मतदार जनजागृतीकरीता अभाविपची 'जनजागरण यात्रा'

24 Oct 2024 18:45:10

ABVP Press

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (ABVP Janajagran Yatra)
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विद्यार्थी नीधी न्यास व स्टुडन्ट फॉर डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील विद्यार्थ्यांमध्ये मतदान जनजागृती व्हावी, या उद्देशाने 'फ्युचर कॉन्क्लेव्ह फॉर बेटर मुंबई' ही जनजागरण यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा दि. ६ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत 'भांडुप ते दादर' आणि 'वांद्रे ते वसई' या दोन मार्गीकेतून निघेल. गुरुवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अभाविपचे मुंबई महानगर सहमंत्री बिपिन शुक्ला यांनी यासंदर्भात माहिती दिली.

हे वाचलंत का? : केंद्रीय मंत्रिमंडळाकडून नव्या ६,७९८ कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी!
नव मतदारांनी जात, धर्म, वंश, पंथ किंवा इतर कोणताही प्रलोभनांना बळी न पडता विकास, विकासकामे आणि मुंबईचे भवितव्य यांना डोळ्यासमोर ठेवून मतदान करावे है उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊन संपूर्ण मुंबई महानगरात ही जनजागरण यात्रा निघेल असे त्यांनी सांगितले.

या यात्रांमध्ये भविष्यातील मुंबईतील रोजगार, मुंबईचे शहरी पर्यावरण, पुरेशी दळणवळणाची संसाधने, मुंबईकरांचे आरोग्य, आणि मुंबईकरांसाठी गुणवत्तापूर्ण रोजगाराभिमुख शिक्षण अशा विविध मुद्यांवर महाविद्यालय परिसरात चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान या यात्रांमध्ये अभाविपचे १३०० ते १४०० कार्यकर्ते कॉलेज कॅम्पस मध्ये परीचर्चा, जागरूकतेसाठी गेट मिटिंग आणि स्वाक्षरी मोहीम, २.५ लाख पत्रकांचे वितरण असे उपक्रम पार पाडणार आहेत.

३० कार्यकर्त्यांची टीम होस्टेल्स, सोसायट्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन पथनाट्य आयोजित करून तरुण मतदारांना वरील मुद्द्यांची जाणीव करून त्यांचे मतदानाचे हक्क बजावण्यासाठी आवाहन करेल.
Powered By Sangraha 9.0