‘शेतकरी कामगार पक्ष’ ठाकरेंना नकोसा?

रायगड जिल्ह्यातून शेकाप हद्दपार करण्याची उबाठाची तयारी

    23-Oct-2024
Total Views |
 
 
shekap
 
 
पेण : ( Shetkari Kamgar Paksh in Raigad Vidhansabha ) लोकसभा निवडणुकीत ‘शेतकरी कामगार पक्षा’ने महाविकास आघाडीला साथ दिली होती. रायगड आणि मावळ मतदारसंघात उमेदवार न देता शेकापने शिवसेनेच्या (ठाकरे) उमेदवारांना पाठिंबा दिला होता. “कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणू,” अशी हमी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिली होती. मात्र, दोन्ही मतदारसंघांतून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला. विशेषतः रायगडमधून अनंत गीते यांचा झालेला पराभव उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. निवडणूक निकालानंतर जिल्ह्यात शेकापची अपेक्षित मदत झाली नसल्याने स्पष्ट झाले. अलिबाग आणि पेणसारख्या शेकापची ताकद असलेल्या मतदारसंघांत अनंत गीते यांची पिछेहाट झाल्याचे दिसत आहे.
 
या पराभवानंतर ‘शेतकरी कामगार पक्ष’ आणि शिवसेना ठाकरे गटाचे संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातून शेकापला हद्दपार करण्याची उबाठाने तयारी चालविल्याचे दिसून येत आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ठाकरेंना शेकाप नको असल्याचीच प्रचिती आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांना विधान परिषदेसाठी पाठिंबा जाहीर केला होता. ठाकरे यांची साथ मिळाली असती तर, जयंत पाटील पुन्हा विधान परिषदेवर निवडून गेले असते. मात्र, शेवटच्या क्षणी ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडूनही आणले. नार्वेकरांच्या उमेदवारीमुळे जयंत पाटील यांचा पराभव झाला. विधान परिषदेपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीत शेकापची कोंडी करण्याचे धोरण उबाठा गटाने स्वीकारल्याचे दिसून येत आहे. ‘शेतकरी कामगार पक्षा’ने महाविकास आघाडीकडून अलिबाग, पेण, उरण आणि पनवेल या चार जागांसह सांगोला, नांदेडमधील लोहा या जागांची मागणी केली आहे. शरद पवार यांची भेट घेऊन त्यांनी या जागा महाविकास आघाडीकडून शेकापला मिळाव्या, अशी मागणी केली आहे. पण शिवसेनेने या चारही मतदारसंघांत आपले उमेदवार उतरवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.
 
अलिबागमधून जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, तर पेणमधून किशोर जैन यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. दोन्ही जागा किंवा किमान एक जागा मिळावी अशी इच्छा जिल्हाप्रमुख यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. उरणमधून माजी आ. मनोहर भोईर निवडणुकीची तयारी करत आहेत, तर पनवेलमधून बबन पाटील यांची मोर्चेबांधणी सुरू आहे.
 
यातूनच ‘शेतकरी कामगार पक्षा’ला रायगड जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा विडा शिवसेनेने उचलल्याचे अधोरेखित होत आहे.
 
सांगोल्यावरही उबाठाचा दावा
 
रायगड पाठोपाठ सांगोला या शेकापच्या मतदारसंघावर उबाठा गटाने दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे गणपतराव देशमुख यांच्या बालेकिल्ल्यातही शेकापची कोंडी करण्याची पूर्ण तयारी उबाठाने केली आहे. रायगडपाठोपाठ आता सांगोल्यातही शेकापच्या जागांवर उबाठाने दावा सांगितल्याने उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांना शेकाप नकोसा झाल्याचे दिसून येते.
 
 
आनंद जाधव