सुव्रत जोशीने आणली ‘सवलत माझी लाडकी योजना’; काय आहे जाणून घ्या...

24 Oct 2024 15:11:24

suvrat joshi  
 
 
मुंबई : अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांची प्रमुख भूमिका असलेलं ‘वरवरचे वधू-वर’ नाटक सध्या रंगमचावर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता विराजस कुलकर्णीने नाटकाचे लिखाण करत नाटक दिग्दर्शित देखील केले आहे. ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकाला मिळत असलेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहता सुव्रत जोशीने ‘सवलत माझी लाडकी योजना’ प्रेक्षकांसाठी खास आणली आहे. ही योजना नेमकी काय आहे? जाणून घ्या…
 
तर, सुव्रत जोशीने ‘सवलत माझी लाडकी योजना’ची घोषणा २३, ऑक्टोबरला त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन जाहीर केली. एक व्हिडीओ शेअर करत ही नेमकी योजना काय आहे हे सुव्रतने सांगितले आहे. सुव्रत म्हणाला आहे की, “नमस्कार मी सुव्रत, आमचं नवीन नाटक ‘वरवरचे वधू-वर’ याला तुम्ही चांगलाच प्रतिसाद देतायत. येत्या २६ तारखेला पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरात याचा रौप्य महोत्सव, २५वा प्रयोग दोन महिन्याच्या आतमध्ये होतोय. हे तुमच्या प्रेमामुळे शक्य झालंय. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. या प्रयोगाला या. तो प्रयोग आपल्याला हाउसफुल्ल करायचा आहे.”
 

suvrat joshi  
 
पुढे सुव्रत म्हणाला की, “क्रमांक दोन, कला कलाकारखानची सुरुवात केल्यापासून म्हणजेच माझ्या निर्मिती संस्थेची सुरुवात केल्यापासून ‘अमर फोटो स्टुडिओ’च्या वेळी किंवा ‘दिल दोस्ती दुनियादारी’च्या वेळी माझं असं लक्षात आलंय की, एक मोठा तरुण वर्ग आमचं नाटक बघायला येतो. अनेकदा पहिलं मराठी नाटक बघायला लोक येतात ते आमचं नाटक असतं. याचा मला अतिशय आनंद आहे. याच वेळी मला याचीदेखील कल्पना आहे की, ५०० रुपयांचं तिकीट हे बऱ्याचशा मोठ्या तरुणवर्गाला महाग पडतं. त्यात खालची तिकीट ५०० रुपये असतात. नाटक पुढून बघायची इच्छा असते. याचसाठी मी नवीन एक योजना घेऊन आलो आहे. ते म्हणजे महिन्यातून एका आडवारी मी असा एक प्रयोग करायचा ठरवला आहे की, जेव्हा मी खालची तिकिटं ३०० रुपयांनी प्रेक्षकांसाठी उपलब्ध करतोय. याचा आस्वाद कॉलेजचे लोक किंवा कोणीही घेऊ शकतं. असं काही नाही की तुम्हाला कॉलेजचा आयडी दाखवायला पाहिजे.”
 
“याचा प्रयोग येत्या २८ तारखेला दुपारी ४ वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली येथे करणार आहोत. या प्रयोगातील खालची बरीचशी तिकिट ३०० रुपयांनी विकायला काढली आहेत. ती तिकिट ऑनलाइन उपलब्ध आहेत. लवकरात लवकर ती तिकिट विकीत घ्या. तुमची वाट बघतोय. कॉलेजच्या ग्रुपने या आणि आनंद घ्या. थँक्यू, भेटूया. प्रेम,” असं सुव्रत म्हणाला.
Powered By Sangraha 9.0