ग्राहकांनी गजबजली मुंबईतील कंदील गल्ली

    26-Oct-2024
Total Views |

कंदील गल्ली  
 
मुंबई : दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. सगळ्यांचीच दिवाळीची खरेदी अगदी जोमात सुरू आहे. दिवाळीसाठी रांगोळी, दिवे, पणत्या, फराळ, तोरणे इत्यादी गोष्टींची खरेदी होत असतानाच कंदीलांची खरेदीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कारण घराबाहेर कंदीलाचा प्रकाश दिसल्याशिवाय दिवाळी सुरू झाल्यासारखेच वाटत नाही. मुंबईतील कंदील खरेदीचे सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे माहीमधील कंदील गल्ली. या कंदील गल्लीत खूप मोठे कंदील बाजार आहे. जवळपास शंभरहून अधिक विक्रेते या ठिकाणी दरवर्षी कंदील विक्री करतात. दरवर्षी या बाजारात मुंबईतील अनेक ग्राहक कंदील खरेदी करतात. या वर्षीही माहीममधील कंदील गल्लीत ग्राहकांची कंदील खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळतात. विविध आकाराचे, प्रकाराचे आणि रंगाचे कंदील या बाजारात उपलब्ध आहेत. कागदाचे, प्लास्टीकचे, पुठ्ठयाचे आणि लाकडाचे कंदील या ठिकाणी विक्रीला आहेत. १०० रुपयांपासून हजारोरुपयांपर्यतचे कंदील या बाजारात खरेदीसाठी उपलब्ध आहेत. लहानात लहान कागदी कंदील १०० रुपयाला, मध्यम आकाराचे कंदील ४०० रुपयापासून १००० रुपयापर्यंत, मोठ्या आकाराचे कंदील ८०० रुपयांपासून २००० ते ३००० रुपयां पर्यंत अशा या बाजारात कंदिलाच्या किंमती आहेत. ग्राहकांनी एकाच वेळी अधिक कंदील खरेदी केल्यास त्यांना विक्रेत्यांकडून चांगली सूटही देण्यात येत आहे.
 
गेल्या अनेक वर्षांपासून माहीममधील या सिटीलाइट परिसरात हा कंदील बाजार भरतो. या कंदील बाजारामुळेच या परिसराला कंदील गल्ली हे नाव मिळाले आणि त्याच नावाने लोक या भागाला आता ओळखतात. या कंदील गल्लीतील हा कंदील बाजार दसऱ्यापासूनच सुरू असतो. हा बाजार २४ तास भरलेला असतो पण इथे खरेदी करण्याची खरी मजा रात्रीच आहे. रात्री या बाजारात अनेक पेटलेले कंदील झळकत असतात. त्यामुळे दिवाळीपूर्वीच या बाजारात कंदिलांची दिवाळी सुरू झालेली असते.