मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाने नव्या रेल्वे प्रकल्पांना मंजूरी दिली असून प्रस्तावित प्रकल्पांच्या कामांना गती मिळणार आहे. नरकटियागंज - रक्सौल - सीतामढी - दरभंगा आणि सीतामढी - मुझफ्फरपूर खंडाचे २५६ किलोमीटरचे दुहेरीकरण आणि अमरावती मार्गे एरुपलेम आणि नंबुरू दरम्यान ५७ किलोमीटरच्या नवीन मार्गाचे बांधकाम या प्रस्तावित दोन नव्या रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूरी देण्यात आली आहे.
दरम्यान, प्रस्तावित नवीन रेल्वे मार्ग आंध्र प्रदेशची प्रस्तावित राजधानी 'अमरावती'ला थेट संपर्क सुविधा प्रदान होणार असून उद्योग आणि लोकांची गतिशीलता, भारतीय रेल्वेसाठी वर्धित कार्यक्षमता आणि सेवा विश्वासार्हता प्रदान करण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर, बहु-पदरी रेल्वे मार्गाच्या प्रस्तावामुळे अंमलबजावणी प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होईल.
नव्या रेल्वेमार्गांमुळे गर्दी कमी होण्यास मदत होऊन भारतीय रेल्वेमधील सर्वात व्यस्त विभागांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधांचा विकासदेखील केला जाणार आहे. पहिल्या प्रकल्पाच्या माध्यमातून नेपाळ, ईशान्य भारत आणि सीमा भागांशी संपर्क मजबूत होईल आणि मालगाड्यांसह प्रवासी गाड्यांची वाहतूक सुलभ होऊन क्षेत्राची सामाजिक आणि आर्थिक वाढ होईल. यासह सुलभ प्रवास, लॉजिस्टिक खर्च कमी, तेल आयात कमी आणि कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जन कमी करणारे हे दोन्ही प्रकल्प आगामी ५ वर्षांत पूर्ण केले जाणार आहेत.