महाराष्ट्राच्या विकासासाठी डबल इंजिन सरकार आवश्यक : डॉ. विनय सहस्रबुद्धे

    23-Oct-2024
Total Views |
 
dr. vinay sahasrabuddhe
 
पिंपरी : ( Double Engine Government ) पाश्चात्य तसेच इस्लामिक मतप्रवाहाचा प्रसार आणि प्रचार वेगाने होत आहे, भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी स्वधर्म, स्वदेश, स्वभुषा, स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वराज्य हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मंत्र अंमलात आणून महाराष्ट्राच्या विकास व केंद्र सरकारच्या योजनांना पुढे नेण्यासाठी राज्यात डबल इंजिन सरकार आवश्यक असून सामाजिक ऐक्य मजबूत करणाऱ्या महायुती सरकारच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन माजी खासदार तथा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.
 
इंडियन बिझनेस कौन्सिल, पिंपरी चिंचवड चार्टर्ड अकौंटंट आणि कंपनी सेक्रेटरी संयुक्त विद्यमाने 'महाराष्ट्र व्हिजन - २०४७' या संवाद कार्यक्रमाचे आयोजन ग. दि. माडगूळकर सभागृह निगडी येथे करण्यात आले होते. यावेळी डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर वरिष्ठ चार्टर्ड अकौंटंट नंदकिशोर लाहोटी, उद्योजक मनोज फुटाणे उपस्थित होते.
 
महाराष्ट्राने स्वातंत्र्य संग्रामामध्ये मोठे योगदान दिले आहे. तसेच राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये येथील उद्योगांचाही मोठा वाटा आहे. ज्याचा फायदा आर्थिक आणि सामाजिक आघाडीवर झालेला आहे. प्रगतीपथावर जात असताना विकासाला चालना देणारे सरकार आवश्यक असते २०१४ नंतर भारताच्या विकासाला आणि प्रगतीला भरपूर चालना मिळाली आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली आहे. अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प उभे राहिले आहेत तर काही प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारताचा दबदबा वाढला आहे. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यायलाच पाहिजे. महायुतीच्या नेतृत्वात सध्या राज्यात शेती, व्यवसाय, उद्योग या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून रोजगार निर्मितीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. बेरोजगारीचे प्रमाण घटले आहे हे त्यांनी आकडेवारीसह मांडले. महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्रात गतिमान सरकार असल्याने राज्यात डबल इंजिन सरकारची आवश्यकता आहे, राज्यातील महायुती सरकारने सर्वच क्षेत्रात चांगले काम केले असून अनेक विकासाभिमुख प्रकल्प, योजना सुरू आहेत त्यामुळेच विकासाला चालना देण्यासाठी सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हे धोरण महत्त्वाचे आहे, असे डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार राहुल चिंचोलकर यांनी मानले. या कार्यक्रमास इंडियन बिझनेस कौन्सिल, पिंपरी चिंचवड चार्टर्ड अकौंटंट आणि कंपनी सेक्रेटरी सदस्य, उद्योजक बहुसंख्येने उपस्थित होते.
 
सामाजिक ऐक्य आवश्यक
 
जातीपातीतील द्वेष संपवून आपली ओळख, सभ्यता, हिंदुत्व, संस्कृती, नीती टिकवणे अत्यंत आवश्यक असून हे टिकवून ठेवणाऱ्या हिंदुत्ववादी तसेच महिला सक्षमीकरण, उद्योगाला चालना देणाऱ्या व संविधानाला अभिप्रेत सामाजिक ऐक्याचा पुरस्कार करणाऱ्या या महायुती सरकारला पुन्हा संधी देण्याचे नम्र आवाहन त्यांनी केले हे सरकार लोकप्रियतेपेक्षा लोकहिताला प्राधान्य देणारे सरकार असल्याचेही त्यांनी सांगितले.