भाजपने पुढील वर्षी होणार्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ‘आप’ सरकारविरोधात प्रचारास आतापासूनच प्रारंभ केला आहे. दिल्लीतील झोपडपट्टी परिसरात प्रचार करताना भाजपने केजरीवाल यांच्या निवासस्थानासही लक्ष्य केले. यापूर्वीदेखील निवासस्थान बांधून पूर्ण झाल्यावर त्यामध्ये महागड्या वस्तू असल्याचा आरोप भाजपने केला होता.
गेल्या आठवड्यात भाजपने झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्या लोकांसाठी मोठी मोहीम राबविली. या प्रचारात भाजपने २४५ ठिकाणी आंदोलन केले. आम आदमी पक्षाच्या (आप) राजवटीत झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्या लोकांची अवस्था वाईट असून त्यांच्यासाठी काहीही केले गेले नाही, असा आरोप भाजपने केला. या मोहिमेचे नेतृत्व दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा करत होते. यावेळी भाजपचे अनेक बडे नेते, खासदार, आमदार आणि नगरसेवक उपस्थित होते. ’आप’च्या चुकीच्या कारभारामुळे झोपडपट्टीतील लोक नाराज असून त्यांनी दिल्लीतील ’आप’ला सत्तेतून हटवण्याचा निर्णय घेतल्याचे सचदेवा म्हणाले. वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, “अरविंद केजरीवाल आणि आतिशी यांच्या खोट्या आश्वासनांना मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टीवासी दोघेही कंटाळले आहेत. गरीब परिस्थितीत जगण्यास भाग पडलेल्या लोकांनी आपला दिल्लीतून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप सत्तेत आल्यास दिल्लीतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्या लोकांचे जीवनमान सुधारण्याचे काम करेल,” असे आश्वासनही त्यांनी दिले.
दुष्यंत गौतम, रामवीर सिंग बिधुरी, योगेंद्र चंदोलिया, कमलजीत सेहरावत, विजेंद्र गुप्ता आणि मीनाक्षी लेखी यांसारख्या अनेक भाजप नेत्यांनी या निषेधांमध्ये भाग घेतला. दक्षिण दिल्लीतील भाजप खा. रामवीर सिंह बिधुरी म्हणाले की, “आप आणि केजरीवाल यांनी झोपडपट्टीत राहणार्या लाखो लोकांचा विश्वासघात केला आहे.” ते म्हणाले की, “दहा वर्षांच्या शासनानंतरही आप सरकारने या लोकांना पाणी, स्वच्छता, शौचालये, रस्ते आणि मूलभूत सुविधा दिल्या नाहीत.” बिधुरी यांनी आरोप केला की, “झोपडपट्ट्यांमध्ये लोक अत्यंत गरीब परिस्थितीत राहतात. त्यांना टँकरमधून पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यापैकी बरेचसे ‘आप’ नेत्यांच्या पाठिंब्याने चालतात.” ते पुढे म्हणाले की, “केजरीवाल यांनी ‘आप’ सरकारचा सर्वाधिक काळ घोटाळे करण्यात घालवला आहे. त्यांनी झोपडपट्टीवासीयांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे, तर भाजप सातत्याने आप सरकारला जनतेच्या समस्यांची जाणीव करून देत झोपडपट्टीवासीयांच्या मदतीसाठी कारवाईची मागणी करत आहे.”
भाजपने पुढील वर्षी होणार्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ‘आप’ सरकारविरोधात प्रचारास आतापासूनच प्रारंभ केला आहे. दिल्लीतील झोपडपट्टी परिसरात प्रचार करताना भाजपने केजरीवाल यांच्या निवासस्थानासही (ज्याला भाजपतर्फे ‘शीशमहल’ असे संबोधले जाते) लक्ष्य केले. यापूर्वीदेखील निवासस्थान बांधून पूर्ण झाल्यावर त्यामध्ये महागड्या वस्तू असल्याचा आरोप भाजपने केला होता. आता मात्र सार्वजनिक बांधकाम खात्यानेच या बंगल्यातील महागड्या वस्तूंची यादी केल्यानंतर भाजपच्या केला धार चढली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यानुसार, केजरीवाल यांच्या घराचे एकूण बिल्ट-अप क्षेत्र २१ हजार स्क्वेअर फूट आहे. किंवा यादीत केजरीवाल यांनी केलेले काही मोठे फिटिंग आणि नूतनीकरण दाखवले आहे. चार-सहा कोटी रुपये खर्चून मोटारीकृत विंडो स्क्रीन बसविण्यात आल्या आहेत. ६४ लाख रुपये खर्चून १ अत्याधुनिक टीव्ही बसविण्यात आले आहेत. दहा लाख रुपयांपेक्षा कमी किमतीचे रिक्लायनर सोफा, १९.५ लाख रुपयांमध्ये स्मार्ट एलईडी टर्नटेबल डाउनलाइट्स, नऊ लाख रुपयांमध्ये एक किचन ओव्हन, १५ कोटी रुपयांमध्ये उत्कृष्ट पाणीपुरवठा आणि सॅनिटरी इन्स्टॉलेशन्स, ३६ लाख रुपयांपर्यंत सजावटीचे खांब आणि टॉयलेट सीटची किंमत रुपये १०-१२ लाख आहे. केजरीवाल आणि ‘आप’साठी ही यादी समोर येणे अतिशय अडचणीचे ठरले आहे. कारण, यामुळे केजरीवाल यांच्या कथित ‘आम आदमी नेता’ या प्रतिमेस चांगलाच धक्का पोहोचला आहे. परिणामी, ‘आप’ नेते सध्या केजरीवाल यांच्या या ‘शीशमहल’विषयी बोलणे टाळत असल्याचे दिसून येते.
१९९८ सालापासून दिल्लीच्या सत्तेत बाहेर असलेल्या भाजपने पुढील विधानसभा निवडणुकीत पुनरागमन करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. दिल्लीतील वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी पक्ष वेगवेगळी रणनीती आखत आहे. त्यातही दिल्लीतील दहा मतदारसंघांकडे भाजपने विशेष लक्ष पुरविण्यास प्रारंभ केला आहे. हे असे मतदारसंघ आहेत, जेथे गत विधानसभा निवडणुकीमध्ये जिथे विजय-पराजयाचे प्रमाण तीन हजार किंवा त्याहून कमी होते. यामध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले मनीष सिसोदिया यांच्या पटपडगंज विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.
२०२० सालच्या विधानसभा निवडणुकीत मतमोजणीदरम्यान अनेक चढ-उतारानंतर सिसोदिया यांनी भाजप उमेदवार रवींद्र सिंह नेगी यांचा ३ हजार, २०७ मतांनी पराभव केला. बिजवासन विधानसभा मतदारसंघातही चुरशीची लढत होती. जिथे आम आदमी पार्टी आणि भाजपच्या उमेदवारांमधील विजय-पराजयाचा फरक फक्त ७५३ मतांचा होता. भाजपचे सतप्रकाश राणा यांनी ही विधानसभा जागा आपच्या बी. एस. जूनकडून गमावली होती. या जागेवरही चांगल्या रणनीतीने निवडणूक लढवल्यास यावेळी यश मिळू शकेल, असे पक्षाला वाटते. गेल्या निवडणुकीत आदर्श नगर जागेवर १ हजार, ५८९ मतांचा फरक होता. येथे आपचे पवन शर्मा यांनी भाजपचे राजकुमार भाटिया यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीत आदर्श नगर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला ज्या प्रकारे मते मिळाली, त्यामुळे पक्षातही या जागेबाबत उत्सुकता आहे. शालिमार बाग आणि कस्तुरव नगर विधानसभेतही विजय-पराजयाचे अंतर फारसे नव्हते, असे पक्षाचे नेते सांगतात. या दोन्ही विधानसभांमध्ये भाजपच्या उमेदवारांचा सुमारे तीन हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे यावेळी विजयाचे हे किरकोळ अंतर भरून काढण्यासाठी भाजपने तयारी केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली संघटनात्मक बांधणीदेखील मजबूत करण्यास सुरूवात केली आहे. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे दिल्लीतील सात जिल्ह्यांमध्ये सदस्यत्व मोहिमेची जबाबदारी येताच पक्षसंघटनेमध्ये उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे. भाजपने सदस्यत्व मोहिमेच्या प्रचारासाठी तसेच, पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आपल्या ज्येष्ठ नेत्यांना मैदानात उतरवले आहे. दिल्लीतील उर्वरित सात जिल्ह्यांतील ‘सदस्यत्व अभियाना’ची कमान केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रचारावर देखरेख ठेवण्याबरोबरच पक्षाचे दोन्ही ज्येष्ठ नेते संघटनात्मक दौरेही करत असून बुथस्तरासोबत संपर्क साधत आहेत. दिल्ली भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुथच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करणार्या भाजपने बुथद्वारेच सदस्यत्व मोहीमही सुरू केली आहे. प्रत्येक बुथवर किमान १०० किंवा १५० सदस्य असावेत, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कार्यकर्त्यांना या प्रक्रियेबद्दल लोकांना योग्य माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. खासदार, आमदारांसह जिल्हाध्यक्ष, अधिकारी व ज्येष्ठ नेत्यांना सदस्य बनविण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. स्मृती इराणी आणि हर्ष मल्होत्रा यांना कोणी किती सदस्य नियुक्त केले यावर देखरेख आणि पुनरावलोकन करण्याचे काम देण्यात आले आहे. गेल्या रविवारपासून या दोन्ही नेत्यांनी आपली जबाबदारी स्वीकारली आहे. प्रचाराला गांभीर्याने न घेणार्यांवर भविष्यात कोणतीही मोठी जबाबदारी सोपवली जाणार नाही, असा इशाराही बैठकांमध्ये देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीतील विजय हे दिल्ली भाजपसाठी चांगला संकेत ठरला असल्याचे पक्षाचे मत आहे. पुढील वर्षी दिल्लीत होणार्या विधानसभा निवडणुकीत हा विजय भाजपसाठी संजीवनी ठरेल. जाट वर्चस्व असलेल्या हरियाणात भाजपविरोधात सत्ताविरोधी लाट असतानाही या विजयाने दिल्ली भाजपला नवा धडा दिला आहे. तो म्हणजे कोअऱ व्होटर सोबत असल्यास परिस्थिती अगती सहजच बदलता येते. त्यामुळे भाजपने दिल्लीत आपल्या कोअर मतदारांसोबत विशेष संपर्क मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे चार महिने उरले आहेत. येथे ‘आप’ सरकारच्या विरोधात ‘अॅण्टी इन्कम्बन्सी’ची स्थिती सध्या तरी दिसत नाही. मात्र, तरीदेखील हरियाणाप्रमाणे येथेही सुयोग्य सामाजिक समीकरणे जुळवून विजय मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.