चिनी ड्रॅगनला वेसण!

24 Oct 2024 10:10:41

India- china
 
लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गलवानमधील अतिक्रमणपूर्व स्थिती निर्माण करण्यावर चीन व भारताच्या लष्करी नेतृत्वाचे एकमत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोलादी निर्धाराचा आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या राजनैतिक डावपेचांचा हा मोठा विजय मानावा लागेल. ड्रॅगनच्या आक्रमकतेला भारताने वेसण घातली असून त्यातून भारताने आपल्या अन्य शेजारी शत्रूराष्ट्रांना सूचक संदेश दिला आहे.
 
रशियातील कझान शहरात सुरू असलेल्या ‘ब्रिक्स’ राष्ट्रांच्या परिषदेत भारत व चीन यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीबाबत एक स्वागतार्ह आणि महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर झाला आहे. लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर २०२० मधील गलवान अतिक्रमणपूर्व स्थिती निर्माण करण्यासाठी भारत व चीनच्या लष्करी नेतृत्त्वाची सहमती बनली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही लष्करांच्या जवानांना गस्त घालण्यास पूर्वीसारखीच मुभा देण्यावर चिनी लष्करी नेतृत्त्वाने तत्त्वतः मान्यता दिली असली, तरी ही गोष्ट सुरळीत होण्यास अद्याप बराच अवधी लागेल. याच परिषदेदरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकमेकांशी थेट भेटही पार पडली. या दोन्ही घटना सकारात्मक घडामोडी मानल्या पाहिजेत.
 
२०२०च्या जूनमध्ये गलवान खोर्‍यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या चिनी सैन्याला भारतीय जवानांनी वेळीच रोखले. या हातघाईच्या संघर्षात चीनचेही सैनिक मारले गेले. १९६२ नंतर भारत-चीन सीमेवर उडालेला हा सर्वात मोठा हिंसक संघर्ष होता. पण, भारतीय जवानांनी अपूर्व धैर्य आणि शौर्य दाखवून प्रत्यक्ष नियंत्रण रेषा कायम राखण्याचे महान कार्य केले.
 
चीनला भारताकडून इतका तीव्र प्रतिकार अपेक्षित नव्हता. त्यामुळे संतप्त झालेल्या चीनने लडाखमधील संपूर्ण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपले लाखो सैनिक सुसज्ज करून तैनात केले. भारतानेही या डावपेचाला ‘जशास तसे’ या न्यायाने उत्तर देत आपलेही तितकेच सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर उभे केले. भारतानेही आपले रणगाडे, तोफा, चिलखती गाड्या आणि क्षेपणास्त्रे नियंत्रण रेषेवर उभी केली. थोडक्यात, दोन्ही बाजूंचे सैनिक प्रत्यक्ष लढाईच्या पवित्र्यात गेली चार वर्षे उभे आहेत. लवकरच हा तणाव अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, भूतान येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत पोहोचला. सध्या भारत व चीनचे सुमारे दोन लाख सैनिक सुसज्ज अवस्थेत संपूर्ण सीमेवर तैनात आहेत. गेली चार वर्षे ही स्थिती कायम राहिली होती.
 
गलवान खोर्‍यात अतिक्रमण केल्यास भारताकडून फारसा प्रतिकार होणार नाही, अशी अपेक्षा असलेल्या चीनला भारताच्या तडाखेबंद प्रतिकाराने फार मोठा धक्का बसला. कारण, यात केवळ भारताचे सैनिकच हुतात्मा झाले असे नव्हे, तर चीनलाही आपले तितकेच सैनिक गमावावे लागले. इतकेच नव्हे, तर भारताने संपूर्ण सीमेवर युद्धसज्जता निर्माण केली आणि कोणत्याही आक्रमणाला कडाडून विरोध करण्याची तयारी दर्शविली.
 
भारताचा हा प्रतिसाद अनपेक्षित असला, तरी तो फार काळ टिकणार नाही, अशी चीनची अपेक्षा होती. काही महिन्यांनी भारताची दक्षता ढिली पडेल आणि भारत आपले काही सैन्य माघारी घेईल, अशी चिनी लष्करी नेतृत्त्वाची समजूत होती. पण, महिन्यांमागून महिने गेले, तरी भारतीय लष्कराच्या सज्जतेत काहीच फरक पडलेला नाही आणि सीमेनजीक भारताकडून पायाभूत सुविधाही भक्कम केल्या जात असल्याचे पाहून चिनी नेतृत्त्वाचा धीर सुटत चालला. अखेरीस आपल्या डावपेचांना यश येत नसल्याचे पाहून चीनने माघार घेण्याचा निर्णय घेतला.
 
डेमचोक आणि डेप्सांग येथे पुन्हा दोन्ही बाजूंच्या सैनिकांना पूर्वीसारखी गस्त घालण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव चीनकडून सादर झाला. त्यामागे गेली चार वर्षे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांचे राजनैतिक प्रयत्न कारणीभूत आहेत. चिनी लष्कराकडून क्वचितच माघार घेतली जाते, असा जगभरातील देशांचा अनुभव आहे. पण, भारताने चीनला पुन्हा पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण करण्यास भाग पाडले, हा भारताचा मोठा सामरिक विजय आहे. वरकरणी यात फार काही घडले आहे, असे वाटत नसले, तरी चीनला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पहिल्यासारखी स्थिती निर्माण करण्यास भारताने भाग पाडले आहे, ही मोठी गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोलादी निर्धाराचा आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या चिवट राजनैतिक डावपेचांचा हा मोठा विजय आहे. युद्धमान स्थितीतील चीनला एकही गोळी न झाडता माघार घेण्यास लावणे, हा भारताचा सामरिक विजयच म्हणावा लागेल. कारण, या माघारीने भारताची बाजूच खरी होती, हे चीनने अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे. या निर्णयाद्वारे भारताने आपल्या शेजारी शत्रूराष्ट्रांना सूचक संदेश दिला आहे. चीनसारख्या बलाढ्य देशाला भारत माघार घ्यायला लावू शकतो, तेव्हा इतरांनी आपली कुवत ओळखून मगच भारताशी पंगा घ्यावा, हा संदेश भारताने इतरांना दिला आहे. या निर्णयामुळे भारत-चीन यांच्या संबंधातही काहीशी सुधारणा होईल.
 
चीन भारतापेक्षा सर्वच बाबतींत मोठा देश आहे. भौगोलिक, आर्थिक आणि लष्करी बाबतींत चीन भारताच्या बराच पुढे आहे. तरीही भारताचा चिवट प्रतिकार आणि विजीगिषु वृत्तीपुढे चीनला झुकावे लागले. तुम्ही केवळ आर्थिकदृष्ट्या किंवा लष्करीदृष्ट्या बलाढ्य असून चालत नाही. ती ताकद वापरण्याची धमक तुमच्या जवानांमध्ये आणि नेतृत्त्वाकडे आहे का, यालाच सर्वाधिक महत्त्व असते. भारताने (चीनच्या तुलनेत) आपल्याकडील तुटपुंज्या साधनांच्या जोरावर चीनला झुकविले आहे. डोंगरी युद्धाचा मोठा अनुभव भारतीय लष्कराकडे आहे आणि पूर्वीपेक्षा अधिक अद्ययावत शस्त्रास्त्रे आज भारताकडे आहेत. इतकेच नव्हे, तर ती वापरण्याची इच्छाशक्ती भारताचे मुलकी नेतृत्त्व बाळगून आहे, याची जाणीव झाल्यावर चीनला माघार घेण्यावाचून पर्याय राहिला नाही. कारण, युद्ध हा पर्याय दोन्ही देशांना परवडण्यासारखा नव्हता. चीनने विचारपूर्वक घेतलेला हा विवेकी निर्णय आहे. पण, तो प्रत्यक्ष अमलात येतो की नाही, तेच पाहणे महत्त्वाचे आहे.
 
राहुल बोरगावंकर 
 
Powered By Sangraha 9.0