डोंबिवलीतून रविंद्र चव्हाण विक्रमी मतधिक्क्याने विजयी होणार

23 Oct 2024 16:00:07
 
dombivli
 
डोंबिवली : ( Ravindra Chavan ) मंत्री रविंद्र चव्हाण यांना पक्षाकडून चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी झालेल्या २००९, २०१४ आणि २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिल्यास दर वेळेस रविंद्र चव्हाण यांच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. यंदाच्या निवडणुकीतही ते विक्रमी मताधिक्क्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास महायुतीच्या डोंबिवलीतील प्रमुख पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.
 
“विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत झालेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या पत्रकार परिषदेत हा विश्वास व्यक्त करण्यात आला. लवकरच वचननामा प्रसिद्ध करण्यात येईल,” असेही त्यांनी सांगितले. यावेळी महायुतीचे विधानसभा समन्वयक शशिकांत कांबळे, कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब, डोंबिवली पश्चिमचे मंडळ अध्यक्ष समीर चिटणीस, स्थायी समितीचे माजी सभापती राहुल दामले, माजी नगरसेवक मुकुंद पेडणेकर, संदीप पुराणिक, मंदार हळबे, दत्ता माळेकर, मितेश पेणकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, संतोष चव्हाण, विवेक खामकर, बंडू पाटील, संजय पावशे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे डोंबिवली शहरअध्यक्ष सुरेश जोशी, अ‍ॅड. ब्रम्हा माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलली. त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारमुळे भाजप, शिवसेना युती सरकारने सुरू केलेली अनेक विकासकामे रखडल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. मात्र, अडीच वर्षांपूर्वी राज्यात स्थापन झालेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारने पुन्हा एकदा येथील विकासकामांना गती दिली. परिणामस्वरूप गेल्या काही महिन्यांमध्ये डोंबिवलीमध्ये अनेक महत्त्वाची विकासकामे वेगाने सुरू झाली आहेत. त्यामध्ये डोंबिवलीतील सर्व डांबरी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. येत्या काही महिन्यात डोंबिवलीकरांना सुसज्ज आणि चांगले रस्ते मिळतील, असा विश्वास यावेळी महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.
 
रेल्वेतून पडून अनेक प्रवासी मृत्युमुखी पडतात. याबाबत पत्रकारांनी विचारले असता महायुतीतील पदाधिकारी म्हणाले, “डोंबिवली स्टेशनवरील प्रवाशांचा वाढता भार, वाढीव गृहसंकुले आदी गोष्टींबाबत यावर विचार नक्कीच करू. महायुतीच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा नक्कीच असेल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
 
साधारणपणे ४० ते ४२ टक्के मतदान होते. पण पक्षीय पातळीवर मतदानांचा आकडा वाढविण्यासाठी लोकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी मतदानांचा आकडा नक्कीच वाढेल. लोकसभा निवडणुकीत अनेक नावे यादीतून वगळल्याची तक्रार होती. ही नावेही यंदाच्या निवडणुकीत यादीत दिसतील. या नागरिकांनाही मतदानांचा हक्क बजाविता येणार आहेे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0