वसंतराव देशमुखांचे वक्तव्य निषेधार्ह! कारवाई करणार : चंद्रशेखर बावनकुळे

    26-Oct-2024
Total Views |
 
Bawankule
 
मुंबई : वसंतराव देशमुखांनी जयश्रीताई थोरात यांच्याबद्दल केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केले आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याविरोधात भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. यावर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली.
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "जयश्री थोरात माझ्या मुलीप्रमाणे आहेत. त्या आमच्या परिवारातील घटक आहेत. त्यांच्याबद्दल बोलल्यामुळे वसंतराव देशमुख यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. ते जिथे असतील तिथून त्यांना ताब्यात घ्यायला हवे. जयश्रीताईंचा अपमान सहन केला जाणार नाही. त्यामुळे वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो." 
 
"भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून जी कडक कारवाई वसंतराव देशमुखांवर व्हायला हवी, ती केली जाईल. या घटनेचा गैरफायदा घेऊन विरोधी पक्षांनी सुजय विखे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जे दोषी आहेत त्यांनासुद्धा शिक्षा व्हायला हवी," अशीही मागणी बावनकुळेंनी केली आहे.