मुंबई : ( MahaVikas Aghadi ) एखाद्या राज्याचा गाडा सुरळीत हाकण्यासाठी जसा मुख्यमंत्री सक्षम लागतो, तसाच गृहमंत्रीही. देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील अशी काही नावे त्यात घेता येतील. महाविकास आघाडीचा सत्ताकाळ मात्र या महत्त्वाच्या पदांना गालबोट लावणारा ठरला. या सरकारचा गृहमंत्री पोलिसांना १०० कोटींच्या वसुलीचे ‘टार्गेट’ देतो आणि मुख्यमंत्री मान डोलावतात, यापेक्षा वाईट अनुभव महाराष्ट्राने कधी घेतला नाही. या प्रकरणात तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतरही निष्पापतेची टिमकी मिरवण्याची संधी ते सोडत नाहीत. त्यामुळे मतदारांनी आता जागे होऊन मतदान करत खंडणीखोरांना कायमचे घरी बसवण्याची वेळ आली आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुरू केलेल्या १०० कोटींच्या वसुलीचे प्रकरण न्यायालयात बराच काळ चालले. त्यांच्याविरोधात ‘ईडी’ने दाखल केलेले अतिरिक्त आरोपपत्र विशेष ‘पीएमएलए’ न्यायालयाने स्वीकारले होते. त्यानुसार, तपासात असे आढळून आले की, मुंबईमधील ऑर्केस्ट्रा आणि बार मालकांकडून सचिन वाझे (माजी पोलीस अधिकारी) याने डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान अनिल देशमुख यांना ४.७० कोटी रुपये रोख आणून दिले. ते पैसे अनिल देशमुख यांनी आपला मुलगा हृषीकेश देशमुख याच्या साहाय्याने हवालामार्फत दिल्ली येथे जैन बंधू यांना पाठविले. ते त्यांनी पुन्हा ‘श्री साई शिक्षण संस्था’ नागपूर यांना देणगीच्या नावाखाली पाठवले. अनिल देशमुख हे २०११ सलापासून त्यांची बेहिशोबी रोख रक्कम जैन बंधूमार्फत सदर संस्थेमध्ये देणगीच्या नावाने जिरवत आहेत. त्यांनी आजपर्यंत अंदाजे १०.४२ कोटी रुपये रोख रक्कम या संस्थेमध्ये देणगीच्या नावाने घेतली आहे. (संदर्भ - पान नं. ४, PML - Special Case No. 1089 of 2021 या खटल्यामधील विशेष ‘पीएमएलए’ न्यायालयाचा दि. २८ जानेवारी २०२२ रोजीचा निर्णय)
अनिल देशमुख यांची दोन्ही मुले हृषीकेश देशमुख आणि सलील देशमुख यांनी बोगस भाग भांडवल उभे करून ‘झोडीयक डीलकोम प्रायव्हेट लिमिटेड’ ही बोगस कंपनी उभी केली. त्यांनी ‘फ्लरीश प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड’ उभी केली, जिच्या मार्फत त्यांनी ५.३४ कोटी रुपयांच्या मालमत्ता असणारी ‘प्रीमियर पोर्ट लिंक प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी अवघ्या ३५.९ लाखांत घेतली. याचाच अर्थ अनिल देशमुख यांची दोन्ही मुले हृषीकेश देशमुख आणि सलील देशमुख हेदेखील यात सक्रिय आहेत. (संदर्भ - पान नं. ५, PML- Special case No. 1089 of 2021 या खटल्यामधील विशेष ‘पीएमएलए’ न्यायालयाचा दि. २८ जानेवारी २०२२ रोजीचा निर्णय)
न्यायालयाची वरील सर्व निरीक्षणे तपासल्याअंती असे लक्षात येते की, अनिल देशमुख आणि महाविकास आघाडीच्यावतीने काही ‘ईडी’च्या कारवायांना जो राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला, तो खोटा होता. अनिल देशमुख यांनी केलेली पापे परमबीर सिंग यांनी उघडकीस आणली. अन्यथा महाराष्ट्रात अनिल देशमुख यांनी खंडणीखोरांचे राज्य आणले असते. न्यायालयाने नोंदवलेली ही सगळी कठोर निरीक्षणे पहिली असता, राजकीय आकसापोटी ही कारवाई झाल्याचा अनिल देशमुख आणि महाविकास आघाडीचा दावा फोल ठरतो. त्यासाठी न्यायालयाचे आभार मानावे तितके कमी आहेत.
अनिल देशमुखांनी पी.ए.मार्फत पैसे घेतले
- “अनिल देशमुख हे त्यांच्या पी.ए.मार्फत पैसे घ्यायचे. यासंदर्भात सर्व पुरावे ‘सीबीआय’कडे असून मी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे,” असा खळबळजनक गौप्यस्फोट निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने दि. ३ ऑगस्ट २०२४ रोजी केला. १०० कोटींचे खंडणी प्रकरण, २०२१ मधील अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन खून प्रकरणात सचिन वाझे गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहे. त्याला वैद्यकीय चाचणीसाठी नेत असताना एका वृत्तवाहिनीच्या कॅमेर्यासमोर त्याने धक्कादायक खुलासे केले.
- वाझे म्हणाला, “जे काही घडले, त्याचे सर्व पुरावे आहेत. ते (अनिल देशमुख) त्यांच्या पी.ए.च्या माध्यमातून पैसे घ्यायचे. याबाबत ‘सीबीआय’कडेही पुरावे आहेत. मीदेखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. हे सर्व प्रकरण (अनिल देशमुख) त्यांच्या विरोधात गेलेले आहे. मी या प्रकरणात नार्को टेस्ट करायलाही तयार आहे. मी एक पत्र लिहिले आहे, त्यामध्ये जयंत पाटील यांचेही नाव आहे,” अशी प्रतिक्रिया वाझेने दिली.
आरोपीला सोडण्यासाठी तत्कालीन मंत्र्याच्या बंगल्यावरून फोन
- “अवैध हुक्का पार्लर चालवणार्या आरोपीच्या सुटकेसाठी तत्कालीन मंत्री तथा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बंगल्यावरून फोन आला होता,” असा धक्कादायक दावा निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
- वाझे याने तुरुंगातून फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्याने अनेक खळबळजनक दावे केले आहेत. “आपण गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखपदी असाताना अवैध हुक्का पार्लर चालवणार्या आरोपीला अटक केली होती. या आरोपीला सोडण्याबाबत जयंत पाटील यांच्या शासकीय बंगल्यावरून फोन आला. त्याबदल्यात दुसर्याला अटक करण्यास सांगण्यात आले. यासंदर्भातील ऑडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे,” असाही दावा वाझेने केला असून “सीडीआरद्वारेही माहिती समोर येईल,” असे त्याने पत्रात नमूद केले आहे.
बदल्यांसाठी घेतले पैसे
“न्या. चांदीवाल समितीसमोर जबाब देत असताना माझ्यावर अनिल देशमुख दबाव आणत होते,” असा आरोप सचिन वाझेने केला आहे. “तसेच ठाणे येथील पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांची बदली करण्यासाठी अनिल देशमुखांनी २५ लाख रुपये घेतले. वरळीतील त्यांच्या ‘सुखदा’ या निवासस्थानी २५ लाख रुपये पोहोचवण्यात आले. माझ्यावर अनिल देशमुख यांचा दबाव होता. त्या दबावाखाली मी अनेक कामे केली,” असा दावा सचिन वाझे याने देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.