मुंबई : अभिनेते अन्नू कपूर त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात. देशात किंवा जगात सुरु असणाऱ्या अनेक घडामोडींवर ते आपले विचार ठोसपणे मांडत असतात. नुकतेच त्यांनी शाहरुख खान याच्या चक दे इंडिया या चित्रपटाबद्दल केलेल विधान विशेष चर्चेत आहे. भारतात मुस्लिमांना चांगल्या भूमिकेत दाखवून पंडितांची खिल्ली उडवली जाते असे विधान अन्नू यांनी केले असून 'चक दे 'इंडिया' ही हिंदू प्रशिक्षकाची कथा असूनही निर्मात्यांनी मुद्दाम त्याला मुस्लिम दाखवले, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
अन्नू कपूर यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत चक दे इंडिया' चित्रपटाबद्दल नाराजी दर्शवली. २००७ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट शिमित अमीनने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात शाहरुख खानने हॉकी संघाचे प्रशिक्षक कबीर खानची भूमिका साकारली होती.
अन्नू कपूर म्हणाले की, 'हा चित्रपट हिंदू प्रशिक्षक नेगी साहेब (मीर रंजन नेगी) यांच्यावर आधारित आहे, पण त्यांनी मुद्दाम ते पात्र मुस्लिम म्हणून दाखवले.'ते पुढे ते म्हणाले की, 'भारतात असेच घडते. ते मुस्लिमांना चांगल्या भूमिकेत दाखवण्याचा आणि पंडिताची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करत असतात. यानंतर, त्यावर लेबल लावण्यासाठी ते गंगा-जमुनी तहजीबच्या म्हणजेच हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या गोष्टी बोलू लागतात”.