात मला वर्षाताई ’पंढरीनाथ’ अशी हाक मारत होत्या, त्यावेळी फार छान वाटत होतं.
मित्रांमुळे घडलो...
अभिनयाची सुरुवात आणि त्यानिमित्ताने मित्र कसे जोडले गेले, याबद्दल बोलताना पंढरीनाथ म्हणाले की, “लालबाग-परळमधला मी सामान्य मुलगा असल्यामुळे परिस्थितीची जाणीव आजही आहे आणि मघाशी जसं मी म्हणालो की, नाटक करायला मी सुरुवात केली आणि त्यानंतर जेव्हा महर्षी दयानंद महाविद्यालयात मी शिकत होतो, तेव्हा अभिनय, नाटक आवडणारीच मंडळी मला मित्र म्हणून भेटली आणि माझा छंद हाच माझा अर्थार्जनाचा मार्ग झाला, याचा मला अत्यानंद आहे. त्यावेळी केदार शिंदे, अंकुश चौधरी, दीपा परब, भरत जाधव, विकास कदम हे सगळे माझे वर्गमित्र होते. आम्हा सगळ्यांनाच नाटक फार प्रिय असल्यामुळे आमची मैत्री खरं तर अधिक घट्ट झाली. लोकं त्या काळाला ‘स्ट्रगल’ म्हणतात; पण माझ्यासाठी ती शिकवणी होती. कारण, प्रत्येकजण आयुष्यभर शिकत असतो आणि जर का तो आविर्भाव कलाकाराने ठेवला, तर नक्कीच त्याची कला प्रेक्षक डोक्यावर घेतात. आणि खरं तर आम्ही सर्वच मित्रांनी २०-३० वर्षे झाली तरी एकमेकांची साथ सोडली नसल्यामुळे त्यांच्यामुळेच मी घडलो आहे, असं नक्कीच सांगीन.”
निर्मिती सावंत माझ्यासाठी विद्यापीठ!
पंढरीनाथ कांबळे यांना खरी ओळख ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्यासोबत काम केलेल्या ‘कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक’ या मालिकेतील ‘छु’ या पात्रामुळे मिळाली. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “निर्मिती सावंत यांच्यासोबत १९९४-९५ च्या सुमारास मी ‘डबल ट्रबल’ हे नाटक केलं होतं आणि तेव्हा निर्मिती सावंत हे नाव हौशी रंगभूमीवरील मोठं नाव होतं. नाटकादरम्यान त्यांच्यासोबत काम करताना मी जरा दबकून होतो. पण, नंतर ‘कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक’ ही मालिका जेव्हा सुरु झाली, त्यावेळी आमची सहकलाकार म्हणून अधिक गट्टी जमली. निर्मितीताई ’पाठांतराच्या बादशाह’ होत्या आणि माझा पाठांतराचा घोळ होता. मात्र, कधीच त्यांनी अभिनयक्षेत्रातील त्यांची वरिष्ठता माझ्यावर लादली नाही. कायम त्यांनी मला सांभाळून घेतलं आणि त्यांच्यामुळे कुमारी गंगुबाईमधलं ‘छु’ हे पात्र लोकांपर्यंत पोहोचलं आणि माझ्यासाठी निर्मिती सावंत या विद्यापीठ आहेत.”
भरत जाधवला मी फॉलो करतो....
महाविद्यालयापासूनची मैत्री ते एकत्र अभिनय हा भरत जाधव यांच्यासोबतचा प्रवास सांगताना पंढरीनाथ म्हणाले की, “भरत जाधव हा एक असा कलाकार आहे, जो केवळ एकटा पुढे जात नाही, तर तो आपल्या सर्व सहकलाकारांना आणि मित्रांना घेऊन पुढे जातो. मुळात मी भरत जाधवला खूप फॉलो करतो. कारण, ज्या वातावरणात तो लहानाचा मोठा झाला आहे, त्या परिस्थितीची त्याला जाणीव आजही तो इतका मोठा स्टार झाला तरीही आहे. भरतचे बाबा टॅक्सीचालक होते आणि त्या पैशांतून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. आता भरतने स्वतःची व्हॅनिटी व्हॅन घेतली; त्यात एक फोल्डिंगचं डायनिंग टेबल आहे. त्यावर भरतने आत्तापर्यंत ज्या भूमिका केल्या, त्यांचे फोटो लावले आहेत आणि ते टेबल उघडलं की आत काळी-पिवळी टॅक्सी तिथे त्याने लावली आहे आणि त्यावरून असं लक्षात येतं की, भरतचे पाय किती जमिनीवर आहेत आणि त्याने सोसलेल्या कष्टांची त्याला आजही जाणीव आहे.”
पुढे पॅडी म्हणाले की, “भरत केवळ स्वतः पुढे जाणारा नट आणि माणूस नाही, तर तो त्याच्यासोबत असणार्या कलाकारांचा हात पकडून त्यांना पुढे घेऊन जाणारा कलाकार आहे आणि त्याच्या त्या गोष्टी मी नक्कीच आत्मसात केल्या आहेत. इतकंच काय, भरतने ज्यावेळी पहिल्यांदा ’होंडा सिटी’ गाडी घेतली होती, त्यावेळी मीपण ठरवलं होतं की, पहिली गाडी घेईन तर ‘होंडा सिटी’च! बरं, त्या काळात मी दुसरी कोणतीही गाडी घेऊ शकलो असतो, पण नाही, जोपर्यंत ‘होंडा सिटी’चं माझं बजेट होत नाही, तोपर्यंत मी थांबणार आणि मी तीच गाडी घेतली आणि भरतला फोटोही पाठवला होता.”
निर्मितीताईंनंतर विशाखाच...
मनोरंजनसृष्टीत खरं तर अनेक वर्षांची मैत्री टिकवून ठेवणारे फार कमी कलाकार दिसतात. पण, गेल्या अनेक वर्षांपासून विशाखा सुभेदार आणि पंढरीनाथ कांबळे यांची घट्ट मैत्री आहे. याबद्दल बोलताना कांबळे म्हणाले की, “विशाखा आणि माझी ओळख केवळ अभिनयामुळे होती. तिचं ‘जाऊबाई जोरात’ हे नाटक निर्मितीताईंसोबत सुरु होतं. त्यावेळी कसं व्हायचं की, आमची तालीम असायची शिवाजी मंदिरला आणि तेव्हाच ‘जाऊबाई’चा प्रयोग असायचा आणि तो झाला की आमची दौर्याची गाडी शिवाजी मंदिरहून निघायची. मग आम्ही बसून प्रयोग पाहायचो. त्यावेळी त्या नाटकात मी विशाखाचं काम पाहिलं आणि ते आवडलं. त्यानंतर ‘एक डाव भटाचा’ हे विशाखाचं नाटक पाहिलं आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, विशाखा किती ताकदीची अभिनेत्री आहे. तोपर्यंत मी तिच्यासोबत काम केलं नव्हतं. बर्याच वर्षांनी ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ ही हास्यमालिका केली. पण, त्यातही आम्ही जोडीदार नव्हतो. त्यावेळी अंशुमन विचारे आणि विशाखाची जोडी होती. तेव्हा त्यांनी एक प्रहसन सादर केलं होतं आणि त्यावेळी मी खरं तर विशाखाच्या अभिनय कौशल्याच्या प्रेमात पडलो होतो आणि आजही आहे. तेव्हापासून जी आमची मैत्री झाली, ती आजही तितकीच घट्ट आणि कायम आहे. शिवाय, विशाखाच्या बाबतीत मला हे नक्कीच म्हणावंसं वाटतं की, मी ज्यांच्यासोबत आजपर्यंत काम केलं, त्यांपैकी निर्मितीताईंनंतर कोणत्या अभिनेत्रीमध्ये क्षमता असेल, तर ती मला विशाखा सुभेदारमध्ये दिसते. कारण, लेखकाने दिलेले संवाद, दिग्दर्शकाने दिलेलं ‘नॅरेटिव्ह’ या सगळ्यांना आपल्यातील अभिनयाची जोड देऊन उत्तम कलाकृती सादर करण्याची जशी निर्मिती सावंत यांच्यात कला आहे, तशीच मला विशाखामध्ये नक्कीच दिसते.”