भीमथडीच्या तट्टांना या...

26 Oct 2024 10:10:54
 
bhimthadi
 
 
भीमथडी तट्टे अरबी घोड्यांना भारी ठरली, असे आपण म्हणतो, तेव्हा ‘भीमथडी’ म्हणजे काय आणि या भीमथडीमध्ये मराठी घोडदळासाठी तट्टांची पैदास नेमकी कुठे केली जात असे, ती कोण लोक करत असत, त्यांचे पुढे काय झाले, याबद्दल आपल्याला काय माहिती आहे? काहीही नाही.
 
रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी; भीमथडीच्या तट्टांना या, यमुनेचे पाणी पाजा’ या महाराष्ट्र गीतातल्या पहिल्या तीन ओळी आपल्याला शिवछत्रपतींपासून प्रतापी बाजीरावांपर्यंतच्या असंख्य पराक्रमी वीरांच्या तुफानी घोडदौडीचे स्मरण करून देतात. बादशाही सैन्याकडे उंच आणि आणि अरबी घोडे असायचे, तर आमच्या या गरीब मराठ्यांकडे मध्यम उंचीची भीमथडी तट्टे होती आणि तरीही त्यांनी उत्तरेत यमुनाच नव्हे, तर पार अटक नदीपासून दक्षिणेत कावेरी नदीपर्यंत दौड मारून जवळपास सगळा भारत देश मुसलमानमुक्त करत आणला होता. हे सगळे आठवून अभिमानाने आमचा उर भरून येतो.
 
पण, तेवढे पुरेसे नाही. ज्या समाजाला पुन्हा एकदा आपले, आपल्या देशाचे पुनरुत्थान घडवून त्याला परमवैभव प्राप्त करून द्यायचे आहे, त्याला नुसती भावना पुरेशी नाही. आजच्या ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान युगात तर अजिबात पुरेशी नाही, तर या भावनेला सतत अभ्यास, अध्ययन, उद्योग यांची जोड देऊन हर एक क्षेत्रात अद्ययावत-अप टु डेट-ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे.
आता हेच पाहा ना, भीमथडी तट्टे अरबी घोड्यांना भारी ठरली, असे आपण म्हणतो, तेव्हा ‘भीमथडी’ म्हणजे काय आणि या भीमथडीमध्ये मराठी घोडदळासाठी तट्टांची पैदास नेमकी कुठे केली जात असे, ती कोण लोक करत असत, त्यांचे पुढे काय झाले, याबद्दल आपल्याला काय माहिती आहे? काहीही नाही. तुम्ही म्हणाल, कुठल्या जुनाट घोडदळाबद्दल प्रश्न विचारताय? अहो, १९व्या शतकाच्या अखेरीस मोटारकारचा शोध लागला, १८९८ साली पहिली मोटार भारतात आली आणि पुढच्या सुमारे २० वर्षांत घोड्यांचा उपयोग लष्करातून आणि नागरी जीवनातूनही झपाट्याने कमी होत गेला. आता तर लग्नात वरघोडा म्हणून देखील घोडा मिळणे दुरापास्त झाले आहे. हा चांगले, दमदार, देखणे घोडे बघायचेच असतील तर अश्वशर्यतीच्या मैदानावरच जावे लागेल. पण, तो जुगाराचा खेळ आहे. एरवी आधुनिक जीवनात घोड्याला काय महत्त्व उरले आहे?
 
वरीलप्रमाणे प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो. पण, विज्ञान-तंत्रज्ञानात आपल्या पन्नास वर्षे पुढे असणार्‍या पाश्चिमात्य विद्वानांना तसे वाटत नाही. यामुळे एकाच वेळी ’घोडा’ या विषयावरची तीन-तीन पुस्तके बाजारात येऊ शकतात, नव्हे आलीच आहेत. डेव्हिड शाफेझ हा अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठातला विद्वान सतत वेगवेगळ्या आशियाई देशात फिरून तिथल्या इतिहास, परंपरा आणि संस्कृतींचा अभ्यास करत असतो. जेव्हा तो फिरत नसतो, तेव्हा तो कधी लिस्बनमध्ये, तर कधी पॅरिसमध्ये बसून आपल्या भटकंतीतल्या टिपणांचा इतरांनी लिहून ठेवलेल्या माहितीशी मेळ घालत असतो. त्याच्या ताजा पुस्तकाचे नाव आहे ’रेडर्स, रुलर्स अ‍ॅण्ड ट्रेडर्स.’ विल्यम टी. टेलर हा अमेरिकेच्या कोलोरॅडो विद्यापीठातला पुरातत्त्वशास्त्र विषयाचा साहाय्यक प्राध्यापक आहे. त्याच्या ताज्या पुस्तकाचे नाव आहे ’हूफ बीट्स,’ तर टिमोथी वाईनगार्ड हा सुद्धा कोलोरॅडो विद्यापीठातच इतिहास विषयाचा प्राध्यापक आहे. पण, यापूर्वी तो कॅनडा देशाच्या लष्करात अधिकारी होता. कॅनडाच्या रॉयल मिलिटरी कॉलेजमधून त्याने ’युद्ध अभ्यास’ या विषयात एम.ए. आणि मग ऑक्सफर्ड विद्यापीठातून ’युद्ध इतिहास’ या विषयात ‘डॉक्टरेट’ मिळवली आहे. त्याच्या ताज्या पुस्तकाचे नाव आहे ’द हॉर्स-द गॅलपिंग हिस्ट्री ऑफ ह्युमॅनिटी.’
 
या पुस्तकामधून त्यांच्या विद्वान लेखकांनी काय मांडणी केली आहे, हे पाहण्यापूर्वी आपण आपला भीमथडी तट्टांचा विषय पूर्ण करू. ‘भीमथडी’ याचा अर्थ भीमा नदीचा काठ. म्हणजेच भीमा नदीचे खोरे. भीमा नदी पुणे जिल्ह्यात भीमाशंकराच्या डोंगरात उगम पावून पुणे जिल्हा, अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातून वाहत कर्नाटक प्रांतात प्रवेश करून विजापूर जिल्हा, गुलबर्ग जिल्हा अशी वाहत कर्नाटक-आंध्र सीमेजवळ कृष्णा नदीला मिळते. हा भाग म्हणजेच भीमा खोरे किंवा भीमथडी. या प्रवासात भीमेला भामा, इंद्रायणी, वेळ, मुळा-मुठा, घोड, नीरा, माण आणि सीना या उपनद्या येऊन मिळतात. आता या भीमथडीमध्ये घोड्यांची पैदास नेमकी कुठे होत असे? माहीत नाही.
 
मलिक अंबर हा अत्यंत हुशार आणि धूर्त हौशी सरदार इ. स. १६०० साली अहमदनगरच्या निजामशहाचा वजीर बनला. असे म्हणतात की, त्या वेळेस निजामशहाच्या सैन्यात फक्त १५० घोडेस्वार होते. मलिक अंबरने अल्पकाळात ही संख्या सात हजारांवर पोहोचविली. सन १६१० पर्यंत त्याच्या सैन्यात ४० हजार घोडेस्वार झाले. मलिक अंबरने हे कसे साध्य केले? त्याने तोपर्यंतच्या सुलतानांनी कटाक्षाने दूर ठेवलेल्या स्थानिक लोकांना म्हणजेच मराठ्यांना (मराठी भाषिक लोकांना) सैन्यात, विशेषतः घोडदळात भरती करून अधिकारपदे म्हणजे सरदारक्या दिल्या. याचे मोठे उदाहरण म्हणजे, मालोजीराजे भोसले. नंतरच्या काळात मालोजीराजांचे चिरंजीव शहाजीराजे हे निजामशाहीचे सरलष्कर म्हणजे घोडदळ प्रमुख झाले. आणखी नंतरच्या काळात शहाजीराजे यांचे चिरंजीव शिवाजीराजे यांनी या घोडदळाच्या चपळ, गतिमान हालचालींवर आधारलेले ‘गनिमी कावा’ युद्धतंत्र वापरून सगळ्या बादशाह्या हादरवून सोडल्या. बाजीराव पेशव्याने हे युद्धतंत्र कळसाला नेऊन नर्मदा ओलांडून दिल्लीवर धडक मारली. ज्या भीमथडी तट्टांवरून ही सगळी पराक्रमगाथा रचली गेली, त्या भीमथडी तट्टांची पैदास या भीमेच्या खोर्‍यात नेमकी कुठे किंवा कुठे-कुठे होत होती? ती करणारे लोक कोण होते? शिवरायांच्या किंवा नंतरच्या मराठ्यांच्या घोडदळाला वर्षाला किती घोडे पुरवले जात असत? त्यांचे लढाईसाठी शिक्षण-प्रशिक्षण कोण करत होते? सगळेच प्रश्न आहेत. उत्तरे माहीत नाहीत.
 
जी उत्तरे माहीत आहेत ती इंग्रजी कालखंडातली आहेत. सन १८१७ सालच्या तहान्वये दुसर्‍या बाजीरावाने इंग्रजांची तैनाती फौजेची योजना स्वीकारली. तीन हजार पायदळ आणि पाच हजार घोडदळ अशा या तैनाती फौज पथकाला इंग्रजांनी नाव दिले, ’पूना हॉर्स.’ या पलटणीचे मुख्यालय खुद्द पुणे शहरात नसून, पुणे-नगर रस्त्यावरील शिरुर-घोडनदी या गावात होते. ‘पूना हॉर्स’साठी भीमथडी तट्टांची पैदास आणि उत्तम घोडेस्वारांची भरती शिरूर परिसरातून होत असे. या घोडेस्वारांना त्यांच्या शौर्यामुळे ’शिरूरी राऊत’ असे म्हटले जाऊ लागले. पुढे इंग्रजांचे अफगाणिस्तानबरोबर युद्ध सुरू झाले. इंग्रजी उच्चाधिकार्‍यांनी ‘पूना हॉर्स’ पलटणीचे मुख्यालय शिरूरहून मध्य प्रदेशात नीमच इथे नेले. त्यामुळे शिरूर भागातील घोड्यांची पैदास आणि स्वार भरती हे दोन्ही विषय कायमचे संपले. पण, इंग्रजपूर्व काळातील म्हणजेच मराठेशाहीतील घोडदळ, घोडे अशा संबंधित विषयांवर संशोधन करण्यास प्रचंड वाव आहे. पण, संशोधकांचीच वानवा आहे.
 
आता आपण तीन पाश्चिमात्य संशोधकांच्या ‘घोडा’ या विषयावरील ताज्या पुस्तकांकडे वळू. त्यांच्या मांडणीतला पहिला महत्त्वाचा भाग असा की, आज मानवी जीवनात किंवा त्याच्या पुढच्या विकासासाठी घोड्याला काहीही महत्त्व उरलेले नाही, हे सगळ्यांनीच मान्य केलेले आहे. पण, आजपर्यंतचा जो मानवाचा विकास आहे, त्यात घोडा या प्राण्याचा फार मोठा सहभाग आहे, हे देखील सगळ्यांनी ठामपणे मांडले आहे.
 
या पाश्चिमात्य तज्ज्ञांच्या मते, गेल्या हिमयुगाच्या अखेरच्या काळात म्हणजे आजपासून सुमारे १२ हजार वर्षांपूर्वी युरेशियाच्या गवताळ स्टेप्स प्रदेशात घोडा हा प्राणी निर्माण झाला. बैल, उंट, गाढव इत्यादी प्राण्यांपेक्षा घोडा हा अधिक गतिमान आहे, तो पाठीवर भरपूर सामान पेलू शकतो आणि तो छान माणसाळतो, हे समजल्यावर माणसाने त्याला माणसाळवून आपल्या सेवेत घेतला. आजही घोडा हा सर्व जनावरांमध्ये सर्वात गतिमान प्राणी आहे. तो तासाला ४० मैल किंवा ६४ किमी अंतर न थांबता तोडू शकतो. घोड्याला कमी झोप, कमी विश्रांती पुरते. मुख्य म्हणजे, स्वभावतःच तो कोणतेही प्रशिक्षण झटपट आत्मसात करतो.
 
घोड्याचे हे सगळे गुण लक्षात आल्यावर मानवाने त्याला व्यापारी आणि लष्करी कामांना जुंपले. प्राचीन जगातला सगळ्यात महत्त्वाचा व्यापारी मार्ग म्हणजे ’सिल्क रूट.’ या लेखकांच्या मते, त्याला ’हॉर्स रूट’ म्हणणे जास्त योग्य होईल, इतका घोड्यांच्या व्यापारी काफिल्यांचा मनसोक्त वावर या मार्गावर शतकानुशतके होत होता. प्राचीन पश्चिमी संस्कृतींना धडकी भरवणारे आक्रमक म्हणजे इसवी सनाच्या चौथ्या शतकाले हूण, आठव्या शतकातले अरब, ११व्या शतकाले तुर्क आणि १३व्या शतकातले मंगोल. हे सगळे आक्रमक उत्तम घोडेस्वार होते आणि आपल्या गतिमान घोडदळाच्या बळावरच त्यांनी तत्कालीन पश्चिमी संस्कृती उद्ध्वस्त करून टाकल्या होत्या.
 
मग पश्चिमी देशांनीही उत्कृष्ट घोडदळे उभी केली. या संदर्भात हे लेखक काही गमतीदार किस्से सांगतात. सन १८०२ साली फ्रेंच सम्राट नेपोलियनने रशियावर स्वारी केली. रशियन सैन्यापेक्षा भीषण हिमवर्षावाने (जनरल विंटरने) फे्रंच सैन्याची अतोनात हानी केली. किमान पाच लाख फ्रेंच सैनिक बर्फाने गारठून मेले. नेपोलियनला नामुष्कीची माघार घ्यावी लागली, हे आपल्याला माहीत आहे. पण, किमान दोन लाख घोडेदेखील मेले आणि मनुष्यहानी पुढे पटकन भरून निघाली. पण, उत्तम, प्रशिक्षित घोडे मिळायला बराच काळ लागला, ही माहिती नवीन आहे. १९१४ ते १९१८ सालच्या पहिल्या महायुद्धात मशीन गन्स आणि रणगाडे यांच्यासमोर घोडदळ निष्प्रभ ठरले. त्यामुळे सर्वच देशांनी घोडदळाला जवळपास रजा दिली. पण, १९३९ साली हिटलरने किमान २० लाख घोडे युद्घ आघाडीवर रवाना केले होते. कशासाठी? तर बारीकसारीक वजनी सामान वाहून नेणे, तोफा खेचून नेणे इत्यादी कामांसाठी आणि तशीच गरज पडली, तर मारून खाण्यासाठी, ही माहिती नवी आहे.
 
घोड्यावरून प्रवास करता येतो, हे समजण्यापूर्वी लोक कमरेचे वस्त्र पायघोळ म्हणजे आजच्या लुंगीप्रमाणे वापरत असत, असे हे लेखक म्हणतात. घोड्यावर नीट बसता यावे म्हणून विजार म्हणजे आजची पॅन्ट या वस्त्राचा शोध लागला, असे हे विद्वान म्हणतात. जगातली जुन्यात जुनी विजार चीनच्या पश्चिम भागात सापडली असून, कार्बन-१४ चाचणीने तिचा काळ इसवी सन पूर्व १३०० असा ठरवण्यात आला आहे.
 
हे सगळे संशोधन वाचताना अशी गंमत वाटते की, हे सगळे पश्चिमी तज्ज्ञ भारताला कुठे मोजतच नाहीत. हिंदू परंपरेनुसार महाभारताचा काळ आजपासून पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. महाभारत ग्रंथाच्या वनपर्वात महान अश्वशास्त्रज्ञ शालिहोत्र याचा उल्लेख येतो. पांडव त्याला भेटायला त्याच्या आश्रमात गेले होते. पांडवांपैकी सहदेव हा अश्वविद्येत निष्णात होता. ‘शालिहोत्रतंत्र’ किंवा ‘शाल्यहोत्र’ या शालिहोत्राचा ग्रंथ लंडनच्या इंडिया ऑफिस ग्रंथालयात आहे. विष्णुपंत छत्रे सर्कसवाले यांनी ‘शाल्यहोत्र’ या ग्रंथाचा अभ्यास करून अश्वविद्या आत्मसात केली होती. हे सगळे कोण उजेडात आणणार?
 
 
Powered By Sangraha 9.0