इस्रायलच्या ‘मोसाद’ची जगावेगळी कामगिरी

26 Oct 2024 21:59:19
 
 
Mossad
 
५० वर्षांनंतर इस्रायलवर ‘हमास’ने अचानक इस्रायमधील गाझा पट्टी जवळ असलेल्या शहरांवर दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हल्ला केला. या हल्ल्याची पूर्वकल्पना नसणे, हे खरं तर ‘मोसाद’चे मोठे अपयश म्हणावे लागेल. परंतु, या एका अपयशानंतर गेल्या वर्षभरात चाललेल्या युद्धामध्ये इस्रायली गुप्तहेर संस्थांची कामगिरी ही जागतिक दर्जाची आणि अतिशय उत्कृष्ट अशी झाली. त्यांनी पुरवलेल्या गुप्तहेर माहितीमुळे ‘हमास’, ‘हिजबुल्ला’ यांचे सर्वोच्च नेतृत्व नष्ट करण्यात आले आहे, ज्यामुळे त्यांची युद्धक्षमता अत्यंत खालावली आहे. त्यानिमित्ताने ‘मोसाद’च्या या जगावेगळ्या कामगिरीचा आढावा घेणारा हा लेख...
 
गुप्त पद्धतीने कार्य करून माहिती मिळवणे, हे खरं तर एक कौशल्य आहे. यात मोठा धोका असतो. त्यांना दिल्या जाणार्‍या कठोर प्रशिक्षणानंतर हे गुप्तहेर खूप खास बनतात. जगभरात इस्रायलवर केवळ ९०-१०० टॉप क्लास सिक्रेट एजंट अस्तित्वात आहे. तेहरानमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात ‘हमास’ या दहशतवादी संघटनेचा राजकीय चेहरा असलेला इस्माईल हानिया ठार झाला. इस्रायलची गुप्तचर संस्था त्यांच्या मागावर होती. तेहरानमधील त्यांच्या राहत्या घरी आंघोळ करत असताना हत्या झाली. त्यांच्या घरावर क्षेपणास्त्र डागण्यात आल्याने मोठा स्फोट झाला. तसेच या घटनेत एका अंगरक्षकाचा मृत्यू झाला.
 
कोणत्याही त्रयस्त देशातदेखील ‘मोसाद’ यशस्वीपणे हल्ला करुन शत्रूला अक्षरश: वेचून वेचून ठार मारण्यासाठी ओळखली जाते. परक्या मुलखात अशा मोहिमा तडीस नेणे धोकादायक असते. प्रसंगी युद्धदेखील होऊ शकते. परंतु, कोणतीही जोखीम ही संघटना घेते. ‘मोसाद ह्युमन इंटेलिजन्स’ आणि ‘सिग्नल इंटेलिजन्स’चा अशा अनेक पद्धतीचा वापर करुन शत्रूचा नायनाट करते.
 
‘मोसाद’जवळ टॉप क्लास सिक्रेट एजंट
 
‘मोसाद’ ही इस्रायलच्या तीन प्रमुख गुप्तचर संस्थांपैकी एक आहे. ‘अमन’, ‘शिन बेट’ आणि ‘मोसाद’ अशी त्यांची नावे आहेत. ‘अमन’ (लष्करी गुप्तचर शाखा) आणि ‘शिन बेट’ (अंतर्गत सुरक्षा शाखा) आणि ‘मोसाद’ परदेशात गुप्त माहिती गोळा करते. गुप्त माहितीचे विश्लेषण आणि गुप्त ऑपरेशन्सशी संबंधित कामे करीत असते. ‘मोसाद’ची दोन स्वतंत्र काऊंटर टेररिझम युनिट्स आहेत. पहिल्या युनिटचे नाव ‘मेटसाडा’ असून, ती शत्रूवर हल्ला करते. दुसरी ‘किडोन युनिट’ असून हिचे काम गुप्तपणे चालते. मुख्यत: अतिरेक्यांचा खातमा करते. ‘मेटसाडा’ची देखील स्वतंत्र युनिट्स आहेत.
 
‘मोसाद’जवळ टॉप क्लास सिक्रेट एजंट आहेत. हायटेक इंटेलिजन्स टीम, शार्प शूटर आणि विषकन्या सौंदर्यवतींसह अनेक गुप्तहेर आणि समर्पित गुप्त योद्ध्यांची फौज आहे. ‘मोसाद’चे हेर इतक्या सफाईने एखाद्या मोहिमेला तडीस नेतात की, कोणताही पुरावा मागे शिल्लक ठेवत नाहीत. ‘मोसाद’ इस्रायल आणि ज्यूंच्या रक्षणासाठी सक्रीय असून, अन्य देशांच्या गुप्तहेर संघटनाशी गुप्तपद्धतीने संबंध विकसित करीत आहे. इस्रायलशी उघडपणे समर्थन न देणार्‍या देशांशी देखील ‘मोसाद’ने गुप्त संबंध प्रस्थापित केलेले आहेत. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांची हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. हा अपघात इस्रायलने ड्रोनद्वारे घडविला होता. त्याआधी इराणचे अणुशास्त्रज्ञ मोहसेन फखरीजादेह यांची दि. १७ नोव्हेंबर २०२० रोजी तेहरानच्या बाहेर रस्त्याच्या कडेला ते कारमधून जात असताना सेटॅलाईट कंट्रोल मशिनगनद्वारे हत्या झाली होती. त्यांच्या सोबत ११ बॉडीगार्डचा ताफा होता. तरीही त्यांचे प्राण वाचविणे शक्य झाले नव्हते.
 
‘हिजबुल्ला’च्या सदस्यांकडे असलेल्या पेजर आणि संवादाच्या इतर साधनांचा स्फोट झाल्याने प्रचंड खळबळ उडाली. इस्रायलच्या गुप्तहेर संघटनांना आपला ठावठिकाणा कळू नये, या उद्देशाने या उपकरणांचा वापर केला जात होता. मात्र, ते वापरणार्‍या सदस्यांच्या हातातच त्याचा स्फोट झाला. त्यामुळे अनेक सदस्यांचा मृत्यू झाला आणि हजारो जखमी झाले.
 
इस्रायलची अतिशय प्रबळ इच्छाशक्ती
 
इस्रायलच्या सगळ्या संस्थांची म्हणजे सैन्य, सरकार, राजकीय नेतृत्व, गुप्तहेर खाते इच्छाशक्ती अतिशय प्रबळ आहे. इस्रायलने योग्य पद्धतीने योजना आखल्या आणि त्यांची काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी केली. देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणार्‍यांविरोधात एकत्रितपणे लढा देणार्‍या विभागांमध्ये गुप्तहेर विभागाचा सहभाग महत्त्वाचा आहे. हेरगिरी हा जगातील सर्वात जुना द्वितीय क्रमांक मिळवलेला व्यवसाय आहे.
‘मोसाद’च्या अधिकार्‍यांची निवड
 
‘मोसाद’च्या अधिकार्‍यांची निवड इस्रायलच्या लष्करामधून करण्यात येते. काही वेळा जनसामान्यांमधूनही खास माणसे शोधून काढली जातात. पडद्यामागे असलेले जे गुप्तचर यंत्रणेसाठी काम करतात. त्यांचा या सगळ्यामध्ये महत्त्वाचा वाटा असतो. देशाला असलेला एकंदर धोका लक्षात घेऊन गुप्तचर यंत्रणेतील अधिकारी, कर्मचार्‍यांची निवड आणि प्रशिक्षण पार पाडले जाते. इस्रायलला गुप्तचर यंत्रणा मजबूत बनविण्याची गरज कळली आणि त्यांनी त्यानुसार पावले उचलायला सुरूवात केली. वेळोवेळी विचार करून गुप्तचर यंत्रणेचे काम अधिकाधिक उत्तम केले. आज स्वत:च्या जबाबदार्‍या जाहीरपणे जगाला सांगणारी ‘मोसाद’ ही गुप्तचर यंत्रणा आहे. त्यांची स्वत:चे संकेतस्थळ आहे. गुप्त पद्धतीने माहिती मिळवणे, तिचे विश्लेषण करणे आणि स्वत:च्या देशाच्या सीमांपलीकडे जाऊन गुप्त पद्धतीने ऑपरेशन्स करणे, याबद्दल या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. आज या गुप्तचर यंत्रणेचे काम व्यापक झालं आहे. विघातक देशांमध्ये हिंसा घडवणारी शस्त्रास्त्रे निर्माण होण्यापासून आणि त्यांच्या हाती लागण्यापासून थांबवण्याचे काम या यंत्रणेकडून होत आहे. परदेशात असलेल्या इस्रायली उच्चपदस्थांवर विघातक हल्ले होण्यापासून थांबवणे, ज्या ज्यूंना मायदेशी परतायचे आहे, त्यांना गुप्तपणे मायदेशी परतायला मदत करणे, राजकीय क्षेत्रात घडणार्‍या घडामोडींविषयी माहिती मिळवणे, इस्रायलबाहेर स्पेशल ऑपरेशन्स करणे अशी ‘मोसाद’च्या कामांची यादी देता येईल.
 
इस्रायलमध्ये राष्ट्रप्रेमाची अनोखी भावना
 
इस्रायलमध्ये लष्करी प्रशिक्षण अनिवार्य असल्याने त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेमाची अनोखी भावना पाहायला मिळते. अशा व्यक्तींशी कोणताही गाजावाजा न करता संपर्क साधला जातो. ज्या नागरिकांची आपल्या देशासाठी स्वत:चे आयुष्य वेचण्याची तयारी असते. त्यांना या क्षेत्रामध्ये प्राधान्य दिले जाते. त्यांचा बुद्ध्यांक सामान्यांपेक्षा जास्त असतो. त्यांना अनेक शारीरिक, वैद्यकीय आणि मानसिक चाचण्यांना तोंड द्यावे लागते. त्यांची मुलाखत ‘मोसाद’चे सगळ्यात वरिष्ठ अधिकारी घेतात. त्यांना प्रत्येक पातळीवर पारखून घेतले जाते.
 
या प्रशिक्षणासाठी दोन वर्षांहून अधिक कालावधी लागतो. या कालावधीमध्ये त्यांना गोपनीय संपर्क साधण्याचे तंत्र, तंत्रज्ञानाचा वापर, संवाद साधण्याची कला, इस्रायलसह विविध देशांच्या लष्कराविषयी सखोल माहिती, शस्त्रास्त्रांविषयी माहिती आदी विषयांबद्दल दोन वर्षांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. गुप्तचर यंत्रणेचे कार्य गुप्तपणे चालणे अत्यावश्यक असते. त्यामुळे हे कार्य, त्यांच्या हालचाली संरक्षित असतात. प्रत्येक ‘मोसाद’ अधिकार्‍याला अरबी भाषा उत्कृष्टरित्या बोलता येणे आवश्यक असते. त्याशिवाय आणखी एक विदेशी भाषाही त्याला बोलता यायला हवी. या भाषाही त्यांना या काळामध्ये शिकवल्या जातात. त्यांना विविध माध्यमांचा वापर करून एखाद्यावर नजर ठेवणे, पाठलाग करणे, याचे प्रशिक्षण दिले जाते. हे सगळे प्रशिक्षण त्यांना विविध पातळ्यांवर, विविध ऑपरेशन्समध्ये मदत करते.
 
भारताला शिकण्यासारखे बरेच काही आहे
 
अर्थात, इस्रायलची गुप्तचर यंत्रणा किती श्रेष्ठ आहे, याबद्दल फक्त कौतुक करणे हा उद्देश इथे नाही. इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेकडून भारताला शिकण्यासारखे बरेच काही आहे. कारण, प्रेरित झालेली माणसे कायम लहान-मोठ्या घटनांमधून शिकत राहतात आणि स्वत:मध्ये, आजूबाजूला बदल घडवतात. इस्रायलने केलेल्या विविध ऑपरेशनचा अभ्यास करून आपण भारतीय गुप्तहेर यांची कार्यपद्धती सुधारली पाहिजे. त्यामधून जर आपल्या गुप्तचर यंत्रणांना, या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणार्‍यांना काही शिकता आले तर भारताचे भविष्य अधिक सुरक्षित होऊ शकते.
 
आपल्यासाठी बांगलादेशी घुसखोर, माओवादी, उग्रवादी, अफू, गांजा, चरस, दहशतवाद करणारे आणि त्यांचे समर्थक यांची माहिती मिळवणे, त्याचे योग्य विश्लेषण करणे हे काम इतके अशक्यप्राय का होते? गुप्तचर यंत्रणेमध्ये भारतीय नागरिकांना सामील करून घेण्यासाठी अजूनही बरोबर पध्दती वापरत आहोत? गुप्तचर यंत्रणेला मदत म्हणून विविध क्षेत्रांतल्या व्यक्तींचा उपयोग कितपत केला जातो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण भारतीय म्हणून सजगपणे शोधायला हवी आणि ती उघडपणे विचारायला हवीत, तरच या संपूर्ण यंत्रणेचे डोळे उघडायला मदत होऊ शकते आणि परिणामी आपल्या देशाला असलेला धोका कमी होऊ शकतो.
हेमंत महाजन
 
Powered By Sangraha 9.0