महाबळेश्वरमधील शिन-शिन घळीत दुर्मीळ वन्यजीवांचा अधिवास; संशोधनामधून 'ही' माहिती आली समोर...

24 Oct 2024 18:33:30
 Mahabaleshwar robbers cave


मुंबई (विशेष प्रतिनिधी) –  कोयंबतूरच्या 'स्पिलिओलॉजिकल असोसिएशन ऑफ इंडिया' (SAI) या संस्थेने 'वर्ल्डवाईडफंडफॉरनेचर'(WWF) संस्थेच्या साहाय्याने महाबळेश्वरमधील 'राॅबरस् गुहे'मध्ये गेले वर्षभर संशोधनाचे काम केले. स्थानिक गावकरी या गुहेला 'शिन-शिन घळ' म्हणून ओळखतात. गेल्या वर्षभरात संशोधकांनी या गुहेमधील जैवविविधता अभ्यासणाचे काम केले, सोबतच या गुहेला असणारे सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्व देखील टिपले.

'शिन-शिन घळ' म्हणजेच 'राॅबरस् गुहा' ही सुमारे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेली गुहा आहे. महाबळेश्वर-पाचगणी टेबललँडच्या निर्मिती वेळीच ही ५२ मीटर लाांबीची गुहा तयार झाली. ही गुहा लेटराइट म्हणजेच चिरा आणि जांभाखडकांची बनलेली असून ती लालसर तपकिरी रंगामुळे ओळखली जाते. या गुहेतील पाण्याच्या साठ्यामुळे विविध जलचर आणि स्थलचर प्रजातींचा अधिवास त्याठिकाणी आहे. संशोधकांनी या गुहेमधून विविध जातीची वटवाघळे, साप, उंदीर आणि विविध कीटकांची नोंद केली आहे. वर्षभराच्या सर्वेक्षण आणि संशोधनानंतर संशोधकांच्या लक्षात आले की, गुहा ही एक परिसंस्था म्हणून दुर्मिळ प्राण्यांचे अधिवास क्षेत्र आहेच, मात्र त्यामधील प्राणी हे सभोवतालच्या पर्यावरणामध्ये समतोल राखण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे या गुहेचे संरक्षण आणि संवर्धन करणे खूप महत्त्वाचे आहे. स्थानिकांसाठी ही गुहा महत्त्वाचे धार्मिक स्थान असून तिला "साती आसरा माऊली" देवीचे जागृत स्थान मानले जाते. तसेच मराठा साम्राज्याच्या सैनिकांनी या गुहेचा वापर युद्धकाळात केला होता असेही मानले जाते.

Mahabaleshwar robbers cave 
 
या संशोधन कार्यामध्ये मालूसरवाडी, मालूसर आणि चिखली गावांतील स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून प्रकल्पाला पाठिंबा दिला. अनियंत्रित पर्यटन आणि प्लास्टिकमुळे सध्या या गुहेतील परिसंस्थेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे 'SAI' च्या संशोधकांनी महाबळेश्वर वन विभाग आणि स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने मंगळवार दि. २२ आॅक्टोबर रोजी गुहेच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबवली. यावेळी राज्याचे माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, महाबळेश्वरचे वनक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे, साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे उपस्थित होते. त्यांच्यासोबत 'SAI' च्या संचालिका हर्षदा पेठे, मुख्य कार्यकारी अधिकारी धनुषा कावलकर, प्रोजेक्ट फेलो पूजा पाटील आणि सॅकाॅन चे प्रधान वरिष्ठ शास्त्रज्ञ मंची शिरीष एस. उपस्थित होते. यावेळी गुहेच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच प्लास्टिक आणि जैवविघटनशील कचऱ्याच्या नियोजनासाठी त्याठिकाणी कचरा पेटी आणि निर्माल्य कुंडही बसविण्यात आले. गुहेच्या परिसरात प्रदूषण नियंत्रणासाठी आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी माहिती फलक ही बसविण्यात आला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0