केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! ३ टक्के वाढीसह महागाई भत्ता ५३ टक्के

23 Oct 2024 18:53:44
da-hike-central-government-gave-diwali-gift


मुंबई : 
      केंद्र सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट मिळणार असून महागाई भत्त्यात(डीए) वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने दिवाळीआधीच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. डीए वाढीचा फायदा केंद्र शासनाच्या सेवेत असणाऱ्या सुमारे ४९ लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना होणार आहे.




दरम्यान, महागाई भत्ता(डीए) आणि महागाई सवलत(डीआर) केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई नुसार त्यांचे मूळ वेतन किंवा पेन्शन समायोजित करून महागाईपासून संरक्षण करण्यासाठी दिले जाते. सीपीआय आधारित चलनवाढ सप्टेंबरमध्ये ५ टक्क्यांच्या पुढे गेली आहे. दि. १ जुलै २०२४ पासून कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना डीए ५३ टक्के झाला आहे.

वर्षातून दोनवेळा शासकीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि जुलै महिन्यात डीए मोजला जातो. कामगार ब्युरोने प्रकाशित केलेल्या औद्योगिक कामगारांच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकानुसार केले जाते. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार डीए वाढ करण्यात आली असून सरकारी तिजोरीवर एकूण वार्षिक भार ९,४४८.३५ कोटी रुपये असेल, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे.




 
Powered By Sangraha 9.0