मुंबई : अभिनेता सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. १९९८ साली काळवीट शिकार प्रकरणात अडकलेल्या सलमानच्या मागे बिश्नोई गॅंग लागली असून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या आणि प्रयत्न झाला आहे. या दरम्यान, सलमानचा काळवीट शिकार प्रकरणाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. २००८ साली ऑन दि काऊच विथ कोएल या शोमध्ये सलमान खानची मुलाखत घेण्यात आली होती. याच मुलाखतीत सलमानने काळवीटला मारल्याचा दावा फेटाळून लावला होता. १९९९ सालापासून सातत्याने चर्चेत आहे. 'हम साथ साथ है' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हा प्रकार घडला होता. याप्रकरणी सलमान खानला अटकही झाली होती.
काळवीट हत्या प्रकरणासाठी लॉरेन्स बिश्नोईने दिलेल्या धमकीच्या निमित्ताने आता पुन्हा या प्रकरणाची चर्चा होऊ लागली असून सलमानचा खानचा एक जुना व्हिडिओही व्हायरल झाला आहे. यात सलमान म्हणाला आहे की, “या घटनेमागे मोठी स्टोरी आहे. पण काळवीटची शिकार करणारा मी नव्हतो.” त्यावर पत्रकार म्हणाली की, तू कोणाचं नाव घेतलं नाहीस म्हणून तुझ्यावर आरोप केला जातोय. त्यावर सलमान खान म्हणाला की, “याला आता काहीच अर्थ नाही. कोणालाच या प्रकरणातील एक टक्काही सत्य माहीत नाही. मी कोणाचंच नाव घेऊ शकत नाही.”
पुढे त्याला, “तू शांत राहणं पसंत केलं का?”, असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सलमान म्हणाला, “कारण मला त्याची गरज नाही वाटली. प्रतिष्ठा, प्रामाणिकपणा आणि कर्मावर माझा विश्वास आहे. मी कर्मावर विश्वास ठेवतो”, असं तो त्या व्हिडिओत बोलताना दिसत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली. आणि या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली असून बाबा सिद्दिकी हे सलमान खानचे जवळचे मित्र असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचे ही समोर आले. दरम्यान, सलमान खानलाही सातत्याने धमकी प्राप्त होत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज आला होता. ज्यात बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षाही भयंकर अवस्था केली जाईल, असा इशारा यातून देण्यात आला होता. त्यामुळे आता सलमान आणि बिश्नोई समाजातील हा वाद कुठपर्यंत जातो याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे शिवाय सलमानची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे.