संघसमर्पित स्वयंसेवकाचे अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन

    25-Oct-2024
Total Views |

ramesh vaze
 
नालासोपारा (प.) येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रमेश काशिनाथ वझे यांना आज वयाची ७५ वर्षें पूर्ण होत आहेत. बालस्वयंसेवक असलेल्या रमेश वझे यांनी नालासोपारा, वसई या भागांत संघविचार पोहोचविण्याचे आणि रुजविण्याचे कार्य अविरतपणे केले. १९६४ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केल्यानंतर त्यांनी सन १९६९, १९७० आणि १९७१ या तीन वर्षांत संघाचे प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षांचे शिक्षण पूर्ण केले. रमेश वझेंनी स्वयंसेवकापासून मुख्यशिक्षक, मंडल कार्यकर्ता, तालुका कार्यकर्तापासून ते जिल्हा कार्यकर्त्यांपर्यंत संघाने दिलेले दायित्व निष्ठेने पार पाडले. रमेश वझे हे एक चांगले गीतगायक, ‘बौद्धिक’ देणारे, तसेच अनेक संस्कृत सुभाषित कंठस्थ असलेले स्वयंसेवक म्हणून आजही पंचक्रोशीत सुपरिचित आहेत. अशा या संघसमर्पित स्वयंसेवकाचे हे अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन...
 
रमेश वझे यांचा अल्पपरिचय
 
  • संपूर्ण नाव : रमेश काशिनाथ वझे
  • निवास : मर्देस, कोरोटी नालासोपारा (प.)
  • जन्मतारीख : २५ ऑक्टोबर १९४९
  • वय वर्ष : ७५ वर्ष (अमृत महोत्सव)
  • संघ आयु : ६० वर्षे (बालपणापासून स्वयंसेवक)
  • संघ शिक्षा वर्ग : सन १९६९, १९७०, १९७१ (प्रथम, द्वितीय, तृतीय पूर्ण)
  • परिवार इतिहास : पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंड
रमेश काशिनाथ वझे यांचा जन्म दि. २५ ऑक्टोबर १९४९ रोजी नालासोपारा पश्चिम येथील मर्देस कोरोटी गावात झाला. एकूण पाच बहिणी व चार भाऊ असा त्यांचा परिवार. त्यातील नारायण काशिनाथ वझे (वय ९२) व सुभाष काशिनाथ वझे (वय ७२) हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ व संघ परिवाराच्या कामात सक्रिय होते. माझ्या माहितीनुसार, संघकामाचे बाळकडू त्यांचे ज्येष्ठ बंधू नारायण काशिनाथ वझे यांच्याकडूनच मिळाले. त्यांच्या दोन भगिनी कुसुम अनंत पाटील व उषा काशिनाथ नाईक या राष्ट्र सेविका समितीच्या कामात सक्रिय होत्या.
 
१९६४ साली सोपारा शाखेत रमेश वझेंना पाठवण्यात, तसेच संघकामात सक्रिय करण्यास त्यांचे बंधू नारायण काशिनाथ वझे आणि कै. जगन्नाथ रामचंद्र वझे यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानुसार रमेश वझे, गणेश नारायण वझे आणि अनंत बाळकृष्ण नाईक हे तिघे सोपारा शाखेत जाऊ लागले. अशा रितीने संघामध्ये त्यांचा प्रवेश झाला. विशेष म्हणजे, आमच्या वसई येथे सुरूवातीला संघाचे काम सुरू झाले, त्यामध्ये सोपारा येथील शाखा होती आणि या सोपारा शाखेत महाकाली मंदिरात, १९३६ साली डॉक्टरांचा (संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार) प्रवास झाला होता.
 
संघ परिवारात आज रमेश वझे हे बंधू म्हणूनच परिचित आहेत. १९६४ साली संघात प्रवेश झाल्यानंतर त्यांनी सन १९६९, १९७० आणि १९७१ या तीन वर्षांत संघाचे प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षांचे शिक्षण पूर्ण केले. संघ शिक्षणाबरोबरच मोठ्या बंधूंना शेती आणि दुग्ध व्यवसायात मदत करून एम.ए. पर्यंत लौकिक शिक्षण पूर्ण केले आणि ‘क्रॉम्टन ग्रीव्हज’ या नामांकित कंपनीत मार्केटिंग विभागात विभाग अधिकारी म्हणून सेवा केली. बंधू हे स्वस्थ बसणारे नव्हते. सतत क्रियाशील, कामात व्यस्त, सतत प्रवास करणारे असे संघ परिवारात त्यांचे नाव होते. २०२४ सालचे विजयादशमीचे त्यांचे ६० वे (हीरकमहोत्सवी) संचलन होते.
१९६४ साली त्यांनी विजयादशमी उत्सवात पहिल्यांदा हजेरी लावली होती. रमेश वझेंशी आम्ही काही स्वयंसेवकांनी संवाद साधला. तेव्हा त्यांनी ज्यांच्याकडून संघकामाची प्रेरणा घेतली, असे प्रचारक दिवंगत सुमंतराव घायाळ, शंकर दिनकर काणे (भैय्याजी काणे) माधवराव करंबेळकर, तात्याराव करंदीकर अशांची नावे सांगितली.
 
रमेश वझे चांगले गीतगायक, बौद्धिक देणारे तसेच अनेक संस्कृत सुभाषित कंठस्थ असलेले स्वयंसेवक आहेत. ‘बौद्धिक’ची स्फूर्ती त्यांनी त्यावेळचे दिवगंत अरविंद पेंडसे यांच्याकडून घेतली.
 
 
rss
 
वसई तालुक्यातील संघकामाला ज्यांनी गती, दिशा दिली, त्यापैकी एक म्हणजे रमेश वझे. आज वसई जिल्ह्यात (पूर्वीचा वसई तालुका) जे काही संघकाम आहे. त्याचे श्रेय कै. मदनदादा पाटील, कै. मोरेश्वर पितळे, कै. तात्या पितळे, कै. मधुकर ठाकूर, कै. डॉ. उमेश पै, कै. अरविंद पेंडसे, कै. अशोक ढापरे, कै. अण्णा आपटे त्याबरोबर सध्या हयात असलेले व गोकर्ण येथे वास्तव्यास असलेले, तेव्हाचे तालुका कार्यवाह गोवर्धन राम पै, गजाभाऊ निजाई यांच्या सह रमेश वझेंना देखील यांचे श्रेय जाते. या सर्वांच्या बरोबर बंधू (रमेश वझेंनी) यांनी संघाचे काम केलेले आहे. रमेश वझे हे सोपारा (समेळपाडा) येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद असून, प्रत्येक महिन्याच्या कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित असतात. रमेश काशिनाथ वझे, कोरोटी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्यासोबत संघकाम केलेले त्यांचे समवयस्क सहकारी स्वयंसेवक गणेश नारायण वझे आणि अनंत बाळकृष्ण नाईक, कोरोटी यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले. हे दोघेही स्वयंसेवक रमेश वझे सह प्रत्येक गावात जात असत.
 
रमेश वझेंनी स्वयंसेवकापासून मुख्यशिक्षक, मंडल कार्यकर्ता, तालुका कार्यकर्तापासून जिल्हा कार्यकर्त्यांपर्यंत जबाबदारीने काम केले आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्याकडे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक जनकल्याण समिती’चे ते जिल्हा उपाध्यक्ष अशी जबाबदारी होती. वसई जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये रमेश वझेंचा प्रवास झाला आहे. विशेषतः पश्चिम पट्टीतील गावांत या बंधूंना ओळखत नाही, असे शोधून एकही गाव सापडणार नाही. त्यांचा जनसंपर्क खूप मोठा होता. संघकामाबरोबरच आमच्या सामवेदी समाजातील सर्व कार्यक्रमांना, लोकांच्या वैयक्तिक सुखदुःखात वझे बंधू सहभागी होत असत.
 
बंधूंचे वर्णन करायचे झाल्यास डोक्यावर बर्फ, पायाला चक्र आणि तोंडात साखर अशा कार्यकर्त्यांमध्ये करावा लागेल. संघकाम करत असताना बंधू परिवारात येणार्‍या सर्व सुखदुःखांवर (संकटांवर) हसतमुखाने सामोरे जात. सध्या आजारी असलेल्या त्यांच्या धर्मपत्नी यांची सेवा-सुश्रुषा करून ते संघकामातील सर्व कार्यक्रमांत हजर असतात. या बाबतीत मी विचारले असता ते म्हणाले, “संघ हीच जीवनगाथा, जगतास देऊ मानवता” आणि पुढे ते म्हणतात, “संकटे आजवरी आली, थांबवू ना आम्हा शकली, ती अखेर सारी थकली, नामविला तयांनी माथा.”अशा रितीने गीते म्हणत ते आमचे स्वागत करीत. त्यामुळे बंधूंनी अनेक माणसे जोडली. अनेक कार्यकर्ते घडविण्यात बंधूंचा सिंहाचा वाटा आहे.
 
मी स्वतः प्रभाकर नाईक, अनिल नाईक, गजानन वझे, बाबुराव वझे, दिलीप जोशी, राजाभाऊ नाईक, दिगंबर नाईक, धवल जोशी तसेच, परिवारातील राजन नाईक, मनोज पाटील, हरेश्वर नाईक आणि अन्य काही कार्यकर्ते घडविण्यात बंधूंंचा सिंहाचा वाटा आहे. आम्हा सर्वांपुढे बंधूंचाच आदर्श आहे.
 
आज संघ शताब्दी वर्षाकडे वाटचाल करीत असताना, आपल्या परिसरातील सर्व जुन्या नवीन स्वयंसेवकांनी अधिक सक्रिय होण्याची आवश्यकता आहे. असे सर्व जण सक्रिय होऊन आपल्या हिंदू समाजासमोर, देशासमोर असलेल्या आव्हानांना संघटितपणे सामना करण्यासाठी बंधूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला, तर खर्‍या अर्थाने बंधूंचा अमृतमहोत्सवी प्रकट दिन साजरा केल्याचे समाधान होईल.
 
मी बंधूंना आपणा सर्वांतर्फे त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो! त्यांना निरामय, निरोगी, सुदृढ असे शतायुषी आयुष्य लाभून त्यांच्या परिवाराची सर्व क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती होतो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. 
भारतमाता की जय. 
वंदे मातरम्...
जय श्री राम....
प्रभाकर नाईक
८२३७३७८१९७