कनकधारा स्तोत्र निरुपण : भाग-१

    24-Oct-2024
Total Views |
 

kanakdhara
 
अखिल जगतावर जिच्या मायेची मोहिनी आहे, संपूर्ण जग तिच्याच मायेच्या भोवताली फिरत असते, अशी ती विष्णूपत्नी लक्ष्मी संपूर्ण जगताला ऐश्वर्य प्रदान करत असते. संपूर्ण जग धन ऐश्वर्य प्राप्तीच्या कामनेने तिची आराधना करतात. ममतेचे साक्षात स्वरुप असणारी हरिप्रिया देखील तत्काळ भक्तमनोरथ पूर्ण करते. अशीच एका गरीब स्त्रीची आदि शंकाराचार्यांना कणव आल्याने, सर्व लेकरांप्रमाणेच तिच्यावरही दयाभावनेने कृपा करावी म्हणून आचार्यांनी जे सर्वकामप्रदा जगदंबेचे स्तुतीपठण केले, तेच ‘कनकधारा स्तोत्र’ होय! या स्तोत्राचे निरुपण आणि त्यातील भावार्थाचे दीपावलीच्या पार्श्वभूमीवर रेखाटलेले हे शब्दचित्रण..
 
आदि शंकराचार्यांनी कनकधारा स्तोत्र रचले, त्याची ही कथा आणि स्तोत्रातील काही अंश अर्थासह दोन भागांतून जाणून घेणार आहोत. त्यापैकी आजचा हा पहिला भाग...
 
बाल शंकराची मुंज वयाच्या तिसर्‍या वर्षी झाली. त्यांना गुरुकुलात वयाच्या चौथ्या वर्षी पाठवले गेले. बाल शंकर आठ वर्षांचा झाला, त्यावेळी त्याचे वेद आणि शास्त्रांचे अध्ययन संपत आले होते. सामान्यतः जे ज्ञान प्राप्त करायला कमीत कमी १२ वर्षे लागतात, आचार्यांनी मात्र ते ज्ञान चार वर्षांत अर्जित केले होते. एकदा बाल शंकर नित्यकर्मे करून मधुकरी मागण्यासाठी नगरात गेला. नेहमीप्रमाणे त्याने एका घरासमोर उभे राहून ‘ॐ भवती भिक्षां मे देहि’ची साद दिली.
 
तो एका अत्यंत लहान झोपडीसमोर उभा होता. दार अर्धवट उघडे होते. त्या घरातील अठराविश्वे दारिद्—य लपत नव्हते. थोड्या वेळात एक अत्यंत जीर्ण वस्त्रे घातलेली वृद्ध स्त्री बाहेर आली. दारात एक तेजःपुंज बटू आलेला पाहून तिला अत्यानंद झाला आणि तिने आदरपूर्वक नमस्कार केला. परंतु, क्षणार्धात तिचा चेहरा काळवंडला. “बाळा किंचित प्रतीक्षा कर. मी घरात काही मिळते का ते पाहते आणि तुला भिक्षा वाढते.” घरभर शोधून तिला सुकलेले पाच आवळे मिळाले. तिने बाहेर येऊन साश्रू नयनांनी ते बाल शंकराच्या झोळीत टाकले.
 
बाल शंकर काही बोलण्यापूर्वी तिनेच तिची करूण कथा सांगितली. तिच्या कुटुंबातील दारिद्—य पाहून बालशंकरालासुद्धा खूप वाईट वाटले. तिच्या क्लेशांचे हरण व्हावे आणि त्या कुटुंबीयांवर लक्ष्मीची कृपा व्हावी, या हेतूने आपण काही केले पाहिजे, असा बाल शंकराने विचार केला. वेदशास्त्रसंपन्न बाल शंकर हा सामान्य बालक नव्हता आणि सामान्य मनुष्यसुद्धा नव्हता. आता तो वेदातील दृष्टिगोचर परिणामांची पूर्ण माहिती आणि अभ्यास असणारा, एक ज्ञानी मनुष्य होता. प्रकांड पांडित्य आणि जोडीला तैलबुद्धी, यांमुळे त्याच्यात शीघ्र काव्य करण्याची क्षमता विकसित झाली होती. त्याने थेट लक्ष्मी देवीचे आवाहन करणारे स्तोत्र तिथल्या तिथे रचले.
 
ते सामर्थ्यवान स्तोत्र आणि त्याचा अर्थ खालीलप्रमाणे आहे. या स्तोत्राचे नाम ‘कनकधारा स्तोत्र’. अर्थात या स्तोत्राचा भाव, साधकावर लक्ष्मीची कृपा होऊन सुवर्णवर्षाव व्हावा, असा आहे.
 
आदि शंकराचार्य विरचित आणि ज्ञात असे हे पहिले स्तोत्र आहे. या स्तोत्रातून भक्ती आणि करुणा रस ओतप्रोत वाहताना दिसतो. एक कवी म्हणून आचार्यांचा दर्जा, त्यांच्या पहिल्या रचनेतूनसुद्धा दिसून येतो. लक्षात घ्या, त्यावेळी त्यांचे वय फक्त आठ वर्षे होते.
 
॥कनकधारा स्तोत्रम्॥
 
अङ्गं हरेः पुलकभूषणमाश्रयन्ती
भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणं तमालम्।
अङ्गीकृताखिलविभूतिरपाङ्गलीला
माङ्गल्यदाऽस्तु मम मङ्गलदेवतायाः॥१॥
 
श्रीलक्ष्मीदेवीला आवाहन करताना आचार्य तिची स्तुती करत आहेत. हे देवी, लक्ष्मी तू सर्व प्रकारचे वैभव तुझ्या भक्तांना प्रदान करतेस. तुझ्या कृपेने प्राप्त होणारे सगळे वैभव हे मंगल आणि त्यामुळे अक्षय्यसुद्धा आहे. अर्थात, हे सर्व प्रकारचे अक्षय्य वैभव, तुझ्या भक्ताला मिळण्यासाठी त्याला तुझ्या कृपाकटाक्षाची आवश्यकता असते.
 
तुझा कृपाकटाक्ष किती मोहक असतो याचे वर्णन करताना आचार्य म्हणतात, नीलवर्णाच्या कळ्यांनी सुशोभित झालेल्या तमाल वृक्षावर भुंगे बसून, त्याला पूर्ण व्यापून टाकतात. कृष्णकमलाचा उल्लेख ‘राधा तमाल’ असा सुद्धा केला जातो. अशी कथा आहे की, या फुलांनी लगडलेल्या झाडाला पाहून राधेला तो श्रीकृष्णच असल्याचा भास झाला आणि तिने या झाडालाच मिठी मारली. हे झाड त्याच्या नीलवर्णी फुलांनी बहरलेले असताना , श्रीकृष्णाइतके सुंदर आणि आकर्षक भासते. ही फुले सुगंधी असतात. त्यामुळे यांच्या सुगंधाने भुंगे लुब्ध होऊन, याला येऊन बिलगतात. त्याचप्रमाणे, तुझा कृपाकटाक्ष तुझ्या पती श्रीहरीवर जरी पडला, तर त्याचे अंग त्यामुळे पुलकित होते, रोमांचित होते. श्रीहरी म्हणजे जणू फुलांनी लगडलेले कृष्णकमळ आणि त्याला बिलगलेले भुंगे म्हणजे तुझी कृपादृष्टी आहे. अर्थात, नुसत्या कृपाकटाक्षातून तू त्याला पूर्ण व्यापून टाकतेस. हे लक्ष्मीमाते, तुझ्या या भक्तावरसुद्धा तुझी ती प्रेमळ कृपादृष्टी टाकून, माझे जीवनही पुलकित करून टाक.
 
मुग्धा मुहुर्विदधती वदने मुरारेः
प्रेमत्रपाप्रणिहितानि गतागतानि।
माला दृशोर्मधुकरीव महोत्पले या
सा मे श्रियं दिशतु सागरसंभवायाः॥२॥
 
या श्लोकातसुद्धा आचार्य लक्ष्मी देवीच्या कृपादृष्टीचेच वर्णन करत आहेत. कृपादृष्टीची माला म्हणजे, कृपादृष्टीने पुन्हा पुन्हा अवलोकन करणे. लक्ष्मी देवी समुद्रमंथनातून निर्माण झाली आहे. म्हणून तिचा उल्लेख, ‘सागरसंभवा’ असा केला जातो. आचार्य म्हणतात हे लक्ष्मीमाते, ज्याप्रमाणे पूर्ण विकसित अशा कमलपुष्पाच्या सहस्त्र दलांतून निघणारा सुगंध , भुंग्यांना मोहित करतो आणि ते त्या पुष्पातील मकरंद प्राशन करण्यासाठी वारंवार तिथे येतात, त्यांचे ते जाणे आणि येणे म्हणजे, जणू एखाद्या मालेप्रमाणे भासते. श्रीविष्णूंच्या मुखकमलाचे सौंदर्य पाहून, लक्ष्मीदेवीची दृष्टीही लज्जा आणि प्रेमाने मुग्ध झाली आहे. ती वारंवार त्यांच्या चेहर्‍याकडे पाहत आहे. ज्याप्रमाणे कमळाच्या फुलातील मकरंद कितीही प्राशन केला, तरी भुंग्यांचे मन तृप्त होत नाही; ते वारंवार अधिकाधिक मधाच्या मोहाने जा-ये करतात. त्याचप्रमाणे विष्णूपत्नी लक्ष्मीदेवीला आपल्या पतीच्या मुखकमलाचे सौंदर्य वारंवार पाहण्याचा मोह आवरत नाही आणि ती जणू एखाद्या मालेप्रमाणे त्यांच्यावर सतत दृष्टी टाकत आहे.
 
आचार्य लक्ष्मीदेवीला आवाहन करतात की, तुझी ही प्रेमयुक्त कृपामयी दृष्टी माझ्यावरसुद्धा अशीच वारंवार पडत राहू दे, जेणेकरून मी संसारतापातून मुक्त होऊ शकेन; मला चारही पुरुषार्थ साधतील आणि माझे जीवन सुखी आणि समृद्ध होईल.
 
आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुन्दं
आनन्दकन्दमनिमेषमनङ्गतन्त्रम्।
आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रं
भूत्यै भवेन्मम भुजङ्गशयाङ्गनायाः॥३॥
 
भगवान श्रीविष्णू हे क्षीरसागरात शेषनागाची शय्या करून त्यावर निवास करतात. शेषनागाचा उल्लेख भुजंग म्हणून सुद्धा केला जातो. श्रीविष्णूंची अंगना म्हणजे त्यांची पत्नी, तीच महालक्ष्मी आहे. भुजंगशय म्हणजे श्रीविष्णू आहेत. कनीनिक म्हणजे दृष्टीमंडळ. पक्ष्म म्हणजे पापण्या. आकेकरस्थित म्हणजे अर्धोन्मिलित नेत्र.
 
क्षीरसागरात श्रीविष्णू शेषाच्या शय्येवर विराजमान आहेत. त्यांच्या चरणांपाशी महालक्ष्मी देवी बसली आहे. श्रीविष्णूंचा डोळा लागला आहे. आनंदकंद भगवान श्रीविष्णूंकडे, अत्यंत प्रेमाने अनिमिष नेत्रांनी अर्थात डोळ्यांची उघडझाप न करता महालक्ष्मी पाहात आहे.
 
‘अनिमिष नेत्र’ या संकल्पनेचा अर्थ इथे समजून घ्या. ज्या मानव, देव, गंधर्वाची कुंडलिनी पूर्ण जागृत होते, त्यांचा तृतीय नेत्र उन्मिलित होतो. तृतीय नेत्र हे त्रिकालदर्शी होण्याचे द्योतक आहे. तृतीय नेत्र हा दृश्यमान नाही. पण त्याचे अस्तित्व दर्शवणारी गोष्ट म्हणजे अनिमिष नेत्र. कोणत्याही सामान्य मानवाचे डोळे हे उघडझाप न करता राहूच शकत नाहीत. परंतु, कुंडलिनी जागृत झाल्यावर नेत्र अनिमिष होतात. कुंडलिनी जागृती झाल्यावर सर्व कामना लय पावतात.
 
परंतु, आपल्या पतीचे लावण्य पाहून लक्ष्मी लुब्ध झाली आणि तिच्या मनात श्रीहरींविषयी कामभाव जागृत झाला. त्या कामभावनेने दग्ध झाल्यानेच, तिचे अनिमिष नेत्र क्षणभरासाठी आकेकर अर्थात अर्धोन्मिलित झाले. श्रीविष्णूंच्या प्रेमासाठी आतुर झाले. हे श्रीहरीच्या सौंदर्याच्या परिपूर्णतेचे विवेचन व स्तुती आहे. पतीच्या स्तुतीने पत्नी प्रसन्न होते, म्हणूनसुद्धा लक्ष्मीदेवीच्या कृपाप्राप्तीचे हे आवाहन आहे. बाल शंकर लक्ष्मी मातेला आवाहन करत आहे की, “माते, तुझी ही भगवान श्रीविष्णूंच्या ठिकाणी निश्चलपणे आसक्त झालेली प्रेमव्याकूळ दृष्टी मला ऐश्वर्यसंपन्न करू दे.”
 
बाह्यन्तरे मधुजितः श्रितकौस्तुभे या
हारावलीव हरिनीलमयी विभाति।
कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला
कल्याणमावहतु मे कमलालयायाः॥४॥
 
महालक्ष्मीचे वास्तव्य कमलपुष्पात असते; म्हणून तिचा उल्लेख ‘कमलालयाया’ असा करतात. श्रीहरी विष्णू यांनी मधु या दैत्याचा वध केला असल्याने, त्यांना ‘मधुजित’ असे म्हटले जाते. श्रीहरीच्या गळ्यातील माळेत कौस्तुभ मणी आहे. त्या कौस्तुभ मण्याची हिरवी आभा, श्रीहरींच्या दोन्ही बाहूंच्या मध्ये वक्षस्थळावर पसरली आहे. श्रीहरींच्या वक्षस्थळावर महालक्ष्मीची कटाक्षमाला स्थिर झाली आहे. महालक्ष्मीचे नेत्र नीलवर्णी आहेत. त्यामुळे तिच्या दृष्टिमंडळातून पडणारी आभासुद्धा नीलवर्णी आहे. त्यामुळे श्रीहरीच्या गळ्यातील मौक्तिक माला, हरीनीलमयी दिसत आहे. मोत्याची माळ ही आरक्तवर्णी आहे. पण ती कौस्तुभ मणी आणि नीलवर्णी कटाक्षमालेच्या प्रभावाने, हिरवी आणि निळी अशी भासते आहे. 
 
श्रीहरी जरी सर्व ऐश्वर्य आणि गुणांनी संपन्न असले, तरी लक्ष्मीच्या या दृष्टिप्रभावाने त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्या कटाक्षमालेच्या प्रभावाने श्रीहरींचे रूप अधिक साजिरे, अधिक मोहक दिसत आहे, त्यांच्या इच्छांची पूर्तता होत आहे. हे लक्ष्मीदेवी, त्याच कृपादृष्टीने माझेसुद्धा कल्याण कर, हीच माझी प्रार्थना आहे असे आवाहन आचार्य आई जगदंबेला करतात. क्रमशः
 
 
सुजीत भोगले
९३७००४३९०१