बच्चू कडू यांना धक्का! प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांचा भाजपमध्ये प्रवेश
26-Oct-2024
Total Views |
मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शनिवार, २६ ऑक्टोबर रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. तसेच भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियूक्ती करण्यात आली आहे.
याप्रसंगी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "अनिल गावंडे यांनी केलेले सामाजिक काम बघून भाजप नेते संजय कुटे यांनी त्यांना पक्षप्रवेश देण्याचा निर्णय घेतला. अनिल गावंडेंच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहिल आणि पुढच्या काळात त्यांचे नेतृत्व समाजाला न्याय मिळवून देईल. त्यांच्या नेतृत्वात पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यात पक्षाचे काम उभे राहिल. इथले सोयाबिन, कापूस आणि इतर सर्व प्रश्न अनिल गावंडे पुढे नेतील आणि एक सामाजिक चळवळ उभी करतील. अनिल गावंडे यांच्या पक्षप्रवेशामुळे एक मोठा वर्ग पक्षाला मजबूत बनवण्यासाठी सामील झाला आहे. ते केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना आणि विकासकामे पुढे नेतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
"जयश्री थोरात माझ्या मुलीप्रमाणे आहेत. त्या आमच्या परिवारातील घटक आहेत. त्यांच्याबद्दल बोलल्यामुळे वसंतराव देशमुख यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. ते जिथे असतील तिथून त्यांना ताब्यात घ्यायला हवे. जयश्रीताईंचा अपमान सहन केला जाणार नाही. त्यामुळे वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. या घटनेचा गैरफायदा घेऊन विरोधी पक्षांनी सुजय विखे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जे दोषी आहेत त्यांनासुद्धा शिक्षा व्हायला हवी," अशीही मागणी बावनकुळेंनी केली आहे.