दिव्यांगांची जननी...

24 Oct 2024 10:30:09

madhuri amberkar
 
गेली सात वर्षे दिव्यांग मुलांच्या विकासासाठी माधुरी पंडित-आंबेरकर शाळा चालवत असून, त्यांच्या विकासासाठी अविरतपणे कार्यरत आहेत. याच दिव्यांगांच्या जननीविषयी...
 
अमेरिकन असोसिएशन ऑन मेंटल डेफिशिएन्सी’ या संस्थेने केलेल्या व्याख्येनुसार, ज्या व्यक्तींचा बुद्ध्यांक सरासरीपेक्षा कमी असतो आणि त्यामुळे ज्यांना भोवतालच्या परिस्थितीशी मिळते-जुळते घेण्यात अडचण निर्माण होतात, त्यांचा उल्लेख ‘मतिमंद’ म्हणून केला जातो. असे मूल जन्माला आल्यास पालकांना खरी चिंता असते, ती त्याच्या भविष्याची आणि समाजात ते कसे वावरेल याची. त्यांचा शारीरिक विकास तर होईल, पण बौद्धिक विकास कसा होईल, याची त्यांना काळजी असते. अशा मुलांसाठी गेली सात वर्षे पनवेलच्या कळंबोली येथील माधुरी पंडित-आंबेरकर पती अमोल आंबेरकर यांच्यासह काम करत आहेत. आजवर त्यांनी अनेक मतिमंद, कर्णबधीर (दिव्यांग) मुलांना घडवले असून कोणी ‘एम.ए.’ झाले आहे, तर कोणी फॅशन डिझायनर झाले आहे, तर कोणी खंबीरपणे आपल्या आवडत्या क्षेत्रात नोकरी करत आहे.
 
विद्याविहार येथे जन्मलेल्या माधुरी यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण येथील पालिकेच्या शाळेतच झाले. त्यांचे वडील ‘एमटीएनएल’मध्ये नोकरीला होते. त्यामुळे पनवेलच्या कळंबोली येथे त्यांना कॉर्टर्समध्ये राहायला जागा मिळाली होती. त्यानंतर मग येथील सुधागड शाळेत त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे त्यांनी ’जनरल डी.एड.’ केले, ‘वायसीएम’मधून ‘बी.ए.’ आणि मुंबई विद्यापीठामधून ‘एम.ए.’चे शिक्षण पूर्ण केले. तेव्हापासूनच समाजसेवा करायची त्यांना प्रचंड आवड होती. दिव्यांग मुलांच्या विकासासाठी आपण काहीतरी करावे, असे त्यांना कायम वाटायचे. त्यामुळे चेंबूरच्या ‘हशू अडवाणी कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशन’मधून या संबंधित एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तेव्हा माधुरी यांच्या भावाने आपल्या संस्थेच्या मदतीने दिव्यांग मुलांसाठी काम करण्याची कल्पना सूचवली.
 
दहावीत शिकणार्‍या दोन दिव्यांग मुलींना घेऊन त्यांनी शाळा सुरु केली. स्वखर्चातून शालेय गोष्टीही विकत घेतल्या. मीना गावंड यांनी शाळेसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली. तिथे अंगणवाडी आणि शाळा दोन्ही भरायच्या. त्यामुळे नंतर हळूहळू मुलांची संख्या वाढतच गेली. मात्र, भावाचा हेतू केवळ यातून पैसे कमावणे इतकाच होता, हे कळल्यावर त्यांनी त्यास विरोध केला. माधुरी यांच्यासाठी सेवा हेच ईश्वरी कार्य होते. दि. ३ डिसेंबर २०१६ मध्ये सुरु झालेल्या शाळेचा फेब्रुवारी महिन्यात भावाने संस्थेचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर माधुरी यांनी स्वतःच्या संस्थेसाठी अर्ज दाखल केला आणि त्यांनी २०१७ मध्ये ‘कै. रघुनाथ आंबेरकर बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था’ सुरु केली. आज या संस्थेने मतिमंद आणि कर्णबधीर मुलांकरिता ‘रत्नमाला स्पेशल एज्युकेशन सेंटर’ नावाची शाळा चालवण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.
 
२०१७ मध्ये माधुरी यांचे अमोल आंबेरकर यांच्याशी लग्न झाले. ते आणि माधुरी दोघेही या शाळेतील मुलांच्या विकासासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यांच्या शिक्षणाचा खर्च, कुटुंबाची जबाबदारी अशा गोष्टी डोळ्यांसमोर असल्याने अमोल यांनी सकाळी पेपर टाकणे, हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम, हाऊस किपिंगचे काम, चहा विकणे, ‘स्विगी’मध्ये नोकरी अशी विविध कामे केली. त्यानंतर आता कळंबोलीच्या एका कोचिंग क्लासमध्ये ते मराठी, हिंदीचे शिक्षक आहेत. या सर्व करत असताना त्यांनीसुद्धा शाळा सांभाळली आहे.
 
पुढे परत जागेचा प्रश्न आला, तेव्हा शिकवणीला येणार्‍या एका मुलीच्या वडिलांनी त्यांना वन रुम किचनची जागा दिली. त्या जागेचे भाडे भरायची वेळसुद्धा कधी आंबेरकर दाम्पत्यावर त्यांनी येऊ दिली नाही. मात्र, लॉकडाऊनचा काळ आला, तेव्हा काही गोष्टी कठीण होत गेल्या. तो काळ जसा उलटला, त्यानंतर पुन्हा नव्याने भरारी घ्यायचे माधुरी यांनी ठरवले. आज जी शाळा सेक्टर-१, कळंबोली, पनवेल येथे आपण पाहातो, त्या शाळेत सध्या सात ते २४ अशा वयोगटाची एकूण २० मुले शिकत आहेत. यांपैकी काहीजण असे होते, ज्यांना सांकेतिक भाषेचे ज्ञान नव्हते, स्वतःची काळजी घेण्यात ते असमर्थ होते. तीच मुले आज विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पारितोषिके पटकावत आहेत. सण-उत्सव आले की ही मुले दरवर्षी आपल्या हाताने पणत्या, राख्या, कंदील, कानातले बनवतात. विशेष म्हणजे, काहींची लग्न झाली असून काहीजण नोकरीसुद्धा करत आहेत. माधुरी यांना अशा मुलांसाठी निवासी शाळा यासाठी काढायची नाही, कारण या मुलांचा समाजाशी संबंध येणे महत्त्वाचे आहे. चार भिंतींत स्वतःच्या पायावर उभे राहण्यापेक्षा समाजात इतरांप्रमाणे कसे उभे राहता येईल, याकरिता त्यांची मेहनत आहे.
 
शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, हा संस्थेचा मुख्य उद्देश असल्याने, फक्त अशा मुलांकरिता एक मोठी शाळा सुरु करण्याचे माधुरी यांचे स्वप्न आहे. सर्व देणगीदारांच्या पाठिंब्यामुळे या दिव्यांग मुलांची जीवनशैली सुधारण्यास मदत होत असल्याचे माधुरी कायम म्हणतात. ‘ऑक्युपेशनल थेरपी’, ‘सेन्सरी थेरपी’, ‘सेन्सरी इंटिग्रेशन स्पीच थेरपी’, मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्र, उपचारात्मक शिक्षण केंद्र, एसएससी अभ्यास केंद्रासह एनआयओएस केंद्र इ. अशा विविध सेवा याठिकाणी मुलांना दिल्या जात आहेत. दिव्यांग मुलांच्या पालकांसाठी त्यांचे एकच म्हणणे आहे की, मुलाचे दिव्यांगत्व (अपंगत्व) स्वीकारा. पालकांनी ते स्वीकारले, तरच ही मुले आयुष्यात गरुडझेप घेऊ शकतात. अशा मुलांसाठी आज प्रत्येकाने पुढे येऊन पाठिंबा दिला पाहिजे. माधुरी पंडित-आंबेरकर करत असलेल्या अतुलनीय कार्याबाबत आणि पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे अनेक शुभेच्छा!
 
(अधिक माहितीसाठी : अमोल आंबेरकर ९५९४३८३९७५ )
 
Powered By Sangraha 9.0