ओटावा : भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक संबंध बिघडवल्यानंतर, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या समोर आता नवीन आव्हान उभे राहिले आहे. ट्रूडो यांच्याच पक्षातील खासदारांनी त्यांना २८ ऑक्टोबरच्या आत राजीनामा द्यायला सांगितला आहे. खासदारांचा हा सल्ला ट्रूडो यांनी मान्य केला नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा त्यांच्याच पक्षातील लोकांनी दिला आहे.
जस्टिन ट्रूडो यांच्या लिब्रेल पार्टीतील खासदार केन मॅकडोनाल्ड माध्यमांशी बोलताना म्हणाले की पंतप्रधानांनी आता लोकांचं म्हणणं ऐकूण घेण्याची गरज आहे. पक्षातील काही लोकांनी आता ट्रूडो यांनी चौथ्यांदा पंतप्रधानपदासाठी उभे राहू नये, असा सल्ला दिला आहे. ट्रूडो यांच्या नजीकच्या लोकांनी सुद्धा त्यांना हाच सल्ला दिला. त्यांच्या पक्षातील नेते मार्क मिलर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, " मंत्रिमंडळातील खासदार पंतप्रधान यांना सत्य सांगत होते त्यांची ऐकण्याची इच्छा असो वा नसो." कॅनडातील माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, लिब्रल पक्षातील २० खासदरांनी पत्रव्यवहार करत जस्टिन ट्रूडो यांना निवडणुकीच्या आधी पायउतार व्हायाला सांगितले आहे. जस्टिन ट्रूडो यांनी मात्र या सर्व प्रतिक्रीयांना डावलून, आपल्या पक्षात सगळं अलबेल असल्याचे सांगितलं आहे.
भारतविरोधामुळे खुर्ची धोक्यात!
सत्तेत आल्यापासून भारतविरोधी सूर आळवत, खलिस्तानी फुटीरतावाद्यांना सर्मथन दिल्यामुळे जस्टिन ट्रूडो यांची खुर्ची धोक्यात आली आहे. भारतासोबत आंतरराष्ट्रीय संबंध बिघडवल्यामुळे कॅनडातीला एका मोठ्या वर्गाचा रोष ट्रूडो यांना पत्कारावा लागला. माध्यामांना मिळालेल्या माहितीनुसार कॅनडामध्ये आता ट्रूडो यांच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली आहे, याचा फटका लिब्रल पक्षाला येत्या निवडणूकीत बसण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला फ्रान्स आणि लाओसच्या दौऱ्यावर असताना, त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी त्यांची सत्ता उलथवण्याचा प्रयत्न केला होता. सामोआ मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ परिषदेला, ट्रूडो हजेरी लावणार होते, परंतु मायदेशी होणाऱ्या विरोधामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आली. कॅनडाच्या राजकारणात जस्टिन ट्रूडो यांचे भविष्य अंधारात असल्याचे दिसून येत आहे.