ठाणे : ( CM Eknath Shinde ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ठाण्यातील परबवाडी शिवसेना शाखा येथून आयटीआय वागळे सर्कल अशी रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आपला उमेदवारीचा अर्ज दाखल करणार असल्याने शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरात वाजत आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाई (आठवले) महायुतीने सत्ता कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात मविआ आघाडीला अद्याप तुल्यबळ उमेदवारच सापडलेला नाही. मात्र, चौथ्यांदा कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात महायुतीकडून लढणारे एकनाथ शिंदे आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करणार आहेत. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे घटकपक्ष उपस्थित राहणार आहेत.
लाडक्या भावाचा फॉर्म भरू या
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर विधानसभेची निवडणूक होत असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा सर्वत्र बोलबाला सुरू असताना ‘चला लाडक्या भावाचा फॉर्म भरु या...’ अशा आशयाची पोस्ट प्रसारमाध्यमांवर चांगलीच प्रसारित होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी सकाळी १०.३० वाजता अर्ज दाखल करण्यासाठी जाणार असून संपूर्ण मतदारसंघ भगवा होणार आहे.
२००४ मध्ये ठाणे विधानसभेतून शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे पहिल्यांदा आमदार झाले. २००९ साली विभाजन होऊन निर्माण झालेल्या कोपरी-पाचपाखाडी या एकनाथ शिंदे यांचे होमग्राऊंड असलेल्या मतदारसंघातून शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. तेव्हापासून झालेल्या तीन निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांनी विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. किंबहूना या मतदारसंघाचे नेतृत्व करत असताना पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, नगरविकासमंत्री आणि आता सर्वोच्च मुख्यमंत्रिपदापर्यंत एकनाथ शिंदे यांनी मजल मारली आहे.