मुंबई : प्रविण तरडे दिग्दर्शित धर्मवीर २:साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. प्रेक्षकांनी धर्मवीर १ ला जितका प्रतिसाद दिला तितकाच किंबहुना त्याहून अधिक प्रेम धर्मवीर २ ला मिळालं. चित्रपटगृहात उत्तुंग कामगिरी केल्यानंतर प्रसाद ओक, क्षितीज दाते यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला ‘धर्मवीर २’ ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.
अभिनेता प्रसाद ओक याने फेसबूकवर पोस्ट करून ‘धर्मवीर २’ ओटीटीवर रिलीज झाल्याची माहिती दिली आहे. ‘ज्यांनी कधीच नाही केली तत्वांशी तडजोड, अशा धर्मवीर दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची आहे ही गोष्ट… पाहा धर्मवीर २ फक्त ZEE5 वर,’ अशी पोस्ट प्रसाद ओक याने केली आहे. ‘धर्मवीर २’ आता ओटीटीवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
‘धर्मवीर २’ चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १.९२ कोटी रुपये कमावले होते. २०२४ मध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा हा मराठी चित्रपट आहे, असं निर्माते म्हणाले. तसेच सहा दिवसांत या चित्रपटाने १२.२८ कोटी रुपये कमावल्याची पोस्ट त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी केली होती. या चित्रपटाने एकूण १५.५ कोटी रुपये कमावले, असे वृत्त सॅकनिल्कने दिले आहे.
दरम्यान, प्रविण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर २’ चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिश दातेने साकारली आहे. या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केली आहे. हा चित्रपट आधी ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र त्यावेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. राज्यातील अनेक भागांना पुराचा फटका बसल्याने या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते.