परकाया प्रवेश
परकाया ही सिद्धी अतिशय कठीण आणि फसवीसुद्धा आहे. अशा तर्हेने परकायाप्रवेश करणारा योगी, मायेत सापडल्यामुळे त्या शरीरात बंदिस्त होऊ शकतो. मग पुनः मरण येईपर्यंत तो योगी त्या निम्न प्रकाराच्या शरीरात बंदिस्त राहील. म्हणजे एका शरीराचे बंधन सोडून, तो दुसर्याच्या शरीरात बंदिस्त राहू शकतो. म्हणून ज्यांनी सर्व प्रकारच्या मायेला जिंकले आहे, अशा परमश्रेष्ठ योग्यानेच परकायाप्रवेशाचा प्रयोग करुन पहावा. परकायाप्रवेश करणारे श्रेष्ठ योगी काही अनुभव घेण्याकरिताच, परकायाप्रवेश करीत असतात. परकायेत नेहमी राहण्याकरिता नव्हे.
जगद्गुरू आद्य शंकराचार्यांचा मंडणमिश्र या विद्वानासोबत वादविवाद सुरु असताना आपला पती वादात पराजयी होत असल्याचे पाहून, त्यांच्या पत्नीने आचार्यांना कामशास्त्राविषयी काही प्रश्न विचारले. यावर आचार्यांनी सहा महिन्यांचा अवधी मागितला. त्याचवेळी एका अमरु नावाच्या राजाचा मृत्यू झाला होता. आचार्यांनी अमरु राजाच्या मृत शरीरात भोगाचा अनुभव घेण्याकरिता प्रवेश केला होता, आणि आवश्यक तो अनुभव आल्यावर ते शरीर सोडून आचार्य पुन्हा आपल्या शरीरात प्रवेश करते झाले. परकायेतील प्रवेश ज्ञानमय अवस्थेतील असल्यामुळे, पुन्हा स्वशरीरात प्रवेश केल्यावर योग्याला तत्पूर्वीचे सर्व ज्ञान असते.
परकायेची माया जो आवरु शकत नाही, त्याने परकायाप्रवेश केल्यास त्या निम्न परकायेतच त्या योग्याला मृत्यूपर्यंत रहावे लागते. प्रवेश केलेले परशरीर त्याच्या मूळ शरीरापेक्षा निम्न असल्यामुळे, त्या उपकरणाद्वारे येणारे अनुभव वा ज्ञान निम्नप्रकारचेच राहील. त्यामुळे असल्या परकायेत बंदिस्त योग्याचे जीवन अधःपतित बनू शकते. या प्रकारची दोन सत्य प्रकरणे लेखकास माहीत आहेत.
नागपूरला एक परकायाप्रवेशाचे उदाहरण आजपासून ४० वर्षांपूर्वी घडलेले आहे. राजू हेडाऊ नावाचा एक १४ वर्षांचा मुलगा होता. त्याच्या शरीरात हिमालयातील एक योगी परकाया शिरला. परंतु, राजूच्या शरीरात त्याचा पूर्वीचा जीवात्मा होता. त्या जीवात्म्याला राजूच्या जड शरीरातून बाहेर हुसकावून, हिमालयातील योगी जीवात्म्याने राजूच्या शरीरावर ताबा मिळविला. त्या हिमालयातील योग्याचे जडशरीर हिमालयात एक प्रचंड कडा कोसळून छिन्नविछिन्न झाले होते. त्या योगी जीवात्म्याला आता चांगले शरीर न राहिल्याने त्याने हिमालयातील आपले वास्तव्य सोडून, हजार मैल दूर अशा नागपूरमधील बुधवार वस्तीतील राजू हेडाऊच्या जीवंत शरीरात प्रवेश केला. नंतर राजूच्या जीवात्म्याला त्याच्या नियत शरीरातून हुसकावून लावले. शास्त्राच्या दृष्टीने त्या योग्याने हा खूनच केला होता, असे लेखकाचे स्पष्ट मत होते. लेखक त्या राजू शरीरस्थित योग्याला भेटायला गेला असता, त्या योगी जीवात्म्याने लेखकाशी बोलण्याचे टाळले. तो राजूस्थित योगी पापकर्म केल्यामुळे विलक्षण घाबरत होता. राजूचे शरीर त्या योग्याच्या उत्क्रांत जीवात्म्याच्या दृष्टीने अनुत्क्रांत असल्यामुळे, असल्या अनुत्क्रांत शरीररुप उपकरणाचा उपयोग करण्याने परकायाप्रवेश करणार्या योग्याचे अधःपतन होऊ शकते आणि तसेच झाले. असे कळते की, आज राजूस्थित योगी काहीही खातो, काहीही पितो, पैसा मागतो, बुवाबाजी करतो, आणखी काय करतो ते तोच जाणे! परकायाप्रवेश करणारे शरीरही उन्नत योग्याला अनुरुप हवे. शिवाय, परकायाप्रवेश करणारा योगी मायेत न सापडता, सदा आपल्या स्थानी परत जाण्यास उत्सुक असावा.
उत्तर प्रदेशातील एक सिंधी योगी होता. योग्याने मांसमद्य ग्रहण करु नये. केल्यास त्याच्या शरीराला अतिशय त्रास होतो. त्या सिंधी योग्याने आपल्या शिष्याच्या आग्रहावरुन, मद्यमांस भक्षण केले. परिणामी योग्याचे शरीर जीर्णशीर्ण झाले. आता त्या अशास्त्रीय शरीरात राहणे योग्याला शक्य नव्हते. शरीर सोडण्याचा म्हणजे मृत्यूचा काळ जवळ आला. परंतु, आपल्या जीवात्म्यास योग्य अशा उपकरणांची, म्हणजेच कालांतराने एखाद्या मातृगर्भात उत्पन्न होणार्या नवीन शरीराची वाट न पाहाता, या योग्याने एका नुकतेच दफन केलेल्या, मुसलमान रंगारी तरुणाच्या मृत शरीरात प्रवेश केला. त्यानंतर आपले जीर्ण शरीर त्या मुसलमान तरुणाचे कफन ओढून खड्ड्यात ठेवून दिले. त्या मुसलमान तरुणाचे शरीर घेऊन तो योगी, जीवात्मा तेथून अन्यत्र गेला. काही दिवसांनी त्या मुसलमान तरुणाच्या नातेवाईकाने त्याला पंजाब येथील अमृतसर गावी बाजारात पाहिले. त्यावेळी मुसलमान शरीरात वास्तव्य करणार्या त्या सिंधी योग्याचे बरेच अधःपतन झालेले दिसले. पानपट्टीच्या ठेल्यावर जाऊन पानपट्टी खाणे, मद्यमांस भक्षण करणे व असभ्य वर्तन करणे, हा त्या तरुण मुसलमान शरीरस्थित योग्याचा नित्यक्रम होता. म्हणून जीवात्मा जेवढा उत्क्रांत व शुद्ध, तेवढेच त्या जीवात्म्याचे उपकरण म्हणजे शरीर उत्क्रांत व शुद्ध हवे, अन्यथा वरील राजू हेडाऊ आणि सिंधी योग्याप्रमाणे, योगी अधःपतनाच्या मार्गाला लागू शकतात. म्हणूनच परकायाप्रवेश करणारे महान योगी अतिशय संयमी असावे लागतात.
शवासन आणि परकायाप्रवेश या उच्च सिद्धी असल्या, तरी आत्मज्ञानाच्या दृष्टीने त्या साधकाला लाभदायक नाहीत. हीसुद्धा एक मायाच आहे. असल्या सिद्धीच्या मायेवर खर्या साधकाने विजय मिळवायला हवा. सिद्धी अप्सरेप्रमाणे साधकाला मोहित करतात. पण खर्या साधकाने सिद्धींत गुंतू नये, हेच योग्य. परकायाप्रवेश करु शकणारा योगी कोणत्याही प्राण्याच्या नुकत्याच मृत पावलेल्या शरीरात प्रवेश करु शकतो. परंतु, अनुत्क्रांत शरीरात प्रवेश केल्यास त्या अनुत्क्रांत शरीराच्या अकार्यक्षमतेचा विपरित परिणाम योग्यावर होऊन, उन्नत योगी जीवात्मा अनुत्क्रांत बनून पतित व अज्ञानी बनू शकतो, असे अनेक दाखले आहेत.
शवासनाने इच्छित स्थळी गमन
शवासन करुन आपला जीवात्मा आपल्या जड देहातून बाहेर काढल्यानंतर, साधक जीवात्मा केवळ इच्छामात्रेकरुन विश्वाच्या कोणत्याही स्थानी आपल्या सूक्ष्मदेहाने जाऊन येऊ शकतो. पण, त्याकरिता सतत संयमशील अभ्यासाची आवश्यकता असते. केवळ कल्पना करुन वा खोटा प्रचार करुन, असले दिव्य अनुभव येणार नाहीत. जड देहाचे व्यापार प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय होत नसतात. पण लिंगदेहाचे व्यापार इच्छामात्रेकरुन होत असतात. म्हणजे आपल्याला समजा मुंबईहून दिल्लीला जायचे आहे, तर त्याकरिता प्रत्यक्ष पायांनी, सायकलने, आगगाडीने, मोटरने किंवा विमानाने प्रवास करावा लागेल. परंतु, लिंगदेहाचा व्यापार केवळ इच्छेनेच होतो. केवळ इच्छा केल्यानेच साधक इच्छित स्थळी जाऊ शकतो. पण, ती दिव्य इच्छाशक्ती प्राप्त होण्यास, सतत अभ्यासाची आवश्यकता असते. अशा रितीने इच्छाप्रवास केल्यास, लिंगदेही आत्मा वाटेल त्या स्थानी जाऊन तेथील दृश्ये पाहून, अनुभव घेऊन किंवा तेथे कार्य करुन आपल्या स्थानी क्षणार्धात परत येऊ शकतो. (क्रमशः)
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७